Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

कोऱ्या सातबारावर उद्धव ठाकरेंचे नाव लिहिणार का?
मेहकर / खामगाव, २ एप्रिल / वार्ताहर
गुजरात दंगलीमध्ये शंभर निरपराध लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या माया कोडवाणीला न्यायालयाने तुरुंगात पाठवले आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा गुजरात करण्याची भाषा करतात पण, आम्हाला महाराष्ट्राचा गुजरात करायचा नाही, अशा जातीयवादी शक्तींना पायबंद घालण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मेहकर येथील स्वातंत्र्य मैदानावर आयोजित प्रचार सभेत केले.

पुलगावातील उड्डाण पुलासाठी जागेचे दोन प्रस्ताव
पुलगाव, २ एप्रिल / वार्ताहर
पुलगाव आर्वी रस्त्यावर मिलसमोरील रेल्वे क्रॉसिंगवरील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या बांधकामास रेल्वे अर्थ संकल्पात तत्त्वत: मंजुरी प्रदान करण्यात आली असली तरी या उड्डाण पुलाची जागा निश्चिती मात्र झालेली नाही. या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेचे दोन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले असून जागा निश्चितीवर अद्याप शिक्कामोर्तब होणे तेवढे बाकी आहे.

महिलांनी आर्थिक क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे- जुल्फी शेख
शेतकरी महिला मेळावा
भंडारा, २ एप्रिल / वार्ताहर
कृषी बचत गटातील महिलांनी आर्थिक क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे व स्वावलंबी बनावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. जुल्फी शेख यांनी येथे केले. कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय व संकल्प वर्धिनी ग्रामीण युवा संस्थेच्यावतीने खापा येथे आयोजित शेतकरी महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याला ५०० महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

डॉ. विजय आईंचवार यांचा चंद्रपुरात सत्कार
चंद्रपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
जीवनात यश मिळवायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागेल याची जाणीव ठेवून सुरुवातीचा प्रवास पूर्ण केला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास, प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या बळावरच यश प्राप्त करू शकल्याचे प्राचार्य डॉ. विजय आईंचवार यांनी येथे स्पष्ट केले. सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय आईंचवार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त सवरेदय शिक्षण मंडळाच्यावतीने डॉ. विजय आईंचवार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

वाघाची कवटी जप्त, चार आरोपींना अटक
चिमूर, २ एप्रिल/ वार्ताहर
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूरच्या जंगलात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आज चारगाव येथे छापा टाकून वाघाची कवटी जप्त केली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. चारगाव येथील महादेव आडे याच्या घरी वाघाचे अवयव आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. जप्त झालेली कवटी वाघाची आहे, असे आरोपी सांगत असला तरी प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच खरे काय ते समोर येईल, असे सहाय्यक वनसंरक्षक पी. आर. शिंगाडे यांनी सांगितले.

प्रवाशाच्या खिशातील रोख लंपास
खामगाव, २ एप्रिल / वार्ताहर
बसमध्ये चढताना प्रवाशाचे २५०० रुपये असलेले पाकीट चोरटय़ाने लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकावर घडली. अंत्रज येथील सुरेश खोडके (५४) हे येथील बसस्थानकावर भुसावळला जाण्यासाठी आले असता बसमध्ये चढताना त्यांच्या खिशातील पाकीट चोरटय़ाने चोरले.

ज्येष्ठ नागरिकांची सभा
पुलगाव, २ एप्रिल / वार्ताहर
पंचशील नगरात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची सभा दादाराव करवाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या सभेत अ‍ॅड. एम.एस. तराळ यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना कायद्यानुसार अन्न, वस्त्र, निवारा व औषध कशाप्रकारे मिळतील यावर विस्तृत मोलाचे मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांना बीपीएल च्या सवलती मिळाल्याबाबत वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सेवा संघाचे अध्यक्ष काशीनाथ बोदिले यांनी सवलती पदरात पाडून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या सभेत दुर्योधन सहारे, चंद्रहास कांबळे, खुशाल राऊत, देवराव डहाट, नारायण इंदूरकर, अनसूया हाडके, विभा गोडघाटे, आशा तुरणकर, खुशाल हाडके, गिरीधर बाणाईत, मारोती नन्नावरे, उमा बारसे, डी.के. जुनघरे उपस्थित होते. संचालन चंद्रकांत कदम यांनी केले.

