Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अमरावती शहर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर
डॉ. सुनील देशमुखांच्या गटाला हादरा
अमरावती, २ एप्रिल / प्रतिनिधी
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसचे शहर अध्यक्ष विश्वास देशमुख यांनी नवीन कार्यकारिणी

 

जाहीर करीत पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या गटाला हादरा देण्याचा प्रयत्न केल्याने राजकारण तापले आहे. पालकमंत्र्यांच्या गटातील एकाही काँग्रेसजनाला नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नव्या कार्यकारिणीत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना उपाध्यक्षांमध्ये स्थान मिळाले आहे. विश्वास देशमुख यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणीत १८ उपाध्यक्ष, १९ सरचिटणीस, ३४ सचिव, २१ सहसचिव, १ कोषाध्यक्ष आणि २३ सदस्य आहेत. कार्यकारिणी तयार करण्याचे काम अजूनही सुरूच असून आणखी काही नावे समाविष्ट होऊ शकतात, असे विश्वास देशमुख यांनी सांगितले.
दोन दिवसापूर्वी पक्षाचे निरीक्षक गेव्ह आवारी अमरावतीत येऊन गेले. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन बैठका घेतल्या. या बैठकीत विश्वास देशमुख यांनी गाऱ्हाणे मांडून पालकमंत्र्यांच्या गटाकडून होत असलेली अडवणूक आणि कार्यकारिणी जाहीर करण्यात होत असलेला विलंब याविषयी आवारी यांना माहिती दिल्याचे कळते. आवारी यांच्याकडून हिरवा झेंडा मिळताच विश्वास देशमुख यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली.
नव्या कार्यकारिणीत काही बंडखोर काँग्रेसजनांना देखील स्थान मिळाले आहे. त्यात अपक्ष नगरसेवक बाबा राठोड यांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले पंकज मेश्राम यांना या कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून स्थान मिळाले होते पण, ऐनवेळी त्यांच्या नावासमोर फुली मारण्यात आली.
नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून वसंत साऊरकर, अनिल तरडेजा,देविदास मेहरे, बाबुसेठ खंडेलवाल, प्रतिभा वानखडे, राजेंद्र लुणावत, नेमीचंद जैन, नरेश वर्मा, दिलीप इंगोले, बाबा राठोड, मनोज भेंडे, एम. नुरूल हसन, दीपक सलुजा, अंबादास मोहिते, मुरलीधर भोंडे, यशवंत गुजर, तर कोषाध्यक्ष आनंदकुमार भामोरे, सरचिटणीस म्हणून भय्यासाहेब कडू, डॉ. संतोष ठाकरे, संजय वाघ, डॉ. शब्बीर अली, अनंत अत्रे, कुमुदिनी इंगळे, सुरेश इंगळे, बबन रडके, बबलू शेखावत, सुनील महल्ले, राजेंद्र मोहता, सुरेश दहातोंडे, डॉ. हेमंत बोंडे, सचिन हिवसे, संजय मापले, नंदकुमार इंगळे, झिया अहमद, दीपसिंह बग्गा यांचा समावेश करण्यात आला आहे. ऐन निवडणूक काळात काँग्रेसमधील दुफळी चव्हाटय़ावर आल्याने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.