Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
क्रीडा

तिसरे महायुद्ध
ऑस्ट्रेलिया- द. आफ्रिका एकदिवसीय मालिका आजपासून
दरबान, २ एप्रिल/ वृत्तसंस्था
कसोटी आणि ट्वेन्टी-२० ही दोन महायुद्धे रंगल्यानंतर शुक्रवारपासून तिसऱ्या महायुद्धाला म्हणजे एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून यासाठी ऑस्ट्रेलिया- द. आफ्रिका हे दोन्हीही संघ पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रमवारीत नंबर वनवर पोहोचण्याची संधी गमावलेली असली तरी एकदिवसीय क्रमवारीत त्याच्यापुढे अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान असेल. तर ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका जिंकून आपले अव्वल स्थान पटकाविण्याचे स्वप्न असेल. ही मालिका जो संघ जिंकेल त्याला अव्वल स्थानावर विराजमान व्हायला मिळणार असल्याने दोन्हीही संघ मालिका विजयाच्या इर्षेनेच मैदनात उतरतील.

इंग्लिश प्रशिक्षकपदाचा विचार नाही -कर्स्टन
वेलिंग्टन, २ एप्रिल/वृत्तसंस्था

इंग्लंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आपल्या नावाचा विचार चालू असलेल्या वृत्ताचा भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी इन्कार केला आहे. इंग्लंड संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध चालू असून या पदासाठी कर्स्टन यांच्या नावाचाही इंग्लंड मंडळ विचार करीत असल्याचे वृत्त इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी दिले होते. या संदर्भात क्रिकइन्फो या संकेतस्थळाने कर्स्टन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण या पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

फायनल हर्डल!
विंडिज-इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट
सेंट लुशिया, २ एप्रिल/ वृत्तसंस्था
कसोटी आणि ट्वेन्टी-२० मालिकेतील पराभवानंतर इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत चांगलेच पुनरागमन करीत वेस्ट इंडिजविरूद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली असून उद्या होणाऱ्या अंतिम एकदिवसीय सामन्यात मालिकेचे भवितव्य ठरणार आहे.

बोटेराच्या हॅट्ट्रिकमुळे बोलिव्हियाकडून अर्जेटिना पराभूत
विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी
लापेझ, २ एप्रिल/पीटीआय
माजी जगजेत्या अर्जेन्टिनास आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या दक्षिण अमेरिकन पात्रता गटात बोलिव्हियाकडून १-६ असा दारुण पराभवाचा धक्का बसला. बोलिव्हियाच्या या विजयाचे श्रेय जॉकिम बोटेराच्या हॅट्ट्रिकला द्यावे लागेल. जगातील सर्वात थंड ठिकाणी असलेल्या हरनान्डो सिलेस स्टेडियमवर झालेल्या या एकतर्फी सामन्यात बोटेराने आक्रमक खेळाचा प्रत्यय घडवीत आपल्या संघास मोठा व सनसनाटी विजय मिळवून दिला.

तिसरी कसोटी जिंकण्यासाठी कोणताही धोका पत्करण्यास न्यूझीलंड तयार -व्हेटोरी
वेलिंग्टन, २ एप्रिल / पी. टी. आय.

भारताविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी न्यूझीलंडचा संघ आसुसला असून, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार आहे, असे कर्णधार डॅनियल व्हेटोरी याने कसोटीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितले.भारताविरुद्ध तीन कसोटींच्या मालिकेत न्यूझीलंड संघ ०-१ अशा पिछाडीवर पडला आहे. येथील तिसरी व मालिकेतील अंतिम कसोटी जिंकून बरोबरी साधण्याचा मनोदय व्हेटोरीने जाहीर केला.