कृष्णराव शेंडे यांचे निधन
दर्यापूर, २ एप्रिल / वार्ताहर

अमरावती जिल्हा बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व रिपाइंचे माजी सचिव व दुसऱ्या महायुद्धात लढलेले सैनिक एलसीबी सेवानिवृत्त अधिकारी कृष्णराव शेंडे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी, नातवंडे असा परिवार असून ते समता शिक्षण प्रसारक मंडळ, थिलोरी बरोबरच विविध सेवाभावी संस्थानचे पदाधिकारी होते. चंद्रभागा तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शंकरराव बुरघाटे यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली अर्पण केली. अरविंद चौधरी मधुकर रोडे, अनंता पांडे, दादा चव्हाण, देवराव सपकाळ, डी.आर. कटय़ारमल व इतरांनी कार्याचा गौरव करून श्रद्धांजली अर्पण केली.

रिसोड शहरात ‘पाणपोईंची’ गर्दी
रिसोड, २ एप्रिल / वार्ताहर
शहरात रखरखत्या उन्हाची झळ सर्व सामान्यांना पोहचत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर पाणपोई वाढल्या आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून सर्व सामान्य दुपट्टे, टोपी, चष्मे, रुमाल याचा वापर करीत आहेत.

ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार
खामगाव, २ एप्रिल/ वार्ताहर
भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने सायकलस्वार ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर घडली. गणेश मारोती अतकरे (२९) सायकलने जात असता ट्रकने (एमएच ०४- ३ यू ७४०८) धडक दिली. ट्रकची चाके त्यांच्या डोक्यावरून गेली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलीस या प्रकरमी पुढील तपास करीत आहेत.

शेती खरडून गेलेले शेतकरी अनुदानापासून वंचित
खामगाव, २ एप्रिल / वार्ताहर

अतिवृष्टीने शेती खरडून गेलेल्या नुकसानाच्या भरपाईपासून अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत.
या परिसरात २००६ मध्ये अतिवृष्टीने अनेकांच्या शेती खरडून गेल्या होत्या. याबाबत पटवारी यांनी सर्वेक्षण केले परंतु, ते चुकीचे झाल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. तर काहींना मात्र लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कमी प्रमाणात नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना मात्र मोठय़ा प्रमाणात अनुदान मिळाले आहे.

प्रचारात सुरेश वाघमारेंचा ‘एकला चालो रे’
प्रशांत देशमुख, वर्धा, २ एप्रिल
संपूर्ण मतदारसंघात भाजप आघाडीच्या आमदारांची अनुपस्थिती, जिल्हा परिषद व पालिका सदस्यांचे तुटपुंजे पाठबळ, पक्षांतर्गत नाराजी असतानाच दत्ता मेघेंसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्याशी लढत देताना भाजपचे सुरेश वाघमारेंना प्रचारात ‘एकला चालो रे’चा मार्ग स्वीकारावा लागला आहे. पक्षश्रेष्ठींपुढे ९० टक्के पदाधिकाऱ्यांनी यावेळी वाघमारेंना ‘उमेदवारी नको’चा जाहीर बिगुल फुं कल्याची बाब अद्याप ताजीच आहे.

