Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सेना-काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी ‘फिफ्टी-फिफ्टी’ आमदार
यवतमाळ, २ एप्रिल / वार्ताहर

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील सेनेच्या उमेदवार भावना गवळी आणि काँग्रेस

 

उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या पाठीशी प्रत्येकी तीन-तीन आमदार उभे असल्याचे दिसत आहे. परिसीमन आयोगाने लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेत यवतमाळ जिल्ह्य़ाची चांगलीच मोडतोड केली आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील पूर्वी वणी-राळेगाव, यवतमाळ, केळापूर, दारव्हा, दिग्रस हे सहा विधानसभा मतदारसंघ होते. त्यातील पुसद आणि उमरखेड हे दोन विधानसभा मतदारसंघ वाशीम लोकसभा मतदारसंघात होते. आता मतदारसंघ पुनर्रचनेत यवतमाळ ऐवजी यवतमाळ-वाशीम हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या मतदारसंघात यवतमाळ ‘दिग्रस-दारव्हा’, राळेगाव, पुसद आणि वाशीम व कारंजा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पूर्वीचा केळापूर हा आदिवासी-राखीव मतदारसंघ बाद होऊन त्याऐवजी आर्णी हा नवीन राखीव मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. आर्णी आणि वणी हे दोन विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड विधानसभा मतदारसंघ आता थेट मराठवाडय़ातील हिंगोली मतदारसंघात जोडल्या गेला आहे. याचाच अर्थ यवतमाळ जिल्ह्य़ाला तीन खासदार मिळणार आहेत.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघाची राजकीय स्थिती लक्षात घेतली तर मजेदार चिन्न दिसून येते. या सहा मतदारसंघात काँग्रेसकडे राळेगाव (प्रा. वसंत पुरके), वाशीम (सुरेश इंगळे) असे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुसद (मनोहर नाईक) हे आमदार आहे. सेनेकडे दारव्हा (संजय राठोड) भाजपकडे यवतमाळ (मदन येरावार) हे आमदार आहेत.
दारव्हा-दिग्रस असे पूर्वी दोन विधानसभा मतदारसंघ होते. पैकी दिग्रसचे आमदार संजय देशमुख हे अपक्ष आहेत, तर कारंजा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे डॉ. राजेंद्र पाटणे आमदार आहेत. याचा अर्थ भावना गवळी यांच्या पाठीशी भाजपचे मदन येरावार (यवतमाळ), सेनेचे संजय राठोड (दारव्हा) आणि राजेंद्र पाटणे (कारंजा) असे सहापैकी तीन आमदार आहेत. तर काँग्रेसच्या हरिभाऊ राठोड यांच्यासोबत कागदोपत्रीतरी राळेगावचे आमदार प्रा. वसंत पुरके, पुसदचे आमदार मनोहर नाईक आणि वाशीमचे सुरेश इंगळे हे तीन आमदार आहेत. वसंत पुरके (राळेगाव) हे माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे समर्थक आहेत आणि पाटील उमेदवारी मिळाली नाही म्हणून कमालीचे नाराज असल्याचे सर्वश्रुत आहे.
दिग्रस मतदारसंघातील अपक्ष आमदार संजय देशमुख हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सल्ल्याने हरिभाऊ राठोड यांच्यासोबत आहे. याचा अर्थ काँग्रेस आणि सेनेच्या उमेदवारांसोबत प्रत्येकी तीन तीन आमदार आहेत. म्हणजे दोन उमेदवारांकडे आमदारांचे संख्याबळ फिफ्टी-फिफ्टी आहे. अर्थात दिग्रसचे अपक्ष आमदार संजय देशमुख यांचे वजन आज काँग्रेस उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या पारडय़ात असले तरी देशमुख गटाची मते आपल्या पारडय़ात ओढण्याचा प्रयत्न सेना उमेदवार भावना गवळी यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे सध्याच्या घटकेला महत्त्वाच्या दोन्ही उमेदवारांची स्थिती तुल्यबळ असल्याचीच चर्चा आहे.