Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
राज्य

विदर्भात १० जागांवर १९४ उमेदवार
रामटेकमधून प्रा. कवाडेंची माघार, अ‍ॅड. सुलेखा कुंभारे नागपूर व रामटेकमधून लढणार
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
पंधराव्या लोकसभेसाठी विदर्भातील दहा जागांवर १९४ उमेदवार रिंगणात आहेत. १६ तारखेला होणाऱ्या मतदान होणार असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी तब्बल ६० उमेदवारांनी माघार घेतली. रामटेकमधून पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतली, तर बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे या नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात किल्ला लढवणार आहेत.

निवडणुकीमुळे खादीच्या कपडय़ांची मागणी वाढली
प्रचलित फॅशनला अनुसरून तयार कपडय़ांमध्येही

वेगवेगळे प्रकार
नागपूर, २ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जसजसा जोर चढत आहे तशी स्वदेशी खादी कपडय़ांना बाजारात चांगली मागणी दिसून येत आहे. नेत्यांसोबत प्रमुख कार्यकर्त्यांची संख्या वाढली. नेत्यांसोबतजाहीर सभा किंवा बैठकीला जात असताना आपलाही पोशाख नेत्यांसारखा खादीचा असावा म्हणून अनेक कार्यकर्ते खादीचे कपडे घालून नेत्यांच्या मागे मिरवत असतात.

जातीय शक्ती फोफावण्यास पवारच जबाबदार-शालिनीताई
इस्लामपूर, २ एप्रिल/वार्ताहर

संघ परिवारातील भारतीय जनता पक्षासारख्या जातीयवादी शक्तीला महाराष्ट्रात आणण्याचे व रूजविण्याचे पाप केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी १९७८ ला वसंतदादा पाटील यांचे विश्वासघाताने सरकार पाडताना केले असल्याची टीका क्रांती सेनेच्या संस्थापक- अध्यक्षा आमदार शालिनीताई पाटील यांनी केली.

महाराष्ट्राचा गुजरात करायचा नाही-पवार
मेहकर / खामगाव, २ एप्रिल / वार्ताहर

गुजरात दंगलीमध्ये शंभर निरपराध लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या माया कोडवाणीला न्यायालयाने तुरुंगात पाठवले आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा गुजरात करण्याची भाषा करतात पण, आम्हाला महाराष्ट्राचा गुजरात करायचा नाही, अशा जातीयवादी शक्तींना पायबंद घालण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मेहकर येथील स्वातंत्र्य मैदानावर आयोजित प्रचार सभेत केले.

विकासकामांसाठी सहमतीच्या राजकारणाची गरज-अजित पवार
सातारा, २ एप्रिल/वार्ताहर

विकासकामांसाठी सहमतीचे राजकारण योग्य असून जुने वादविवाद विसरून शरद पवार यांच्या उमेदवारीला माजी आ. चिमणराव कदम यांनी दिलेला पाठिंबा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. जातीयवादी पक्षांना दूर सारण्यासाठी काँग्रेस आघाडीला निवडून देण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री अजित पवार यांनी केले. गिरवी (ता. फलटण) येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या मेळाव्याचे माजी आ. चिमणराव कदम यांनी आयोजन केले होते. त्या वेळी अजित पवार बोलत होते.

