Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

मॉरिस जार यांचे २९ मार्च रोजी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले आणि दिवसभर फ्रेंच रेडिओ ‘डॉ. झिव्ॉगो’ मधली लाराज थीम ही धुन तसेच ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ च्या पाष्टद्धr(२२४)र्वसंगीताच्या भावपूर्ण स्मरणरंजनात बुडून गेला. फ्रान्समध्ये १९२४ साली जन्मलेले संगीतकार मॉरिस जार यांचे नाव जगभर झाले ते ६०च्या दशकात हॉलीवूडचे सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून. हॉलीवूडच्या ‘वॉक ऑफ फेम’मध्ये मॉरिस जार यांच्या नावाचा स्टार आहे. पण त्याहीपेक्षा उर्वरित जगाला त्यांची ओळख आहे ती ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, ‘डॉ. झिव्ॉगो’, ‘अ पॅसेज टू

 

इंडिया’या चित्रपटांचे ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार म्हणून. दिग्दर्शक डेव्हिड लीनच्या या चित्रपटांव्यतिरिक्त ‘रायन्स डॉटर’, ‘द घोस्ट’, ‘द मेसेज’, ‘द आयलंड ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड’ इत्यादी चित्रपटांचे त्यांचे संगीत गाजत राहिले आहे. मॉरिस जार यांनी संगीताचे शिक्षण घ्यायला तशी खूपच उशिरा म्हणजे इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये गेल्यावर सुरुवात केली. मग रेडिओ तंत्रज्ञ असलेल्या वडिलांच्या मर्जीविरुद्धच इंजिनीयरिंगचे शिक्षण सोडून देऊन ‘कॉंझर्वेतोर दि पॅरिस’मध्ये ते संगीत शिकू लागले. तालवाद्ये हा त्यांचा विशेष प्रेमाचा विषय. त्याचे प्रत्यंतर ‘लॉॅरेन्स ऑफ अरेबिया’ला भव्यतेचे परिमाण देणाऱ्या संगीताच्या रूपात विशेषत्वाने आले आहे. ऑर्केस्ट्रामध्ये संगीत देता देता त्यांनी १९५१मध्ये प्रथमच एका फ्रेंच चित्रपटाला संगीत दिले. परंतु त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे वळण आले ते १९६१ मध्ये. निर्माता सॅम स्पीगेल याने त्यांना ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या भव्य चित्रपटासाठी संगीत देण्याविषयी विचारणा केली. जार हॉलिवूडमध्ये येऊन दाखल झाले आणि ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’च्या संगीताला १९६२ चा ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्यानंतर मॉरिस जार यांच्याकडे हॉलिवूडच्या चित्रपटांची रीघ लागली. पाठोपाठ १९६५ मध्ये ‘डॉ. झिव्ॉगो’ आणि १९८४ मध्ये त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाले. ऑस्करची एकूण नऊ नामांकने मिळाली. डेव्हीड लीनव्यतिरिक्त आल्फ्रेड हिचकॉक, लुचिनो व्हिस्काँटी आणि जॉन ह्युस्टन यांच्यासाठीदेखील त्यांनी संगीत दिले. १९७०-८० च्या दशकात मॉरिस जार यांनी ‘द आयलंड अ‍ॅट द टॉप ऑफ द वर्ल्ड’, ‘एनिमी माइन’, ‘मॅड मॅक्स बियॉण्ड थण्डरडोम’सारख्या विज्ञानपटांना संगीत दिले. सुरुवातीच्या काळात पियानो, पाइप ऑर्गन, फुजारा, अनेक प्रकारची पारंपरिक तालवाद्ये यांच्या साहाय्याने ऑर्केस्ट्रा तयार करणाऱ्या जार यांनी पुढे काळाची पावले ओळखत सिंथेसायझरचा वापर करायला सुरुवात केली. तरीही त्यांचा स्वत:चा कल वाद्यसमूहांकडेच असे. इलेक्ट्रॉनिक वाद्यांसहित काम करणे अधिक मेहनतीचे, अधिक वेळखाऊ आणि त्यांची निर्मिती अधिक खर्चिक असे त्यांचे मत असे. २००१ मध्ये ‘अपरायझिंग’ या टीव्ही चित्रपटाला त्यांनी संगीत दिले, ते शेवटचे. ज्यूंच्या हिटलरकृत हत्याकांडावर आधारित ‘अपरायझिंग’चे संगीत तयार केल्यानंतर त्यांनी वयपरत्वे निवृत्ती स्वीकारली; परंतु आपल्या या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी १५० च्या वर चित्रपटांना संगीत दिले. ‘फेटल अ‍ॅट्रॅक्शन’, ‘द इयर ऑफ लिव्हिंग डेंजरसली’, ‘नो वे आऊट’, ‘गोरिल्लाज इन द मिस्ट’, ‘डेड पोएट्स सोसायटी’, ‘द मॉस्क्विटो कोस्ट’ आणि ‘जेकब्ज लॅण्डर’ हे त्यांचे या आधुनिक पर्वातले चित्रपट. मॉरिस जार यांचा मुलगा जीन मिचेल जार याने आधुनिक इलेक्ट्रॉनिक संगीताच्या क्षेत्रातला अग्रणी संगीतकार म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. जार यांचा सर्वात धाकटा मुलगा केविन जार हाही पटकथालेखक म्हणून हॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. ‘टुम्बस्टोन’ आणि ‘ग्लोरी’ या त्याच्याच पटकथा. मॉरिस जार यांचे हॉलीवूडला आणि एकूणच जागतिक संगीत क्षेत्राला भरघोस योगदान आहे. त्यांच्या निधनाने विसाव्या शतकातल्या संगीताच्या एका भव्य पर्वाची सांगता झाली असली, तरी त्या संगीताचा प्रभाव पुढच्या काळावर सतत आपला वरदहस्त ठेवणार आहे.