फक्त पैशाने कमी पडलो..
"रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात मोजक्या वेळा अभिमानास्पद प्रसंग आले आहेत. मी निवडणूक लढवली तेव्हा असेच झाले होते. रिपब्लिकन ऐक्याचा रेटा असल्यामुळे सारे वातावरण भारलेले होते. त्यामुळेच माझी निवडणूक लक्षात राहण्यासारखी झाली. फक्त पैशाने मी कमी पडलो.." नागपुरातून १९९६ साली रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणूक लढवलेले आणि उल्लेखनीय मते घेऊन मुख्य लढतीत आलेले उमाकांत रामटेके सांगत होते.
"माझ्या उमेदवारीला विशिष्ट पाश्र्वभूमी होती. ६ डिसेंबर १९९५ला चैत्यभूमीवर आंबेडकरी जनसमुदाय एकत्र जमला होता. रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट विसरून एक व्हा, असा रेटा या जनतेने नेत्यांमागे लावला. पक्षाचा एक नेता मान्य होणे शक्य नसल्यामुळे नऊजणांचे अध्यक्षीय मंडळ तयार करण्यात आले. या प्रक्रियेत सामील नसलेल्या आमच्या गटाला (खोरिप) ऐक्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे आमचे तेव्हाचे अध्यक्ष शिवराम मोघा यांनाही मंडळात घेण्यात आले."

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात उमेदवारांची प्रचारात दमछाक
सुरेश सरोदे, गडचिरोली, २ एप्रिल

गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्य़ात पसरलेला गडचिरोली-चिमूर हा लोकसभा मतदारसंघ भौगोलिक दृष्टय़ा आकाराने संपूर्ण राज्यात विस्तीर्ण असल्याने हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणे उमेदवारांसाठी अवघड ठरणार आहे. त्यातल्या त्यात प्रचारासाठी आता केवळ १२ दिवस उरल्याने या मतदारसंघातील १२ लाख ८९ हजार ८०० मतदारांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्क साधण्याचे मोठे आवाहन उमेदवारांसमोर आहे. विशेष बाब म्हणजे या मतदारसंघातील ४ विधानसभा मतदारसंघ नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे ग्रस्त आहेत.

‘पोटाला अन्न, हाताला काम’
चांदूर बाजार/अंजनगाव सुर्जी, २ एप्रिल/ वार्ताहर

सरकार हे देश घडवण्यासाठी असते, तोडण्यासाठी नसते. पोटाला अन्न व हाताला काम देण्याचीच आमची भूमिका आहे. देश घडवणारे हवेत की मोडणारे हे, तुम्हालाच ठरवायचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संगेकर सभागृहात आयोजित काँग्रस -राकाँ- रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.

ही माझी शेवटची निवडणूक -दत्ता मेघे
पुलगाव, २ एप्रिल / वार्ताहर

ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे भावनोत्कट आवाहन वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांनी केले आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत जनतेची सेवा करण्याचा धर्म पाळण्याचे आश्वासन दिले. आतापर्यंत मी गोरगरिबांची सेवा केली. आता यापुढे ती करीन कारण, तळागाळातील जनतेची सेवा करणे हाच माझा धर्म मी मानतो व जनतेलाही याची जाण आहे.

नरेंद्र मोदी यांची उद्या चंद्रपूरला जाहीर सभा
चंद्रपूर, २ एप्रिल/प्रतिनिधी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची चंद्रपूर येथे ४ एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक चांदा क्लब मैदानावर दुपारी २ वाजता ही सभा होणार आहे. येथीलभाजप शिवसेना युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या जाहीर सभेला प्रदेश भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार शोभा फडणवीस, वणीचे शिवसेना आमदार विश्वास नांदेकर, ब्रम्हपुरीचे आमदार अतुल देशकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळू धानोरकर, रमेश तिवारी आदी नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. या जाहीर सभेला भाजप, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार क्षेत्रातील जनतेने मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

