Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात उमेदवारांची प्रचारात दमछाक
सुरेश सरोदे, गडचिरोली, २ एप्रिल

गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्य़ात पसरलेला गडचिरोली-चिमूर हा लोकसभा

 

मतदारसंघ भौगोलिक दृष्टय़ा आकाराने संपूर्ण राज्यात विस्तीर्ण असल्याने हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणे उमेदवारांसाठी अवघड ठरणार आहे. त्यातल्या त्यात प्रचारासाठी आता केवळ १२ दिवस उरल्याने या मतदारसंघातील १२ लाख ८९ हजार ८०० मतदारांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्क साधण्याचे मोठे आवाहन उमेदवारांसमोर आहे. विशेष बाब म्हणजे या मतदारसंघातील ४ विधानसभा मतदारसंघ नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे ग्रस्त आहेत.
परिसीमन आयोगाने लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना केल्यानंतर गडचिरोली-चिमूर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्य़ात पसरलेल्या या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी, चंद्रपूर जिल्ह्य़ातील चिमूर आणि ब्रह्मपुरी, गोंदिया जिल्ह्य़ातील आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला असून हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आला. या मतदारसंघात गोंदिया जिल्ह्य़ाच्या आमगाव विधानसभा मतदारसंघातील आमगाव, देवरी आणि सालेकसा हे तीन तालुके चंद्रपूरच्या चिमूर विधानसभा मतदारसंघातील चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगाव महसूल सर्कल ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी व गांगलवाडी महसूल सर्कल, गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची हे चार तालुके व धानोरा तालुक्यातील मुरूमगाव महसूल सर्कल गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील गडचिरोली, चामोर्शी, धानोरा हे तीन तालुके धानोरा तालुक्यातील (धानोरा व चातगाव सर्कल) अहेरी विधानसभा मतदारसंघातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याने हा मतदारसंघ भौगोलिकदृष्टय़ा विस्तीर्ण झालेला आहे.
आमगाव विधानसभा मतदारसंघाला मध्यप्रदेशातील बालाघाट व छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्य़ाची सीमा लागून आहे. तर गडचिरोली मतदारसंघाच्या दक्षिणेस आंध्रप्रदेश व छत्तीसगडची सीमा लागून आहे. सालेकसा तालुक्यातील सोमनूपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला असून या मतदारसंघाची लांबी साधारणत: ६०० किमी. तर रुंदी २२५ किमी. एवढी आहे. गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघाचा एवढा विस्तीर्ण भौगोलिक आकार पाहता येत्या १२ दिवसांत उमेदवारांची प्रचारात मोठी दमछाक होणार असून प्रचाराचा पहिला टप्पाही उमेदवार गाठू शकणार की नाही याबाबत शंका आहे. त्यातल्या त्यात या मतदारसंघातील सिरोंचा, गडचिरोली, आरमोरी आणि आमगाव हे चार विधानसभा मतदारसंघ नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे त्रस्त आहेत. या लोकसभा मतदारसंघात जवळजवळ ५० टक्के मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या पाश्र्वभूमीवर येत्या १२ दिवसांत दर दिवशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या एक लाख मतदारांशी संपर्क साधण्याचे मोठे आवाहन उमेदवारांसमोर असून हे आवाहन त्यांनी पेलले तरच प्रचाराचा एक टप्पा पूर्ण होऊ शकेल.