Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पुलगावातील उड्डाण पुलासाठी जागेचे दोन प्रस्ताव
पुलगाव, २ एप्रिल / वार्ताहर
पुलगाव आर्वी रस्त्यावर मिलसमोरील रेल्वे क्रॉसिंगवरील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या बांधकामास

 

रेल्वे अर्थ संकल्पात तत्त्वत: मंजुरी प्रदान करण्यात आली असली तरी या उड्डाण पुलाची जागा निश्चिती मात्र झालेली नाही. या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेचे दोन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले असून जागा निश्चितीवर अद्याप शिक्कामोर्तब होणे तेवढे बाकी आहे. नगरातील वाहतूक कोंडीबाबत ‘लोकसत्ता’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुन्हा हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले. विदर्भ विकासाच्या सुधारित कामांतर्गत महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २००० मध्ये खासगीकरणाच्या माध्यमातून पथकर लावून या उड्डाण पुलाचे काम प्रस्तावित होते. रेल्वे क्राँसिंगवर १ लाखापेक्षा जास्त टीव्हीयु असल्याने आता रेल्वेने पुलाच्या कामापैकी ५० टक्के खर्च करण्याचे मान्य करून या खर्चास अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.
प्रस्तावित उड्डाण पुलासाठी २८ कोटी खर्चाचा आराखडा आखण्यात आला असून या उड्डाण पुलाची उंची साडेआठ मीटर इतकी राहील. ९० मीटर सपाटीकरण व उताराचा दोन्ही बाजूंचा विचार विमर्श सुरू आहे. एका आराखडय़ात आर्वीकडील रस्त्यावरचा उतार वर्धा नदीकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत दाखविण्यात आला असून मिल समोरचा उतार जुन्या विमा दवाखान्यापर्यंत दाखविण्यात आला आहे तर दुसऱ्या आराखडय़ात हा उतार शून्यवर ग्रामीण रुग्णालयापर्यंत असेल; परंतु या दोन्ही आराखडय़ावर अद्याप एकमत झाले नाही. या सोबतच टिळक चौकाचे सौंदर्यीकरण व विस्तारीकरण याबाबीही यात समाविष्ट आहेत. प्रस्तावित उड्डाण पूल रेल्वे क्रॉसिंगवर मोठय़ा दोन खांबावर अधांतरी राहणार असून या पुलाच्या उतारास खाली दोन्ही बाजूने ५-५ खांब असतील.
गेल्या २४ मार्च २००८ ला महामंडळाने सुचविलेल्या प्रस्तावात संशोधन करून प्रस्तावास मंजुरी दिली आहे. सुधारित प्रस्तावानुसार उड्डाण पुलाची किंमत २८ कोटी असून यात रेल्वे विभागाचा सहभाग १० कोटींचा असेल. रेल्वे विभागाने या प्रस्तावित उड्डाण पुलास अर्थसंकल्पात मंजुरी प्रदान केली असून प्रस्तावित दोन आराखडय़ांपैकी एक जागा निश्चित झाल्यानंतर या कामास खऱ्या अर्थाने गती येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.