Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गोष्ट साडेबारा हजार कोऱ्या मतपत्रिकांची..
न.मा. जोशी, यवतमाळ, २ एप्रिल

मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याची जाणीव निवडणूक आयोग वारंवार करून

 

देत असले तरी एखाद्या समूहाला त्यांच्या पसंतीचा उमेदवार रिंगणात नसेल तर कोऱ्या मतपत्रिका टाकून निवडणुकीलाच विरोध दर्शवण्याची तऱ्हा यवतमाळ मतदारसंघाने दोनदा अनुभवली आहे. या अनुभवाच्या नुसत्या आठवणीनेच सध्या शिवसेना आणि काँग्रेसमध्येही धास्ती बसलेली आहे.
यासंबंधीची मजेदार माहिती अशी की, १९७१ मध्ये झालेल्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसच्यावतीने ज्येष्ठ सवरेदयी नेते सदाशिव ठाकरे रिंगणात होते. त्यांच्या विरोधात फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबुवंतराव धोटे सर्व विरोधी पक्षांकडून लढत होते परंतु, तत्कालीन जनसंघ आणि संघ विचारांच्या अनेकांना धोटे यांची उमेदवारी मान्य नव्हती आणि त्यांना काँग्रेस उमेदवार सदाशिव ठाकरे हे सुद्धा पसंत नव्हते. या गाजलेल्या निवडणुकीत सदाशिव ठाकरे यांनी जांबुवंतराव धोटे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत आपला विजय कसा झाला, याचा मजेदार अनुभव स्वत: सदाशिवराव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ला सांगितला.
१९७१ मध्ये जांबुवंतराव धोटे हे विदर्भातील गाजलेले नेते होते. त्यांच्या प्रचाराची तऱ्हा, त्यांचा आवेश, त्यांची झुंजार लढवय्या वृत्ती आणि त्यांचे समर्थक यामुळे काँग्रेस हतबल वाटत होती. काँग्रेसने माझ्यासारख्या सवरेदयी विचाराच्या साध्या माणसाला उमेदवारी दिली होती. धोटे यांच्यासोबत सारे विरोधी पक्ष होते. त्यावेळी जनसंघाचेही काही नेते धोटेंच्या सोबतच होते पण, जनसंघ आणि संघ विचाराचे काही लोक धोटेंना पसंत करत नव्हते. त्यांचा मला विरोध नव्हता पण, काँग्रेसला मात्र विरोध होता. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी रा.स्व.संघाचे तत्कालीन जिल्हा संघचालक प्राचार्य बाबाजी दाते यांच्या घराच्या भिंती रंगवून काँग्रेसचा प्रचार केला होता. काँग्रेसचे त्यावेळी गाय-वासरू चिन्ह होते आणि ‘गाय-वासरू नका विसरू’ असे नारे रंगवण्यात आले. बाबाजी दाते यांनी याबाबत तीव्र नापसंती सदाशिव ठाकरे यांना कळवली होती तेव्हा ठाकरे यांनी त्यांचे कार्यकर्ते पाठवून रंगवलेल्या भिंती पुसून टाकण्याची बाबाजींना खात्री दिली पण, दाते यांनी विनम्रपणे ती विनंती नाकारून स्वत:च भिंती पुसून टाकल्या होत्या. माझा सदाशिव ठाकरेंना विरोध नाही पण, काँग्रेसलादेखील कधीच समर्थन नाही, असे त्यांनी ठाकरेंना सांगून ‘विजयी व्हा’ चा आशीर्वाद दिला होता. काँग्रेसला विरोध असताना ‘विजयी व्हा’ चा आशीर्वाद बाबाजींनी कसा दिला, याचे काँग्रेस उमेदवार ठाकरे यांना आश्चर्य वाटले. मात्र, निवडणूक निकाल जाहीर झाले तेव्हा धोटेंचा पराभव आणि ठाकरेंचा विजय झाला होता आणि सर्वात महत्त्वाचे मर्म म्हणजे साडेबारा हजार मतपत्रिका तेव्हा कोऱ्या निघाल्या होत्या व ठाकरे दहा हजारांनी निवडून आले होते.
आणखी एक उदाहरण म्हणजे, काँग्रेस नेते बाबासाहेब घारफळकर यांचे चिरंजीव नरसिंहराव घारफळकर हे यवतमाळ मतदारसंघातून फॉरवर्ड ब्लॉकच्या सिंह चिन्हावर निवडून आले होते. त्याहीवेळी सात हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्या होत्या. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मतपत्रिका कोऱ्या निघण्याचा प्रकार नंतर मात्र झाला नाही. त्याचे कारण म्हणजे भाजपचे उमेदवार यवतमाळात लढले आहेत आणि दोनदा (राजाभाऊ ठाकरे-हरिभाऊ राठोड) विजयीसुद्धा झाले आहेत. यावेळी मात्र यवतमाळ-वाशीमची जागा भाजप ऐवजी सेनेला मिळाली आहे आणि कोऱ्या मतपत्रिकांची आठवण चर्चेचा विषय झाला आहे.