एक झुंज वाऱ्याशी..
विनायक दळवी
मुंबई, २ एप्रिल

वेलिंग्टन बसीन रिझव्‍‌र्ह क्रिकेट ग्राऊंड म्हणजे सर्व बाजूंनी घोंगावणाऱ्या वाऱ्याचा एक प्रचंड कोलाहल. मैदानातल्या उभ्या खेळाडूंसह आजूबाजूचे वृक्ष सतत झुलते ठेवणाऱ्या या वाऱ्याचा भारतीय संघाने या वेळीही धसका घेतला आहे. मात्र या वेळी या संघाला धीर देणारा ज्येष्ठ खेळाडू सचिन तेंडुलकर संघात आहे. सचिनने आपल्या गतअनुभवावरून आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत.

१९६९ चा किवी चमू अवतरणार
वेलिंग्टन, २ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

४० वर्षांपूर्वीचा न्यूझीलंडचा राष्ट्रीय संघ वेलिंग्टनच्या बेसिन रिझव्‍‌र्ह स्टेडियमवर या आठवडय़ात पुन्हा अवतरणार आहे.. तत्कालिन कर्णधार ग्रॅहम डॉलिंग, ग्लेन टर्नर, डेल हॅडली आणि ब्रुस टेलर या रथी-महारथींची उपस्थिती सर्वच क्रिकेटरसिकांना थक्क करणार आहे.. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला ही मंडळी आवर्जून हजेरी लावणार आहे. १९६९च्या न्यूझीलंड संघातील ब्रुस मरे, मार्क बर्जेस, बेव्हन काँगडॉन, ब्रायन हास्टिंग्स, व्हि पोलार्ड, रिचर्ड कॉलिंगे, बॅरी मिलबर्न आणि ब्राय युली हे खेळाडूही यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यावेळच्या संघातील केन वॉडस्वर्थ, बॉब क्युनिस, हेडली होवार्थ, डिक मॉटझ् आणि व्यवस्थापक गॉर्डन बर्जेस हे खेळाडू मात्र आता स्वर्गवासी झाले आहेत. न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील तो एक महान संघ होता, अशा शब्दांत असोसिएशनचे अध्यक्ष डॉन नील यांनी कौतुक केले आहे.

धोनीबाबत अनिश्चितता कायम
न्यूझीलंड-भारत तिसरी कसोटी
वेलिंग्टन, २ एप्रिल / पीटीआय

तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मुकण्याची शक्यता आहे. परंतु भारतीय संघ व्यवस्थापन धोनीच्या खेळण्याबाबतचा निर्णय उद्या घेणार असल्याचे समजते. पाठीची दुखापत बळावल्यामुळे नेपियर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात धोनी खेळू शकला नाही. आता सुधारणा होत असली तरी उद्या खेळू शकेन की नाही हे सांगणे कठीण आहे, असे धोनीने सांगितले. माझ्या पाठीची दुखापत आता बरी होत आहे. आता सामन्याआधी पुन्हा आढावा घेऊन आम्ही निर्णय घेऊ, असे धोनी मिळाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्हाला ५०षटके यष्टीरक्षण करायचे असते. परंतु कसोटीत तुम्हाला किमान १२० षटकांसाठी तयार राहायचे असते. उद्या सकाळी माझी स्थिती पाहून याबाबत निर्णय घेता येईल, असे धोनी म्हणाला. धोनीच्या अनुपस्थितीत नेपियरमध्ये विरेंद्र सेहवागने नेतृत्वाची धुरा सांभाळताना कसोटी अनिर्णित राखण्याची किमया साधली होती. मी खेळेन अथवा खेळलो नाही, तरीही माझ्या अनुपस्थितीतसुद्धा संघ दुबळा होणार नाही, असे धोनीने सांगितले.

दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस ‘नंबर वन’साठी
दुबई, २ एप्रिल / पी. टी. आय.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला दरबान येथील लढतीने प्रारंभ होत असून, आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी दक्षिण आफ्रिका तर गमावलेले अव्वल स्थान पुन्हा मिळविण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ प्रयत्नशील असेल. या मालिकेमुळे पॉन्टिंगच्या संघाला दक्षिण आफ्रिकेला नमवून पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान व गतवैभव प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना ही मालिका जिंकावी लागेल, असे आयसीसीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ग्रॅमी स्मिथच्या संघाने ही मालिका ५-० अशी जिंकल्यास सहा गुणांच्या कमाईसह त्यांचे अव्वल स्थान अधिकच बळकट होईल; किंवा चार अथवा तीन सामने त्यांनी जिंकले. तरीही त्यांचे अव्वल स्थान कायम राहील. दोन-दोन विजयांसह ही मालिका बरोबरीत सुटली तरीही दक्षिण आफ्रिका आपले अव्वल स्थान कायम राखू शकेल; पण ऑस्ट्रेलियावरील त्यांची आघाडी ही केवळ एका गुणाची असेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा मायकेल हसी हा एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या यादीत महेंद्रसिंग धोनीला मागे टाकून अव्वल स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असेल. धोनी या यादीत १७ गुणांसह आघाडीवर आहे.

‘लॉर्डस्’वर पुन्हा अवतरणार लॉर्ड दिलीप वेंगसरकर
मुंबई, २ एप्रिल / क्री. प्र.

‘लॉर्डस्’ या क्रिकेटच्या मक्केवर सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकाविणारे दिलीप वेंगसरकर येत्या जून महिन्यात ‘लॉर्डस्’वर पुन्हा अवतरणार आहेत. निमित्त असेल ‘पेप्सी’ची ‘फस्ट बॉल का कॅप्टन’ ही प्रचार मोहीम. येत्या ५ ते २१ जून या कालावधीत इंग्लंडमध्ये ‘ट्वेण्टी-२०’ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तीन ठिकाणांसाठी पेप्सीने ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडरची नियुक्ती केली आहे. लॉर्डस्वरील सामन्यांचा अ‍ॅम्बॅसॅडर असेल. दिलीप वेंगसरकर १६ सुदैवी विजेत्यांपैकी एकेक जण सामन्याला सुरुवात होण्याआधी दिलीप वेंगसरकर यांना लॉर्डस्वर गोलंदाजी करील. त्यानंतर स्पर्धेच्या सामन्यांना सुरुवात होईल. लॉर्डस्वरील प्रत्येक लढतीआधी दिलीप वेंगसरकर यांना पेप्सीचा विजेता गोलंदाजी करणार आहे.नॉट्टींगहॅम येथील सामन्यांसाठी तेथील ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर असेल जॉण्टी ऱ्होडस् तर ओव्हलवरील सामन्यांसाठी पेप्सीच्या विजेत्याच्या गोलंदाजीचा सामना तेथील अ‍ॅम्बॅसॅडर वासीम अक्रम करणार आहे.

मतभेद विसरून चांगली कामगिरी करणार -गांगुली
कोलकाता, २ एप्रिल / पीटीआय

कोलकाता नाइट रायडर्सचे प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांच्याशी झालेले मतभेद विसरून आपण आय. पी. एल.च्या दुसऱ्या मोसमात चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे सौरव गांगुली याने म्हटले आहे. आय. पी. एल.च्या दुसऱ्या मोसमाला १८ एप्रिलपासून दक्षिण आफ्रिकेत प्रारंभ होणार आहे. क्रिकेटमध्ये कर्णधारपदावरून होणारा वाद नवीन नाही. बऱ्याच संघांच्या बाबतीत तो होतो आणि भविष्यातही घडत राहील, असे गांगुलीने म्हटले आहे. गांगुली पुढे म्हणतो एक व्यावसायिक क्रिकेटपटू या नात्याने सारे वाद विसरून दक्षिण आफ्रिकेत खेळण्यावर मी लक्ष केंद्रित करणार असून, त्याचा संघाच्या एकूण तयारीवर अजिबात फरक पडणार नाही. नाइट रायडर्स संघासाठी आम्ही करारबद्ध असून, प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे, अशी पुस्तीही त्याने जोडली आहे. संघाचे प्रशिक्षक बुकॅनन यांनी कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी एकापेक्षा अधिक कर्णधार हवेत असे सांगून खळबळ उडविली होती. मात्र यामुळे निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी नाइट रायडर्सच्या व्यवस्थापनाने मंगळवारी शाहरुख खानच्या घरी झालेल्या बैठकीत संघासाठी एकच कर्णधार असेल, अशी भूमिका जाहीर करून कर्णधार दक्षिण आफ्रिकेतच जाहीर करण्यात येईल, असे म्हटले आहे. गांगुली पाच एप्रिलला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.

