Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

मतदार निघाले गावाला..
शशिकांत कोठेकर

वातावरणातील उकाडा चांगलाच वाढू लागला असला, तरी राजकीय उन्हाळा म्हणावा तसा अद्याप तापलेला नाही. या आठवडय़ात उमेदवारांनी अर्ज भरले की, निवडणुकांच्या प्रचाराला रंग भरू लागेल. १५ एप्रिलपर्यंत शाळांच्या परीक्षा आटोपत आहेत. त्यानंतर मतदारांना घाई झाली आहे ती गावाकडे जायची. बहुसंख्य मतदार गावी जायची तयारी करू लागल्याने उमेदवारांचे टेन्शनह्ण अजून वाढत चालले आहे.

वालधुनी नदीतील रासायनिक दुर्गंधीने दहा जणांना बाधा
कल्याण/प्रतिनिधी - आज पहाटे कल्याणमधील वालधुनी नदीतून वाहणाऱ्या सांडपाण्यातून उग्र दुर्गंधी पसरल्याने या भागात राहणारे दहा रहिवासी अत्यवस्थ झाले. यामुळे कल्याण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना झोपेतच अस्वस्थ वाटू लागल्याने ते पहाटेच उठून दुर्गंधी कोठून येते म्हणून शोध घेत होते.

राष्ट्रवादीच्या विरोधामुळे शिंगडा यांची डोकेदुखी वाढली !
ठाणे/प्रतिनिधी

उमेदवार ठरविण्यासाठी अडचणीच्या ठरलेल्या पालघरमधून काँग्रेसने अखेर खासदार दामू शिंगडा यांनाच पुन्हा रिंगणात उतरविल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कमालीचे नाराज झाले असून आता आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. परिणामी काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

जिल्ह्यातील प्रश्न हाच युतीच्या प्रचाराचा अजेंडा
ठाणे/प्रतिनिधी

जिल्ह्यातील कुपोषण, पाणी, लोडशेडिंग, जिल्हा विभाजन, आरोग्य यांसारखे प्रश्न सोडविण्यात केंद्र आणि राज्य सरकारला सपशेल अपयश आले आहे. शिवसेनेने आता स्वत:च हे प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला असून ग्रामीण भागात तसे कामही सुरू केले आहे. जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न घेऊनच ही निवडणूक सेना- भाजप युती लढविणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

शिक्षण मंडळ घोटाळा
सूत्रधारांचे निलंबन रद्द करण्यासाठी मोर्चेबांधणी?
संजय बापट
ठाणे महापालिका शिक्षण मंडळातील मदतनीस नेमणूक घोटाळ्यातील निलंबित सूत्रधारांना पुन्हा कामावर घेण्याच्या, तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी दाबण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र पालिकेची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले तर आयुक्तांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने दिला आहे.

एस.टी. कामगारांसाठी रस्त्यावर उतरेन -नाईक
ठाणे /प्रतिनिधी
राष्ट्रीय एस.टी.कामगार काँग्रेसच्या संघटनेला मान्यताप्राप्त करणे व इतर मागण्यांकरिता प्रसंगी रस्त्यावर उतरून काम करेन, असे प्रतिपादन राष्ट्रवादी-काँग्रेस-आरपीआयचे उमेदवार संजीव नाईक यांनी एस.टी. कामगार काँग्रेसच्या बैठकीत केले. राष्ट्रीय एस. टी. कामगार काँग्रेस या इंटकप्रणीत संघटनेच्या विविध विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक वर्तकनगर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे, एस.टी.कामगार काँग्रेसचे ठाणे विभागीय अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, प्रादेशिक सचिव के. सी. शिंदे, मनोज प्रधान, सचिन शिंदे, सूर्याजी इंगळे, शांताराम चाळके, एस. एस. माने, सर्व विभागीय अध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.

ठाण्यात भव्य पुस्तक प्रदर्शन
ठाणे/प्रतिनिधी : विजय बुक सप्लायरतर्फे ठाणे येथे भव्य पुस्तक प्रदर्शन सुरू केले आहे. या प्रदर्शनात २० हजार पुस्तके असून, हे प्रदर्शन सकाळी ९.३० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयांवरील मान्यवर प्रकाशकांची व लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. पाककला, आरोग्य, छंद, वास्तू, संगीत, फॅशन, कादंबऱ्या, कथा, साहित्य, प्रवास वर्णन, चित्रकला, वारली पेंटिंग, ज्वेलरी, मेंदी आदी विषयांची मराठी, इंग्रजी पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालये, संस्था, ग्रंथालये यांना पुस्तक खरेदीत विशेष सवलत देण्यात येईल. हे प्रदर्शन मातोश्री गॅलरी, जांभळी नाका, गोखले हॉलच्या बाजूला, ठाणे (प.) येथे भरले आहे. संपर्क- अविनाश चौलकर-९८९२३३०८७९.

आगरी सेना पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
ठाणे/प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आगरी सेनेची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी आगरी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सायबा हॉल, मनीषानगर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आगरी युवा संघटना तसेच महिला कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मनाचे श्लोक व मारुतीस्तोत्र पाठांतर स्पर्धा
ठाणे: समर्थ फाऊंडेशन, ठाणे या संस्थेतर्फे रामनवमीनिमित्त ३ एप्रिल रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत मनाचे श्लोक व मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना एक ते १० मनाचे श्लोक आणि तिसरी व चौथीसाठी ११ ते २० मनाचे श्लोक व पाचवी, सहावी व सातवीसाठी संपूर्ण मारुती स्तोत्र पाठ करायचे आहे. बक्षिस समारंभ त्याच ठिकाणी स्पर्धा संपल्यानंतर माथेरानचे नगराध्यक्ष मनोज खेडेकर आणि उद्योजक दिलीप गुप्ते यांच्या हस्ते होणार आहे.

‘मानवी संबंधांचे विश्लेषण’वर व्याख्यान
मुंबई: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ३ एप्रिल रोजी ‘मानवी संबंधांचे विश्लेषण’ या विषयावर धनाजी जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६.३० वाजता सोशल सवर्िहस लीग हायस्कूल, दामोदर हॉलजवळ, परळ (पूर्व) येथे होणार आहे.

वैद्यकीय शिबीर
श्री साईनाथ सेवा ट्रस्ट व हिंदुजा इस्पितळातर्फे ५ एप्रिलला मोफत वैद्यकीय शिबीर प्रभादेवीत होणार आहे. कान, घसा, नाक, मोतीबिंदू तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दीपक भाटकर यांनी केले आहे.