Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. विजय आईंचवार यांचा चंद्रपुरात सत्कार
चंद्रपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

जीवनात यश मिळवायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागेल याची जाणीव ठेवून सुरुवातीचा

 

प्रवास पूर्ण केला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास, प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या बळावरच यश प्राप्त करू शकल्याचे प्राचार्य डॉ. विजय आईंचवार यांनी येथे स्पष्ट केले.
सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय आईंचवार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त सवरेदय शिक्षण मंडळाच्यावतीने डॉ. विजय आईंचवार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
महाविद्यालयातील राजेश्वर पोटदुखे सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री व सवरेदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते.
याप्रसंगी व्यंगचित्रकार मनोहर सप्रे, संस्थेचे कार्याध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, प्रभाकर मामुलकर, उपाध्यक्ष मदन धनकर, उपाध्यक्ष रमेशपंत मामीडवार, सहसचिव प्रशांत पोटदुखे, डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, डॉ. आईंचवार यांचे वडील सांबशिव आईंचवार, आई लक्ष्मी, पत्नी वर्षां प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. आईंचवार म्हणाले की, वाईट गोष्टीतून सदैव चांगली गोष्ट घडते. त्यावर माझा विश्वास आहे. संस्थेचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे यांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा मी सदैव प्रयत्न केला. आई-वडिलांचा आशीर्वाद, पत्नीची साथ या गोष्टी यशासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचा उल्लेखही त्यांनी बोलताना केला.
मनोहर सप्रे म्हणाले की, प्राचार्य डॉ. आईंचवार हे एका नाटकातून दुसऱ्या नाटकात भूमिका साकारण्यासाठी जात आहेत. आता त्यांना जोमाने आर्थिक, औद्योगिक क्षेत्रात काम करावयाचे आहे. कामे करणारा माणूस हा कधीही सेवानिवृत्त होत नाही. शांताराम पोटदुखे म्हणाले की, सेवानिवृत्तीच्या वेळीही डॉ. आईंचवार यांच्यात प्रचंड कार्यक्षमता, आत्मविश्वास दिसतो आहे ही महत्त्वाची बाब आहे.
महाविद्यालयातील यशात प्राचार्याची भूमिका निश्चितच महत्त्वाची असते. डॉ. आईंचवार यांचादेखील सरदार पटेल महाविद्यालयाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असल्याचा उल्लेख केला. ‘विजयपथ’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन मनोहर सप्रे यांच्या हस्ते करण्यात आले. सवरेदय शिक्षण मंडळाच्यावतीने डॉ. आईंचवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, प्राचार्य डॉ. अंजली हस्तक, प्रा. डॉ. सुनील साकुरे, उपप्राचार्य डॉ. एल.व्ही. शेंडे, उपप्राचार्य देवराव कुटेमाटे, प्रबंधक सुधीर देवांग, प्रा. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी डॉ. आईंचवार यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला डॉ. आईंचवार यांचे पुत्र पराग आईंचवार उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य मदन धनकर, संचालन डॉ. राजलक्ष्मी कुळकर्णी यांनी केले. आभार डॉ. जे.ए. शेख यांनी मानले.