Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कोऱ्या सातबारावर उद्धव ठाकरेंचे नाव लिहिणार का?
मेहकर / खामगाव, २ एप्रिल / वार्ताहर

गुजरात दंगलीमध्ये शंभर निरपराध लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या माया कोडवाणीला

 

न्यायालयाने तुरुंगात पाठवले आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा गुजरात करण्याची भाषा करतात पण, आम्हाला महाराष्ट्राचा गुजरात करायचा नाही, अशा जातीयवादी शक्तींना पायबंद घालण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मेहकर येथील स्वातंत्र्य मैदानावर आयोजित प्रचार सभेत केले.
अध्यक्षस्थानी काँग्रेसचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय अंभोरे होते. यावेळी अन्न व पुरवठा मंत्री रमेश बंग, आमदार सुभाष ठाकरे, कृषी शिल्पचे संचालक श्याम उमाळकर, माजी मंत्री सुबोध सावजी, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष तोताराम कायंदे आदी उपस्थित होते.
युपीए सरकारने शेतमालाला जादा भाव दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. मारुती गाडी घेण्यासाठी ८ टक्के व्याजदराने कर्ज बँका देतात. मात्र, शेतकऱ्यांना १२ टक्के दराने कर्ज दिले जात होते. तो बदल घडवून आणला. आता शेतकऱ्यांना ४ टक्के दराने कर्जपुरवठा करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची इच्छा होती पण, ३ लाख कोटीचे कर्ज माफ केले असते तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असती. म्हणून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील ८२ टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मार्ग काढला. ७० हजार कोटीचे कर्ज माफ केले. त्यानंतरही नियमित कर्ज भरणारे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला. असे असताना भाजप शिवसेना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाषा वापरतात. सातबारा कोरा करून त्यावर उद्धव ठाकरेंचे नाव लिहणार का! असा उपरोधिक टोला त्यांनी मारला. कर्जमाफीमुळे बुलढाणा जिल्ह्य़ाला सुमारे ३३५ कोटींचा फायदा झाला.
राज्यात युतीचे सरकार असताना भाजप-शिवसेनेने शेतकऱ्यांना एक रुपयासुद्धा दिला नाही. ते लबाड आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शरद पवारांनी मतदारांना केले. राजेंद्र शिंगणे दिवंगत भास्कररावांचा वारसा चालवत आहेत. ते आयाजी पाटील यांचे नातू आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार आयाजी पाटलांचे नातू म्हणून मतांचा जोगवा मागतात पण, आयाजी पाटलांनी आणि रूपराव पाटलांनी शरद पवारांची सोबत सोडली नाही, असे ते म्हणाले.
देशात स्थिर सरकार बनविण्यासाठी आघाडीलाच मते द्या, असे आवाहन शरद पवार यांनी खामगाव येथील जाहीर सभेत केले. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार दिलीप सानंदा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तोताराम कायंदे, प्रदेश प्रतिनिधी भास्कर काळे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तोताराम कायंदे यांनी केले. यावेळी कृषी शिल्प विकास केंद्राचे विभागीय संचालक श्याम उमाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांची भाषणे झाली.
विचारांची लढाई : शिंगणे
धर्मनिरपेक्ष शक्तीचा मी उमेदवार आहे. ही लढाई जात, पात, मित्र, नातेवाईक यांची नसून विचारांची आहे, असे प्रतिपादन उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. गेल्या ४० वर्षांत शरद पवार यांनी केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मतदारांवर आली आहे. राष्ट्रवादीला मतदान करा व संसदेत काम करण्याची संधी द्यावी, अशी विनवणी त्यांनी यावेळी केली.
पवारांचा सवाल
‘वरून’ गांधी ‘आतून’ अडवाणी
वरुण गांधी निरपराध असल्याची जोरदार खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बुलढाणा जिल्ह्य़ातल्या मेहकर येथे उडवली. ते वरून गांधी असले तरी आतून मात्र पक्के अडवाणी आहे, असे शरद पवार म्हणाले.
..तर जाहीर फाशी घेईल- सावजी
मेहकर मतदारसंघातून डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३० हजार मतांचे मताधिक्य दिले नाही तर याच स्वातंत्र्य मैदानावर पवारांच्या साक्षीने जाहीर फाशी घेईल, असे माजी मंत्री सुबोध सावजी म्हणाले.