Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
विशेष लेख

अनभिषिक्त भावसम्राट

मराठी भावसंगीतात भावगीताचे पर्व निर्माण करणारे गजानन दोनच. दोघेही अण्णा म्हणून परिचित. एक गजानन दिगंबर माडगूळकर आणि दुसरे गजानन वाटवे. दोन्ही माझी १९४५ पासूनची दैवतं. मी कऱ्हाडला दहा बारा वर्षांच्या वयापासून अण्णा वाटवेंच्या गाण्याच्या कार्यक्रमात पुढे बसून त्यांची गाणी लिहून घ्यायचो आणि नंतर मित्रांच्या घोळक्यात म्हणायचो. मेळ्यांमध्ये वाटव्यांचं गाणं म्हणजे त्या काळात मोठी मेजवानी होती. वाटव्यांचं वैशिष्टय़ म्हणजे, भावगीतं त्यांनी खऱ्या अर्थानं जनमानसापर्यंत पोहोचवली. भावकवितेची वाचनं सुरू केली ती रविकिरण मंडळानं. पण ती गायला लागली ती जी. एन. जोशींच्या स्वरात आणि जनमानसाच्या हृदयसिंहासनावर आरूढ झाली, ती गजानन वाटव्यांच्या स्वरात. मी, बबनराव नावडीकर, गोविंद पोवळे, विश्वास काळे आणि राम पेठे या साऱ्यांचं खरं दैवत म्हणजे अण्णा वाटवे. वाटवेंचं

 

