Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दोन बसची धडक; उमेदवारासह १२ जखमी
भद्रावती, २ एप्रिल / वार्ताहर
एका एसटी बसने दुसऱ्या बसला धडक दिल्याने १२ प्रवासी जखमी झाले. यात चंद्रपूर लोकसभा

 

मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा समावेष आहे. सर्व जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावर येथून ५ कि.मी. अंतरावरील बरांज जवळच्या कर्नाटका एम्टा कोळसा खाणीजवळ आज दुपारी २ वाजता झाला. अमरावती-चंद्रपूर ही एम.एच. ४०-९८३० क्रमांकाची बस चंद्रपूरकडे जात असताना मागावून येणाऱ्या नागपूर-राजुरा या एम.एच. ४०-८४३६ क्रमांकाच्या बसने पुढे जाण्याच्या प्रयत्नात मागावून जोरदार धडक दिली. यात दोन्ही बसचे बरेचसे नुकसान झाले.
नारायण शाहू गोडे (४२) कोसारा त. वणी, अपक्ष उमेदवार आनंदराव सहदेव (२१) भद्रावती, प्रशांत विश्वनाथ रामटेके (२१) भद्रावती, भोजराज यादव कुमरे (३४) रा. मांगा गडचिरोली, रवींद्र महादेव चौधरी (२८) हिंगणघाट, सुभाष बबन सोमणकर (२५) डोंगरगाव वणी, तृप्ती शामराव कुमरे (२२) वणी, धर्मराज रामप्यारे मिश्रा (५२) बल्लारपूर, राजू बालाजी वैद्य (२०) वणी, रामभाऊ गुलाब ढगे (२५) चंद्रपूर, विजय लालचंद मंगलानी (५२) बालाघाट (म.प्र.), करमसिंग स्वर्णसिंग (४५) रय्यतवारी, चंद्रपूर यांचा समावेश आहे. यात काही प्रवाशांचे हात तर काही प्रवाशांचे दात तुटले. अमरावती-राजुरा बसमध्ये ३० तर नागपूर-राजुरा बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करीत होते.
बसचा चालक भोजराज कुमरे हा जखमी झाला असून त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.