Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

साकोलीतील महात्मा गांधींचा पुतळा हटवणार
साकोली, २ एप्रिल / वार्ताहर

पंचायत समिती कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गालगतच महात्मा गांधींचा पुतळा हटवून आता

 

पंचायत समितीच्या आवारात बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गालगतच्या महात्मा गांधी पुतळ्याचे स्थानांतरण पंचायत समितीच्या आवारात करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार समितीचे अध्यक्ष प्रभाकर सपाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
त्या निवेदनाची दखल प्रशासनाने घेतली असून तसे पत्र जिल्हाधिकारी यांनी सपाटे व उपविभागीय अधिकारी यांना पाठविले आहे.
महात्मा गांधी यांचा हा पुतळा जीर्ण झाला असून पुतळ्याला भेगाही पडल्या आहेत. मार्च महिन्यातच या पुतळ्याचा उजवा हात खंडित झाला होता. सध्या साकोली येथे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
या चौपदरीकरणाच्या कामानंतर गांधीजींचा पुतळा रस्त्याच्या अगदी जवळ येणार असल्याने या पुतळ्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा पुतळा चौपदरीकरणाच्या आधीच हटवण्याची मागणी सपाटे यांनी शासनाला केली होती. या मागणीची दखल घेत त्वरित या पुतळ्याच्या स्थानांतरणाचा अहवाल तयार करून राज्य शासनाला पाठविण्याचे यावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.