Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीमुळे खादीच्या कपडय़ांची मागणी वाढली
नागपूर, २ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जसजसा जोर चढत आहे तशी स्वदेशी खादी कपडय़ांना

 

बाजारात चांगली मागणी दिसून येत आहे. नेत्यांसोबत प्रमुख कार्यकर्त्यांची संख्या वाढली. नेत्यांसोबतजाहीर सभा किंवा बैठकीला जात असताना आपलाही पोशाख नेत्यांसारखा खादीचा असावा म्हणून अनेक कार्यकर्ते खादीचे कपडे घालून नेत्यांच्या मागे मिरवत असतात.
एरवी खादीचे कपडे स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, ऑगस्ट क्रांती दिन अशा प्रसंगांना दिसतात.अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आणि नेते रोजच खादीचे कपडे परिधान करतात. मात्र लोकसभा, विधानसभा , महापालिका, नगरपालिका निवडणुकीच्यावेळी या कपडय़ांना मागणी वाढते.
स्वातंत्र्यकाळात चरख्यावर स्वत: कातलेल्या सुतापासून तयार केलेली खादी वापरत. काळाच्या प्रवाहात चरखे बंद झाले आणि यंत्रयुगात कॉटन, टेरीकॉटच्या कपडय़ांनी तरुणाईला मोहात पाडले आणि फॅशन्सच्या प्रवाहांमध्ये खादी मागे पडून तिचा वापर काही राजकीय मंडळी, मान्यवर नेते व कार्यकर्त्यांपर्यंतच सीमित झाला.
दरम्यान, मधल्या काळात परप्रांतातील अनोखी खादी महाराष्ट्रात आली. पांढऱ्या खादीची मक्तेदारी मोडीत काढीत रंगीत, डिझाईन असलेली खादी युवकांना आकर्षित करू लागली. ६० रुपये मीटरपासून २०० रुपये मीटपर्यंत मिलणाऱ्या खादीची चांगली विक्री होऊ लागली. बिहार, उत्तर प्रदेशकडील ही मंडळी केवळ खादीचे कपडे घेऊन चांगला धंदा महाराष्ट्रात करीत आहेत. पांढराशुभ्र खादीचा तयार ड्रेस ३०० ते ५०० रुपयांपर्यंत मिळू लागल्याने तरुणवर्ग खादीकडे आकर्षित झाला. परिणामी त्याची विक्री चांगली आहे.
नागपूर शहरातील शुक्रवार तलाव व आग्याराम देवी चौकातील खादी ग्रामोद्योगमधून खादीच्या कपडय़ांची विक्री सध्या निवडणुकीच्या ‘माहोल’मुळे वाढली आहे. खादीची लोकप्रियता वाढण्याची याशिवायही अनेक कारणे आहेत. खादीचा वापर शहरी व ग्रामीण भागात वाढला आहे. खादी विक्रीची विशेष दुकानेही निघू लागली आहेत. प्रचकित फॅशनला अनुसरून खादीच्या तयार कपडय़ांमध्येही वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा या कपडय़ांकडे ओढा वाढला आहे. खादीच्या तयार कपडय़ांचे फॅशन शो देखील आयोजित केले जात असल्यामुळे या कपडय़ांच्या विक्रीवर चांगला परिणाम झाला आहे. एकंदरीत या साऱ्याचा परिणाम म्हणजे खादी उद्योगाला चांगले दिवस आले आहेत.