Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचारात सुरेश वाघमारेंचा ‘एकला चालो रे’
प्रशांत देशमुख, वर्धा, २ एप्रिल
संपूर्ण मतदारसंघात भाजप आघाडीच्या आमदारांची अनुपस्थिती, जिल्हा परिषद व पालिका

 

सदस्यांचे तुटपुंजे पाठबळ, पक्षांतर्गत नाराजी असतानाच दत्ता मेघेंसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्याशी लढत देताना भाजपचे सुरेश वाघमारेंना प्रचारात ‘एकला चालो रे’चा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
पक्षश्रेष्ठींपुढे ९० टक्के पदाधिकाऱ्यांनी यावेळी वाघमारेंना ‘उमेदवारी नको’चा जाहीर बिगुल फुं कल्याची बाब अद्याप ताजीच आहे. मात्र मुंडे-गडकरी वादात मुंडेंची साथ देणाऱ्या वाघमारेंनी उमेदवारी मिळवलीच. प्रचाराचा नारळ फ ोडत काम सुरू केले. मात्र पक्षांतर्गत असंतुष्टांचा रुसवा अद्याप कायमच असल्याने दिमतीला नवे साथीदार घेत वाघमारे स्वत:चा बुरूज सांभाळत आहेत. १९९१ पासून भाजप वर्धा मतदार संघात लढत आहे. मात्र याचवेळी पक्षाच्या उमेदवारावर ‘एकला चालो रे’ची आपत्ती ओढवली आहे.
या बाबीचे सर्वात दर्शनी चिन्ह म्हणजे गतवेळच्या निवडणुकीत वाघमारेंचे प्रचार प्रमुख जिल्हा सरचिटणीस माधव कोटस्थाने हे होते. त्यांनीच वाघमारेंच्या प्रचाराची व पुढे विजयासाठी शर्थ केली होती. एवढेच नव्हे तर वाघमारेंना पक्षाचा उमेदवार करण्यात कोटस्थाने-कावळे जोडीचा मोठा वाटा होता. यावेळी नाराजीचा झेंडा फ डकवल्यानंतर हे सूत्रधार प्रचारातून अदृश्यच झाले आहेत.
या बदलाच्या पाश्र्वभूमीवर वाघमारेंनी संघ परिवारातील अविनाश देव यांच्या हाती प्रचाराची सूत्रे सोपवली. पक्षाचे काही जि.प. सदस्य अद्याप पडदा घेऊनच आहेत. गतवेळी वाघमारेंना हिंगणघाटचे अशोक शिंदे व तिवसाचे प्रा. साहेबराव तट्टे यांची या दोन विधानसभा मतदार संघात मोठी मदत झाली होती. प्रभा राव यांना पराभूत करण्यास हिंगणघाट-तिवसा मतदार संघाने दिलेले भक्कम मताधिक्य कारणीभूत ठरले होते.
यावेळी शिंदे माजी आमदार आहेत. तर प्रा. तट्टेंचा विधानसभा मतदार संघ वध्रेऐवजी अमरावतीत गेला आहे. या लोकसभा मतदार संघात प्रमोद शेंडे, रणजित कांबळे, अमर काळे, राजू तिमांडे, वीरेंद्र जगताप व हर्षवर्धन देशमुख असे सहाही आमदार काँग्रेस आघाडीचे म्हणजेच भाजप आघाडी विरोधातील आहेत. अमरावती जिल्हा परिषदेत आमदार हर्षवर्धन देशमुख गट तर वर्धा जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडी म्हणजेच भाजप विरोधकच सत्तेवर आहेत. धामणगाव वगळता पालिका हातात नाही. अशास्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती वाघमारेंचे भविष्य असल्याचे स्पष्ट होते. अमरावती मतदार संघात भाजप नेते अरुण अडसड तर वर्धा जिल्ह्य़ात मित्रपक्ष सेनेचे अशोक शिंदे हे दोनच बडे नेते प्रचारात आहेत.
मेघेंचा धडाकेबाज प्रचार, त्यांच्या मित्रपक्ष नेत्यांची अद्याप असलेली सक्रिय हजेरी व वाघमारेंच्या विरोधातील ‘अ‍ॅन्टी इकंम्बसी’ असे अडथळे पार करीत वाघमारेंना कार्यकर्त्यांना उर्मी द्यावी लागत आहे. खासदार वाघमारे जिल्हाध्यक्ष डॉ. नारायण निकमांना घेऊनच गावोगावी प्रचारात असल्याचे सध्याचे चित्र आहे. प्रचाराची ‘झिंग’ कार्यकर्त्यांना चढावी म्हणून दोन ‘तोफो’ वाघमारेंसाठी गरजणार आहे. युतीत भाजपच्या वाटेला येणाऱ्या देवळी व आर्वीत या दोन विधानसभा मतदार संघात तोफो धडाडतील. ४ एप्रिलला मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आर्वीत व ६ एप्रिलला गोपीनाथ मुंडे देवळीत भाजपचा प्रचार करणार आहेत. प्रदेश पदाधिकारी आमदार विनोद तावडे तासाभराच्या धावत्या भेटीत ‘धनशक्ती विरोधात जनशक्ती’ अशी वर्धेतील लढाई असल्याचे सांगून गेले. त्यामुळे जनांची शक्ती प्रचारात दाखविण्याची बाब वाघमारेंसाठी सध्या आव्हानच ठरल्याचे दिसून येत आहे.