Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महिलांनी आर्थिक क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे- जुल्फी शेख
शेतकरी महिला मेळावा
भंडारा, २ एप्रिल / वार्ताहर

कृषी बचत गटातील महिलांनी आर्थिक क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे व स्वावलंबी बनावे, असे आवाहन

 

प्राचार्या डॉ. जुल्फी शेख यांनी येथे केले.
कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय व संकल्प वर्धिनी ग्रामीण युवा संस्थेच्यावतीने खापा येथे आयोजित शेतकरी महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याला ५०० महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
कृषी क्षेत्रात महिलांचा अधिक सहभाग वाढविण्याच्या योजनेंतर्गत कृषी बचत गटातील महिलांचा हा मेळावा झाला.अध्यक्षस्थानी एस.जी. वासनिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मधुलता व्यास, प्रा. पद्मा नागदेवे, राजू माटे, प्रिया शहारे, रवींद्र खोब्रागडे, प्रा. राजकुमार उके, हरेंद्र उके, विमल खोब्रागडे उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. राजकुमार उके यांनी केले. महिला मेळाव्यात एस.एन. वासनिक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. जुल्फी शेख यांचा सत्कार संस्थेच्यावतीने विशाखा उके यांनी शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन केला.
तुमसर तालुक्यातील ५० महिला बचत गटातील महिलांनी कृषी उत्पन्नावर आधारित वस्तुंचे ३० स्टॉल व प्रदर्शन लावलेले होते. संस्थेद्वारे भाजीपाला व फळ प्रदर्शन, कृषी तंत्रज्ञान वस्तू प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, गावपातळीवर घेतलेल्या प्रशिक्षकांचे छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. महिलांनी गांडूळ खत, जैविक खत विक्री, सेंद्रीय खत, मेणबत्ती, अगरबत्ती, मोहफूल व पळसबाग प्रक्रिया, चहा पावडर स्टॉल, फॅशन वस्तू निर्मिती रेडिमेड कापड निर्मिती व विक्रीचे स्टॉल लावले होते. याप्रसंगी डॉ. मधुलता व्यास यांनी महिलांनी उद्योगाकडे वळावे, असे आवाहन केले. राजू माटे यांनी महिला अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रिया शहारे यांनी महिलांना अधिक प्रगती करण्यासाठी आर्थिक क्षेत्रात सहभागी व्हावे व स्वयंपूर्ण व्हावे, असे मत मांडले.
मेळाव्यात महिलांनी अनुभव कथन कार्यक्रमात आपले विचार मांडले. शंका समाधानासाठी प्रश्नोत्तर चर्चाही झाली. मेळाव्यात समूहगीत, गायन, पथनाटय़, एकांकिका आदी कार्यक्रम सादर केले गेले. संचालन अशोक डोंगरे यांनी केले. आभार अशोक बौद्ध यांनी मानले.