Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

फक्त पैशाने कमी पडलो..
"रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात मोजक्या वेळा अभिमानास्पद प्रसंग आले आहेत. मी निवडणूक

 

लढवली तेव्हा असेच झाले होते. रिपब्लिकन ऐक्याचा रेटा असल्यामुळे सारे वातावरण भारलेले होते. त्यामुळेच माझी निवडणूक लक्षात राहण्यासारखी झाली. फक्त पैशाने मी कमी पडलो.." नागपुरातून १९९६ साली रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणूक लढवलेले आणि उल्लेखनीय मते घेऊन मुख्य लढतीत आलेले उमाकांत रामटेके सांगत होते.
"माझ्या उमेदवारीला विशिष्ट पाश्र्वभूमी होती. ६ डिसेंबर १९९५ला चैत्यभूमीवर आंबेडकरी जनसमुदाय एकत्र जमला होता. रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट विसरून एक व्हा, असा रेटा या जनतेने नेत्यांमागे लावला. पक्षाचा एक नेता मान्य होणे शक्य नसल्यामुळे नऊजणांचे अध्यक्षीय मंडळ तयार करण्यात आले. या प्रक्रियेत सामील नसलेल्या आमच्या गटाला (खोरिप) ऐक्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे आमचे तेव्हाचे अध्यक्ष शिवराम मोघा यांनाही मंडळात घेण्यात आले."
"लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्या. तेव्हा या एकीकृत पक्षाच्या राज्यातील मोठय़ा शहरांमध्ये निर्धार सभा घेण्यात आल्या. अशीच सभा नागपुरात कस्तुरचंद पार्कवर झाली. तिचा अध्यक्ष मी होतो. या दरम्यान एकीकृत पक्षाने राज्यात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही राज्यात ११ जागा लढवल्या. सर्व जागी आमचे उमेदवार पडले, तिघांचे डिपॉझिट जप्त देखील झाले. मात्र प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यतेसाठी ४ टक्क्यांची अट होती, ती मी पूर्ण केली. २२ वर्षांनंतर ही मान्यता आम्हाला पुन्हा मिळाली आणि ‘उगवता सूर्य’ हे निवडणूक चिन्हही मिळाले."
"नागपूर हा खोरिपचा बालेकिल्ला असल्यामुळे येथून खोरिपचा उमेदवार लढेल असा निर्णय झाला. उमेदवार म्हणून माझे नाव एकमताने ठरले. मला लोकांचा प्रतिसाद भरपूर मिळत होता. परंतु एवढय़ा मोठय़ा मतदारसंघाच्या मानाने साधने, पैसा, संपर्क यात मी कमी पडत होतो. प्रचारासाठी माझ्याजवळ फक्त एक मारुती व्हॅन होती. त्यातून फिरून मी प्रचार करत असे. जोगेंद्र कवाडे, वासुदेव गाणार माझ्या प्रचारासाठी फिरले. परंतु गंमत म्हणजे माझ्या प्रचार सभा होऊ शकल्या नाहीत. फक्त एक प्रचार सभा मोमीनपुऱ्यात झाली आणि तीत ए.बी. बर्धन आले होते. पक्षाचे नेते आम्ही लढत असलेल्या इतर जागांवर प्रचारात गुंतले होते. त्यामुळे माझ्यासाठी सभा घेण्यास कुणीच येऊ शकले नाही."
"मी उमेदवारी मागे घ्यावी असा प्रयत्न काँग्रेसने केला. तेव्हा, इतर ठिकाणी काँग्रेसला आम्ही पाठिंबा देतच आहोत; इथे आमची शक्ती असल्यामुळे तुम्हीच आम्हाला पाठिंबा देऊन माघार घ्या असे उत्तर मी दिले. तेव्हा तो विषय संपला. मी प्रचारासाठी फिरायचो तेव्हा, ‘पाहा यांचे डिपॉझिट जप्त होणार’, असा उपहास लोक करायचे."
"अशाही स्थितीत मी शक्य तेवढे फिरलो, मेहनत घेतली. नागपुरात दलित मते मोठय़ा संख्येत आहेत, शिवाय ऐक्य व्हावे ही जनतेची भावना होती. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद प्रचंड मिळाला. एकाही कार्यकर्त्यांने मला प्रचारासाठी पैसा मागितला नाही. पुरुष, महिला यांनी स्वयंस्फूर्तीने माझा प्रचार केला. पराभव होणार हे कळत होते, पण लोकांकडून सन्मान मिळाला. सर्वांच्या अंदाजापेक्षा जास्त, म्हणजे १ लाख ६२ हजार २३५ मते मला मिळाली. दोन लाखापर्यंत मते मिळतील असे मला वाटत होते. पण मुस्लिम मतांसाठी काँग्रेसने गुलाम नबी आझाद यांची सभा घेतली. अखेरच्या टप्प्यात काँग्रेसतर्फे अभिनेते दिलीपकुमार यांचीही चिटणीस पार्कवर सभा झाली. त्यामुळे माझी मुस्लिम मते माघारली."
"मतमोजणीसाठी सर्वच पक्षांचे निवडणूक प्रतिनिधी थांबतात. परंतु मी जिंकत नाही हे पाहून माझे कार्यकर्ते नव्‍‌र्हस होऊन निघून आले. त्यामुळेही १०-१५ हजार मतांचा फरक पडला असावा असे मला वाटते. नागपूर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत, असा फरक पडण्याचा अनुभव मला आला होता."
"ही निवडणूक तर झाली. पण मला अजूनही वाटते, १९९८ साली काँग्रेसच्या मदतीने रिपब्लिकन नेत्यांनी अमरावती, अकोला व चिमूर या जागा जिंकल्या. त्या परिस्थितीत नागपूरची जागाही पदरी पाडून लढता आली असती. त्यामुळे एकत्र येऊन आम्ही चार जागा जिंकल्या असत्या. नागपुरात रिपब्लिकन नेते हरिदास आवळे लोकसभेची पोटनिवडणूक लढले, त्यावेळी खोरिप ही जागा जिंकण्याची शक्यता होती, पण दुर्दैवाने त्यांचे प्रचारादरम्यान निधन झाले. आम्ही एक नाही, म्हणूनच तर इतर पक्षांचा फायदा होतो. आजही तेच चित्र आहे."
शब्दांकन : मनोज जोशी