नाना पटोले यांना ‘प्रहार’चे समर्थन
भंडारा, २ एप्रिल / वार्ताहर
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील बच्चू कडू समर्थित प्रहार संघटनेने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नाना पटोले यांना समर्थन जाहीर केले आहे. माजी आमदार नाना पटोले छावा संग्राम परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रहार संघटनेचे भंडारा जिल्ह्य़ात १७ हजार तर गोंदिया जिल्ह्य़ात १८ हजार कार्यकर्ते असून ते नाना पटोले यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू स्वत: पटोले यांच्याकरिता प्रचार सभा घेणार आहेत. प्रहार संघटनेला राजकीय पाठबळ मिळावे, यासाठी प्रहारद्वारा एकूण पाच उमेदवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही भंडारा जिल्हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष अंकुश वंजारी यांनी सांगितले.

नाना पटोले यांना ‘प्रहार’चे समर्थन
भंडारा, २ एप्रिल / वार्ताहर
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील बच्चू कडू समर्थित प्रहार संघटनेने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नाना पटोले यांना समर्थन जाहीर केले आहे. माजी आमदार नाना पटोले छावा संग्राम परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रहार संघटनेचे भंडारा जिल्ह्य़ात १७ हजार तर गोंदिया जिल्ह्य़ात १८ हजार कार्यकर्ते असून ते नाना पटोले यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू स्वत: पटोले यांच्याकरिता प्रचार सभा घेणार आहेत. प्रहार संघटनेला राजकीय पाठबळ मिळावे, यासाठी प्रहारद्वारा एकूण पाच उमेदवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही भंडारा जिल्हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष अंकुश वंजारी यांनी सांगितले.

भारिप-बहुजन महासंघाची उद्या रिसोडला सभा
रिसोड, २ एप्रिल / वार्ताहर
अकोला लोकसभा मतदारसंघातील भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचारसभा ४ एप्रिलला तालुक्यातील आसेगावपेन येथे सकाळी ९ वा. होणार आहे. रिसोड कार्यालयाचे उद्घाटन दुपारी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. या प्रसंगी आमदार हरिदास भदे, भारिप-बहुजन महासंघाचे सचिव वसंत साळवे, अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौदागर साबिया अंजुम, माजी अध्यक्ष बाळ मुकुंद भिरड, बळीराम क्षीरसागर, जगन्नाथ मोरे उपस्थित राहणार आहेत. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भारत कांबळे, गिरीधर शेजुळ, दिलीप नवघरे, सुभाष कळासरे, मधुकर मैदकर आदींनी केले आहे.

डॉक्टर, वकील व उद्योजकांशी शिंगणेंनी साधला संवाद
खामगाव, २ एप्रिल / वार्ताहर
बुलढाणा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उद्योजक, डॉक्टर, वकील यांची सभा घेऊन संवाद साधला. या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सानंदा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खामगाव चेंबर ऑफ कॉमर्स संघाचे अध्यक्ष किशोर गणात्रा, अ‍ॅड गणेश इंगळे, रामचंद्र पाटील, अनिल नावंदर, सतीश राठी, मंजितसिंग शिख आदी उपस्थित होते. यावेळी अनिल नावंदर, अ‍ॅड. गणेश इंगळे, दिलीप सानंदा, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विचार मांडले. प्रास्ताविक सतीश राठी यांनी केले. संचालन दीपक महाकाळे यांनी केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष सरस्वती खासने, राष्ट्रवादी गटनेता वैभव डवरे, राजाराम काळणे, गोपाळ कोल्हे, पंजाब देशमुख, सुरेशसिंह तोमर, महादेव डोंगरे, अ‍ॅड. गणेश गवई, उल्हास देशमुख, सतीश अग्रवाल, अनिल विकमसी, अरुण गुप्ता, संतोष टाले, विजय गवळी, नगरसेवक गणेश माने, ज्ञानेश्वर शर्मा, नजाकत हुसेन, अमीरउल्लाखान, राजेंद्र नहार, श्रीकांत तायडे, राठी आदी उपस्थित होते.