सेरेनाची उपान्त्य फेरीत गाठ व्हीनसशी
सोनी एरिक्सन टेनिस
मियामी, २ एप्रिल / एएफपी

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने चीनच्या लि ना हिच्याशी लढतीत अथक झुंजीनंतर विजय मिळविताना सोनी एरिक्सन खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला एकेरीची उपान्त्य फेरी गाठली आहे. उपान्त्य फेरीत सेरेनाची गाठ पडेल ती बहीण व्हीनसशी. कालच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने पहिले पाचही गेम गमावल्यानंतर दमदार खेळाचे प्रदर्शन करीत लिचे आव्हान ४-६, ७-६ (७/१), ६-२ अशा फरकाने मोडीत काढले. तथापि, व्हीनस विल्यम्सने झेक प्रजासत्ताकच्या इव्हेटा बेनेसोव्हाचा ६-१, ६-४ अशा फरकाने पराभव करून उपान्त्य फेरी गाठली. लिविरुद्धच्या लढतीत सुरुवातील काय चुकीचे घडले, या प्रश्नाला उत्तर देताना सेरेना म्हणाली की, सुरुवात खडतर आणि धीमी झाली. पराभव होणार हे दृष्टीपथावर दिसू लागले. परंतु दुसऱ्या सेटमध्ये सर्व काही मनासारखे घडले. लिला सहा ब्रेक पॉइंटचे रुपांतर करण्यात अपयश आले.

सानिया-च्युआंग जोडीची उपान्त्य फेरीत धडक
कि बिस्केन/मियामी, २ एप्रिल / पीटीआय

एटीपी आणि डब्ल्यूटीए स्पर्धामध्ये आपली स्वप्नवन विजय घोडदौड कायम राखताना भारताच्या सानिया मिर्झाने तैवानच्या च्युआंग चिया-जंग साथीने द्वितीय मानांकित अनाबेल मेडिना गॅरिग्युएस आणि व्हर्जिनिया रुआनो पास्कल जोडीला ६-३, ७-६ (४) अशा फरकाने नमवून ४५ लाख अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या सोनी एरिक्सन खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला दुहेरी गटाची उपान्त्य फेरी गाठली आहे. भारत-तैवानच्या जोडगोळीने पहिला सेट सहज जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धी जोडीने दुसऱ्या सेटमध्ये दमदार झुंज दिली. अखेर टायब्रेकरमध्ये सानिया-च्युआंग जोडीने विजयाची मोहोर उमटविली. तिसऱ्या मानांकित क्वेटा पेस्के आणि लिसा रेमंड विरुद्ध रॉक्वेल कोप्स-जोन्स आणि अ‍ॅबिगेल स्पिअर्स या लढतीतील विजेत्यांशी सानिया-च्युआंग जोडीची उपान्त्य लढत होईल. उपउपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत सानिया आणि च्युआंग जोडीने आठव्या मानांकित मारिया किरिलेन्को आणि फ्लाव्हिया पेन्नेट्टा या जोडीचा तीन सेटमध्ये रंगलेल्या रोमहर्षक लढतीत धूळ चारली होती.