..तर भिवंडीत कुणबी सेना स्वबळावर लढणार
भिवंडी, २ एप्रिल/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊनही भााजपच्या नेत्यांना भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी योग्य उमेदवार मिळत नाही. युतीच्या नेत्यांनी यावर वेळीच तोडगा न काढल्यास प्रसंगी मी कुणबी सेनेच्या वतीने भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवीन, असा इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आज येथे दिला. समाज बांधवाकडून लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी पाटीदार हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात कुणबी सेना कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. काँग्रेसने मोठय़ा प्रतीक्षेनंतर माजी महापौर सुरेश टावरे यांची उमेदवारी जाहीर केली तर मनसेने डी. के. म्हात्रे यांना रिंगणात उतरवले आहे. युतीच्या जागावाटपात भिवंडीची जागा भाजपाच्या पदरात पडली आहे. मात्र भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नाही, असा आरोप करीत विश्वनाथ पाटील यांनी भाजप-सेना-आगरी सेना, कुणबी सेना पुरस्कृत म्हणून मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगितले. आपला २० सामाजिक संघटनांशी संबंध असल्याने त्यांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून कुणबी सेना स्वत:च्या ताकदीवर दोन ते अडीच लाख मते मिळवून विजय प्राप्त करील, असा दावा त्यांनी केला. यावेळी महंत काशिनाथ महाराज यांनी माझ्यावर केलेले आरोप येत्या आठ दिवसांत सिद्ध न केल्यास कायदेशीर कारवाई करणार, असे पाटील यांनी सांगितले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचा राष्ट्रवादीला पाठिंबा
नाशिक, २ एप्रिल / प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाचे स्थानिक नेते व नगरसेवक मुशीर सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार व समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी व्हावी याकरिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेवून समाजवादी पार्टीने ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तेथे आपले उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सय्यद यांनी सांगितले. त्यानुसार समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी नाशिक लोकसभा मतदासंघात पक्षाचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भुजबळ यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सय्यद यांनी सांगितले.

आ. संतोष चौधरी यांची बंडखोरी न करण्याची भूमिका
जळगाव, २ एप्रिल / वार्ताहर

भुसावळ येथील राष्ट्रवादीचे आ. संतोष चौधरी यांनी आपण पक्षाचे कार्यकर्ते असून बंडखोरी करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. बंडखोरीसाठी आपल्यावर समर्थक कार्यकर्त्यांचा दबाव वाढतच असल्याचेही त्यांनी मान्य केले. रावेर मतदारसंघातून पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी चौधरी इच्छुक होते. परंतु पक्षाने रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिल्याने चौधरी समर्थकांमध्ये असंतोष पसरला. चौधरी यांचे भाऊ व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी यांनी तातडीने समर्थकांचा मेळावा घेऊन बंडाचा इशारा दिला होता. पक्षाच्या काही नगरसेवक, सरपंच व पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिल्याचे सांगण्यात आले होते. जळगावी येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतानाही चौधरी उपस्थित नव्हते. तथापि काही कामानिमित्त आपण औरंगाबाद येथे होतो म्हणून उपस्थित राहता आले नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले.

धुळ्यातून काँग्रेसचे सखाराम घोडके यांची बंडखोरी
मालेगाव, ३ एप्रिल / वार्ताहर
धुळे लोकसभा मतदारसंघातून मालेगावचे उपमहापौर तथा काँग्रेसचे नेते सखाराम घोडके यांनी गुरूवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावेळी घोडके यांनी काँग्रेसच्या उमेदवार निवड प्रक्रियेवरही टीकास्त्र सोडले. काँग्रेसतर्फे धुळे मतदारसंघातून अमरीश पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पटेल यांच्या उमेदवारीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. रोहिदास पाटील यांनी याआधीच विरोध केला असताना आता मालेगावचे उपमहापौर घोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पटेल यांच्यासमोरील समस्या अधिक वाढवल्या आहेत. पटेल यांची उमेदवारी आधीच निश्चित झाली होती, काँग्रेसमध्ये बाहेरील व्यक्तीस उमेदवारी देण्याची काय गरज होती, असे प्रश्नही घोडके यांनी यावेळी उपस्थित केले.

साहित्यिक बाबुराव बागुल पुरस्कारासाठी ‘येस्कर’ची निवड
नाशिक, २ एप्रिल / प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या नावे दरवर्षी नवोदित कथालेखकाच्या पहिल्या कथासंग्रहाला पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्य़ातील उदगीरचे अंबादास केदार यांच्या ‘येस्कर’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये पाच हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्कारासाठी निवड समिती सदस्य म्हणून डॉ. रमेश कुबल, प्रा. इंदिरा आठवले व प्रा. आत्माराम गोडबोले यांनी तसेच विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अजय कांबळे यांनी निवड समिती सदस्य सचिव म्हणून काम पाहिले. पुरस्कार प्रदान सोहळा न्या. व्ही. एस. शिरपूरकर, नवी दिल्ली यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ.राजन वेळूकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विधी महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई येथे येत्या ११ एप्रिल २००९ रोजी आयोजित केलेला आहे असे विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे.