Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘पोटाला अन्न, हाताला काम’
चांदूर बाजार/अंजनगाव सुर्जी, २ एप्रिल/ वार्ताहर

सरकार हे देश घडवण्यासाठी असते, तोडण्यासाठी नसते. पोटाला अन्न व हाताला काम देण्याचीच

 

आमची भूमिका आहे. देश घडवणारे हवेत की मोडणारे हे, तुम्हालाच ठरवायचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संगेकर सभागृहात आयोजित काँग्रस -राकाँ- रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.
काँग्रेस- राष्ट्रवादी- रिपाइं आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भुजबळ बोलत होते. आम्ही हाताला काम देतो तर विरोधक म्हणतात हात तोडून टाकू. आज समाजाला विकासाची गरज आहे. पोटाला अन्न व हाताला काम देण्याची गरज आहे, असे सांगून गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्य शासनाने सामान्य माणूस, शेतकरी व मुस्लिमांना दिलेल्या विविध सवलतीचा पाढा वाचला. यात त्यांनी सोनिया गांधी, मनमोहनसिंग, शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.
प्रहार संघटनेचा उल्लेख त्यांनी ‘हार’ संघटना असा केला. यावर सभामंचावरील उपस्थितांनी त्यांना ती संघटना प्रहार असल्याची जाणीव करून दिली. त्यांनी डॉ. राजेंद्र गवई यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले.
तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांनी विचार व्यक्त केले. या कार्यकर्ता मेळाव्याचा आमदार हर्षवर्धन देशमुख, विलास इंगोले, डॉ. गणेश खारकर, मनीष नांगलिया, भास्करराव ठाकरे, प्रदीप वडनेरे, बबलू देशमुख, प्रताप अभ्यंकर, रामभाऊ देशमुख, नंदकिशोर वासनकर, रमेशपंत देशमुख, रावसाहेब लंगोटे, नितीन कोरडे आदी परिसरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अमरावती मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी मी जनतेचे काम नाही केले तर माझ्या घरासमोर आंदोलन करा. मात्र, ज्यांचे येथे घरच नाही तर कोणासमोर आंदोलन कराल, असा सवाल करून अप्रत्यक्षरीत्या बाहेरच्या उमेदवारावर टीकास्त्र सोडले. यावेळी संगेकर सभागृह कार्यकर्त्यांची गर्दी होती.
अंजनगाव सुर्जी येथेही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सभा झाली. सभेत आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार सुलभा खोडके, डॉ. राजेंद्र गवई, रामेश्वर अभ्यंकर यांची भाषणे झाली. व्यासपीठावर माजी आमदार रावसाहेब हाडोळे, अनंतराव साबळे, डॉ. शंकरराव बोबडे, रमेश कुथे, सुरेश आडे, स्वाती वाघमारे आदी उपस्थित होते.