Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

समाज-संघटनांच्या पाठिंब्यावरही मोठी भिस्त!
चंद्रपूर, २ एप्रिल/प्रतिनिधी
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांनी विविध समाजाचा आणि सामाजिक प्रश्न

 

हाताळणाऱ्या संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या निमित्ताने रोज रात्री बैठकांचे दौर झडत असले तरी त्यात एकमत होत नसल्याने उमेदवारांचे वर्तुळ अस्वस्थ आहे.
या लोकसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी सहा उमेदवार प्रमुख आहेत. यात भाजप-सेना युतीचे हंसराज अहीर, कॉंग्रेसचे नरेश पुगलिया, शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप, बहुजन समाज पक्षाचे अ‍ॅड. दत्ता हजारे, भारिप बहुजन महासंघाचे देशक खोब्रागडे व मुस्लिम रिपब्लिकन पक्षाचे जावेद पाशा यांचा समावेश आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात यापैकी तीनच उमेदवार अंतिम लढतीत राहण्याची शक्यता असली तरी सध्या या सर्व उमेदवारांनी मतदारांचा पाठिंबा मिळावा म्हणून जीवाचे रान करणे सुरू केले आहे.
प्रचारकाळात समाजाच्या विविध घटकात काम करणाऱ्या बिगर राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळाला तर अनुकूल वातावरण निर्मिती होते, असे बहुतेक उमेदवारांना वाटते. म्हणूनच आता या प्रमुख उमेदवारांनी अशा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमागे पाठिंबा जाहिर करण्याचा लकडा लावला आहे. गेल्या काही वर्षांपासून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देणाऱ्या संघटना या भागात सक्रीय आहेत. त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून कॉंग्रेस, भाजप व बसपाचे नेते प्रयत्नशील आहेत. ओबीसीच्या काही संघटनांनी गेल्या चार दिवसापासून आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे. या संघटनांमध्ये सर्वच राजकीय पक्षाशी संबंधित लोक असल्याने पाठिंबा देण्याविषयी एकमत होत नसल्याचे दिसून आले आहे. संघटनेत काम करणाऱ्या काही प्रमुखांनी कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी बैठक बोलावली आहे, असे निमंत्रण जारी करताच भाजपाच्या वर्तुळातून लगेच हालचाली सुरू झाल्या. या संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी लगेच आपल्या उमेदवाराचे नाव असलेले निमंत्रण पत्र जारी करून दुसरी बैठक बोलावली. या संघटना कोणताही निर्णय जाहीर करत नसल्याने आता त्यांच्यावर प्रमुख उमेदवाराचा दबाव वाढत चालला आहे.
ओबीसी संघटनांमध्ये तेली, माळी, कुणबी या समाजातील कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या संघटनांचा पाठिंबा मिळाला तर मतदारांमध्ये चांगला संदेश जाऊ शकतो असे कारण या दबावामागे आहे. बसपचे उमेदवार अ‍ॅड. दत्ता हजारे हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी पक्षाच्या भाईचारा समितीच्या माध्यमातून या समाजात सामाजिक काम करणाऱ्या विविध तैलिक संघटनांचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. दत्ता हजारे व वामनराव चटप हे दोघेही वकील असल्याने जिल्हा बार असोसिएशन त्यांच्या पाठीशी उभी राहावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अ‍ॅड. चटप यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील पुराणकर यांच्या हस्ते केले. सामाजिक संघटनांसोबतच विविध व्यवसायात काम करणाऱ्या संघटना सोबत असाव्यात यासाठीही हे उमेदवार प्रयत्नशील आहेत.
भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार देशक खोब्रागडे यांनी दलित समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यापासून सच्चर समितीच्या अहवालावरून मुस्लिम समाजाचे प्रबोधन करणारे जावेद पाशा यांनी या घटकातील संघटनांना सोबत घेणे सुरू केले आहे. उमेदवारांच्या या धावपळीमुळे सध्या अशा संघटनांचा भाव जरा वधारला आहे.