अनुकरण करण्यात आम्हाला धन्यता वाटे. त्यांचे लखलखीत शब्दोच्चार भावोत्कट स्वररचना आणि अर्थासहित भावनेनं कविता म्हणणं आम्हाला फार भारावून टाकायचं. वाटव्यांना गाणं म्हणताना वाद्यांचा कल्लोळ मुळीच आवडायचा नाही. आपण म्हणत असलेले शब्द आणि त्यातील भाव श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर वाद्यांचा अडथळा त्यांना खपत नसे. पण त्याचबरोबर कमीत कमी ठेका आणि सूरच त्यांच्यासाठी खूप असे. स्वत: पेटी वाजवताना स्वत:चीच स्वररचना असल्याने, योग्य तोच सूर त्यांच्या बोटातून उमटत असे. वाटव्यांनी कायम स्वत:च्याच संगीतरचना गायल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाटव्यांनी कधीच कोणाचं अनुकरण केलं नाही. स्वत:ची शैली त्यांनी स्वत:च निर्माण केली आणि शेकडो गायकांनी त्यांना आपलं दैवत मानून त्यांच्या स्वरांच्या छायेत वाटचाल केली. वाटवेंच्या स्वररचना आजपासून पन्नास ते साठ वर्षांपूर्वी त्यांनी स्वरबद्ध केल्या आहेत, हे आज खरं वाटत नाहीत. आजच्या आधुनिक काळातही ताज्यातवान्या वाटाव्यात इतक्या त्या टवटवीत आहेत. स्वरांचं वैचित्र्य, अकारण तानबाजी किंवा गायकी दाखवण्याच्या वाकडय़ा जागा त्यांच्या स्वररचनांमध्ये कधीच नसे. शास्त्रीय गायनाचं कोणतंही शिक्षण न घेता त्यांचं हिंदुस्थानी रागांचं ज्ञान इतकं अफाट होतं, की गीताचे, नव्हे कवितेचे शब्द ऐकले की ते मनातच गुणगुणू लागत. त्यासाठी त्यांना समोर पेटी किंवा इतर वाद्यांची गरज नसे.
एचएमव्हीच्या काही ध्वनिमुद्रणांच्या वेळी तर फार विचित्र प्रसंग ओढावत. १९५०-५२ चा तो काळ होता. त्या काळात पुरुषच स्त्रियांची गाणी म्हणत. एका ध्वनिमुद्रणासाठी लता मंगेशकर उपलब्ध झाल्या नाहीत. म्हणून स्वत: वाटवेंनाच एचएमव्हीच्या रूपजींनी ते गाणं म्हणायला लावलं आणि ते लोकप्रियही झाले.
‘मोहुनिया तुजसंगे, नयन खेळले जुगार’
‘रानात सांग कानात आपुले नाते’
‘मी निरांजनातील वात’
‘मी काय तुला वाहू’
‘कुंभारासारखा गुरू, नाही रे जगात’
‘कुणीही पाय नका वाजवू’
ही वाटव्यांनी स्वरबद्ध केलेली माझी विशेष आवडती गाणी. १९३७ मध्ये पुण्यात पहिला जाहीर कार्यक्रम झाल्यानंतर १९९४ पर्यंत वाटवे उत्तम गात होते. भा. रा. तांबे, गिरीश, संजीवनी, अनिल, वि. द. घाटे, गदिमा, सोपानदेव, ना. घ. देशपांडे ते अगदी सुरेश भट, रमण रणदिवे, जयंत भिडेपर्यंत सुमारे अडीचशे कवींच्या हजारो रचनांना अण्णांनी स्वरबद्ध केलं.
स्वत:च्या एका आगळ्या धुंदीत आणि समाधानात अव्यभिचारी निष्ठेनं अण्णा भावगीतांमध्येच रममाण झाले. चित्रपट संगीताच्या वाटय़ाला फारसे गेलेच नाहीत. अगदी सुधीर फडक्यांच्या सहवासात ‘प्रभात’च्या सुवर्णकाळात राहूनसुद्धा. चित्रपटसंगीताने त्यांना फार मोह घातला नाही. पण भावगीतांच्या क्षेत्रात त्यांनी हिमालयाच्या उंचीची कामगिरी केली. त्यांच्या आसपासही कोणी आजपर्यंत फिरकू शकलं नाही. विविध कलांच्या शब्दांतलं देशप्रेम, विरह, व्याकूळता आणि इतर छटा ते स्वरातून उत्कटतेने पोहचवायचे. कुसुमाग्रजांनीसुद्धा नाशिकच्या कार्यक्रमात त्यांचे गायन ऐकून ‘माझी कविता इतकी सुंदर आहे, हे तुमच्या स्वरातून समजलं’ असं म्हणत दाद दिली. त्यांच्या श्रोत्यांमध्ये महात्मा गांधींपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत सर्वजण असायचे.
कवितेचे रूपांतर भावगीतात करणाऱ्या आणि हजारो श्रोत्यांना साध्या पद्धतीने मंत्रमुग्ध करणाऱ्या या थोर गायकाचा साठावा वाढदिवस पुण्यात सर्व शिष्यगणांनी १९७८ मध्ये ट्रेनिंग कॉलेजच्या सभागृहात केला होता. त्यावेळी ‘बाबूजी’ सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे अशी दिग्गज मंडळी जमली होती. साठ गायक कलाकार त्यास हजर होते. अनेक वर्षांचा बाबूजी - अण्णांचा अबोला पु. लं.नी मिटवला होता. ती पिढीच वेगळी होती. अण्णांनी आम्हाला कधी समोर बसवून शिकवलं नाही. पण आमच्या मुलींना म्हणजे माझी मुलगी संगीता, राम पेठेची मुलगी रंजना पेठे (जोगळेकर) यांना मात्र आनंदानं शिकवलं. आम्ही मात्र त्यांचे एकलव्यच राहिलो. रवींद्र साठेसारख्या उत्तम गायकाला सुद्धा ‘मोहुनिया तुजसंगे’ नं मोहिनी घातली, आणि ४० वर्षांनी त्यानं त्याच्या आवाजात रेकॉर्डिग करताना अण्णांसमोर बसून उत्तम रियाज केला.
लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना १९९४ मध्ये मा. दीनानाथ प्रतिष्ठाननं गौरवलं, महाराष्ट्र शासनानंही अनेक पुरस्कार दिले, पण केंद्र शासनाला त्यांना एकही पद्म पुरस्कार द्यावासा वाटला नाही, ही मोठी खेदाची बाब आहे.
गजानन वाटवे हे मराठी भावगीतातील अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्या सावलीत वाढलेले आम्ही सारे त्यांच्या जाण्यानं पोरके झालो आहोत. वडीलधारे गेल्याचं दु:ख अतोनात आहे. ‘सुरांनो जाऊ नका रे दूर’ म्हणणारे अण्णा, स्वत:च इतके दूर निघून गेले आहेत, पण त्यांचे सूर पुढच्या पिढय़ांना भावगीताचा इतिहास सांगणार आहेत.
डॉ. दत्ता वाळवेकर