Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मेहकर लोकन्यायालयात १५८ प्रकरणे निकालात
मेहकर, २ एप्रिल / वार्ताहर

मेहकर दिवाणी व फौजदारी न्यायालयात महालोकन्यायालय आयोजित करण्यात आले. या

 

लोकन्यायालयाच्या आयोजनानिमित्त न्या. एस.पी. केकान, न्या. सी.एस. बाविस्कर, न्या. स्मिता चावरे, अ‍ॅड. श्याम काळे यांनी विविध प्रकरणातील पक्षकारांना मार्गदर्शन केले.
पक्षकारांनी वेळेचा अपव्यय न करता प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्यास दैनंदिन जीवनात ताणतणाव कमी होऊन समाजात पत देखील निर्माण होते, असेही यावेळी सांगण्यात आले. तडजोडीने प्रकरणे मिटवण्यासाठी अशा प्रकारे मार्गदर्शन मिळाल्याने जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघण्यासाठी मदत झाली.
यावेळी मोटार अधिनियमांतर्गत ११७ प्रकरणांची तडजोड होऊन १ लाख २० हजार १०० रुपये वसूल झाले. अनादर झालेल्या धनादेशाची ११ लाख ४८ हजार ३५८ रुपयांची २६ प्रकरणे निकालात निघाली. एकंदर महालोकन्यायालयात या प्रमाणे १२ लाख ६८ हजार ४५७ रुपयांची एकूण १५८ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली निघाली.
लोकन्यायालयात एकूण तीन पंचमंडळे नियुक्त करण्यात आली होती. प्रमुख पंच म्हणून न्या. केकान, न्या. बाविस्कर, न्या. स्मिता चावरे यांनी तर पंच म्हणून अ‍ॅड. कानोडजे, अ‍ॅड. श्याम काळे, पी.आर. चोपडा, विष्णू सरदार, अंभोरे, तनपुरे यांनी मार्गदर्शन करून काम पाहिले.
अ‍ॅड. के.के. देशमुख, अ‍ॅड. यु.बी. देशमुख देखील यावेळी उपस्थित होते. लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.