संक्षिप्त क्रीडावृत्त
अर्जेटिनाचा सर्वात दारुण पराभव
लापेझ : माजी जगजेत्या अर्जेन्टिनास आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या दक्षिण अमेरिकन पात्रता गटात बोलिव्हियाकडून १-६ असा दारुण पराभवाचा धक्का बसला. बोलिव्हियाच्या या विजयाचे श्रेय जॉकिम बोटेराच्या हॅट्ट्रिकला द्यावे लागेल. या एकतर्फी सामन्यात बोटेराने आक्रमक खेळाचा प्रत्यय घडवीत आपल्या संघास मोठा व सनसनाटी विजय मिळवून दिला. मार्सेलो मार्टिन्स, अ‍ॅलेक्स डीरोझा, दिड्डी टोरिको यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली.अर्जेन्टिनाचा एकमेव गोल लुईस गोन्झालिझ याने नोंदविला. फुटबॉलचा नामांकित खेळाडू दिएगो मॅराडोना यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेन्टिनाचा हा पहिलाच पराभव आहे. गेल्या ६० वर्षांमध्ये त्यांचा हा सर्वात दारुण पराभव आहे. मार्सेलो मार्टिन्सने १२ व्या मिनिटाला अर्जेन्टिनाचा गोलरक्षक जुआन पाब्लो कॅरिझो याला चकवीत बोलिव्हियाचा पहिला गोल केला. दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या अर्जेन्टिनाने गोल करीत बरोबरी साधली. २५व्या मिनिटाला गोन्झालिझ याने हा गोल नोंदविला.मात्र ही बरोबरी अल्पकाळ ठरली. ३४ व्या मिनिटाला बोटेरास सूर गवसला. त्याने मध्यंतरापूर्वी दोन गोल करीत संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात त्याने आणखी एक गोल केला. डीरोझा व टोरिको यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाची बाजू बळकट केली.

सायनाची आठव्या क्रमांकावर झेप
नवी दिल्ली : जागतिक कुमार विजेती खेळाडू सायना नेहवालने जागतिक बॅडिमटन क्रमवारीतील महिला एकेरीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तिने गतवर्षी राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेतही अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. ला गट्टा व व्ही. दिजू यांनी मिश्रदुहेरीत प्रथमच पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. त्याबाबत विचारले असता ज्वालाने सांगितले, आता पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविणे हेच आमचे नजिकचे ध्येय आहे. भारतीय खुल्या स्पर्धेतील विजेतेपदाने आम्हाला हुलकावणी दिली. मात्र आता विजेतेपद मिळविण्यासाठीच आम्ही प्रयत्न करु.ज्वाला गट्टा व व्ही. दिजू यांनी भारतीय खुल्या स्पर्धेतील मिश्रदुहेरीत चुरशीच्या लढतीनंतर पराभव स्वीकारला होता.

मुंबईच्या युवा प्रशिक्षणार्थीसाठी प्रवास भत्ता
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या १४ वर्षांखालील व १६ वर्षांखालील प्रशिक्षणार्थीसाठी वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंतच्या प्रवासासाठी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वयोगटाचे २५-२५ प्रशिक्षणार्थी या लाभासाठी पात्र ठरतील. या खेळाडूंना रेल्वेच्या पासासाठी हा भत्ता मिळणार आहे. वांद्रे रेल्वे स्थानक आणि कुर्ला स्थानकापासून वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत प्रशिक्षणार्थीना नेण्या-आणण्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सुर्वे-खर्गे अ‍ॅकॅडमीचे क्रिकेट प्रशिक्षण
मुंबई : सुर्वे-खर्गे अ‍ॅकॅडमीच्या वतीने ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर १५ एप्रिलपासून क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १८ या वयोगटांतील मुलांसाठी आयोजित या शिबिरात माजी रणजी खेळाडू तुकाराम सुर्वे आणि मुकुंद सतगुरू हे प्रशिक्षण देणार आहेत. दोन महिन्यांच्या या शिबिरासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी २५३८८८९० किंवा ६५७२४८७४ येथे संपर्क साधावा.