Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
विविध

विकसनशील देशांना हवे ५०० अब्ज डॉलरचे साह्य
लंडन, २ एप्रिल/पी.टी.आय.

श्रीमंत राष्ट्रांनी आर्थिक कातडीबचाव धोरणापासून अलिप्त राहून इतिहासापासून काही शिकावे असा इशारा देतानाच भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विकसनशील राष्ट्रांना आर्थिक मंदीच्या समस्येशी झगडण्यासाठी ५०० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देण्यात यावी अशी मागणी केली. जी-२० समूहाच्या परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी आयोजिलेल्या स्नेहभोजनाप्रसंगी पंतप्रधान सिंग बोलत होते.

जगदीश टायटलर यांना सीबीआयची ‘क्लीन चिट’
शीखविरोधी दंगलीचे नेतृत्व केल्याचा पुरावा नसल्याचा दावा
नवी दिल्ली, २ एप्रिल/खास प्रतिनिधी
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत उफाळलेल्या शीखविरोधी दंगलीतील प्रमुख आरोपी काँग्रेसचे खासदार जगदीश टायटलर यांना ‘क्लिन चीट’ देताना त्यांच्याविरुद्ध या प्रकरणी चौकशी समाप्त करण्यात यावी, अशी विनंती आज सीबीआयने दिल्लीच्या अतिरिक्त मुख्य दंडाधिकाऱ्यांपुढे केली. १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शीखविरोधी दंगली भडकविण्यात टायटलर यांनी पुढाकार घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

धर्मप्रचारकाच्या वेशात १४ अतिरेकी!
पाकिस्तानी गुप्तचरांचा इशारा
इस्लामाबाद, २ एप्रिल/पी.टी.आय.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानात सुरू असलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यांच्या तसेच याच आठवडय़ात लाहोरमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर आणखी किमान १४ आत्मघाती अतिरेकी धर्मप्रचारकांच्या वेशात फिरत असल्याची माहिती पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील पोलीस यंत्रणांना दिली आहे.

समन्वयाच्या अभावामुळे ९/११ हल्ल्याच्या कटाचा सुगावा नाही!
वॉशिंग्टन, २ एप्रिल/पीटीआय

समन्वयाचा अभाव व आर्थिक गैरव्यवस्थापन या कारणांमुळे अमेरिकी गुप्तचर संस्थांचा कारभार अत्यंत ढिसाळ बनला असून त्यामुळेच त्यांना अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी अल काईदाने केलेल्या हल्ल्याच्या कटाचा सुगावा लागू शकला नाही, असा निष्कर्ष यासंदर्भातील चौकशी अहवालात काढण्यात आला आहे.हा चौकशी अहवाल बुधवारी सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला.

अफगाणिस्तानबाबतची पाकची एकाधिकारशाही मोडली
वॉशिंग्टन, २ एप्रिल/पी.टी.आय.

अफगाणिस्तानबाबत अमेरिकेच्या निर्णयप्रक्रियेत असलेली पाकिस्तानची एकाधिकारशाही ओबामा प्रशासनाने मोडीत काढली आहे आणि अफगाणिस्तानच्या पुनर्बाधणीत सक्रीय असलेल्या भारतालाही झुकते माप दिले आहे, असा निष्कर्ष अमेरिकेने नुकत्याच जारी केलेल्या अफगाणिस्तानविषयक धोरणावरून तज्ज्ञांनी काढला आहे.

स्वात खोऱ्यामध्ये पाचूच्या खाणीवर तालिबानींचा कब्जा
इस्लामाबाद, २ एप्रिल/पी.टी.आय.

सध्या अस्थिर आणि अशांत वातावरण असलेल्या पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतामधील स्वात खोऱ्यामध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी एका पाचूच्या खाणीवर कब्जा केला असून तेथे बंकर्स बांधून पाचूचे उत्पादन काढण्यासही सुरुवात केली आहे. शांगला जिल्ह्यामध्ये गोजारो किलाय अम्नावी भागात ही खाण असून या भागातील ती सर्वात मोठी दुसरी खाण आहे. पाकिस्तान शासनाने अमेरिकेच्या लक्झरी इंटरनॅशनल या कंपनीला ती वर्षांला ४० दशलक्ष डॉलर या मोबदल्याच्या बदल्यात चालविण्यास दिली होती. ७० तालिबानी दहशतवाद्यांनी या परिसरात घुसून अमेरिकी कंपनीच्या या खाणीवर कब्जा मिळविला आहे. या कंपनीने येथील अशांत वातावरण आणि सुरू असलेल्या हिंसाचारामुळे खाणीचे कामकाज बंद केले होते. त्यामुळे मोकळ्या झालेल्या या खाणीवर कब्जा करणे तालिबानींना शक्य झाले. स्वात खोऱ्यातील प्रमुख शहर असलेल्या मिंगोरा येथील पाचूच्या खाणीवरही तालिबानींनी काही दिवसांपूर्वी ताबा मिळविला होता. तेथे हजारो कामगारांची भरती करण्यात आली असून तेथे पाचू काढण्याचे काम सतत चालू आहे.

दोन बसची धडक; अपक्ष उमेदवारासह १२ जखमी
भद्रावती, २ एप्रिल / वार्ताहर

एका एसटी बसने दुसऱ्या बसला धडक दिल्याने १२ प्रवासी जखमी झाले. यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. सर्व जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावर येथून ५ कि.मी. अंतरावरील बरांज जवळच्या कर्नाटका एम्टा कोळसा खाणीजवळ आज दुपारी २ वाजता झाला. अमरावती-चंद्रपूर ही बस चंद्रपूरकडे जात असताना मागावून येणाऱ्या नागपूर-राजुरा या बसने पुढे जाण्याच्या प्रयत्नात मागावून जोरदार धडक दिली. यात दोन्ही बसचे बरेचसे नुकसान झाले. नारायण शाहू गोडे (४२) कोसारा ता. वणी, अपक्ष उमेदवार आनंदराव सहदेव (२१) भद्रावती, प्रशांत रामटेके (२१) भद्रावती, भोजराज यादव कुमरे (३४) रा. मांगा गडचिरोली, रवींद्र महादेव चौधरी (२८) हिंगणघाट यांचा जखमींमध्ये समावेश आहे. यात काही प्रवाशांचे हात तर काही प्रवाशांचे दात तुटले. अमरावती-राजुरा बसमध्ये ३० तर नागपूर-राजुरा बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करीत होते. बसचा चालक भोजराज कुमरे हा जखमी झाला असून त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रॅगिंग करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची अहिल्या विद्यापीठातून हकालपट्टी
इंदूर, २ एप्रिल / पी.टी.आय.

सामूहिक रॅगिंग केल्याच्या आरोपावरून देवी अहिल्या विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर प्रोफेशनल स्टडीजच्या होस्टेलमध्ये एमबीए द्वितीय वर्षांचा विद्यार्थी यादवेंद्र सिंग सोळंकी याचा रॅगिंगच्या नावाखाली प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या घटनेची तक्रार यादवेंद्रने विद्यापीठाकडे केल्यानंतर विद्यापीठाने अधिक चौकशी करून रॅगिंग घेणाऱ्या पाचही विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्याचे आदेश जारी केले. गेल्या ३१ मार्चला यादवेंद्रला होस्टेलमध्ये अडवून कपडे काढण्यास आणि अश्लील कृत्य करण्यास या पाच जणांनी भाग पाडले होते. कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे प्रतीक जैन, सिद्धार्थ अग्रवाल, मयंक सिंग, हर्षवर्धन सिंग आणि रवी बिदर अशी आहेत.

स्कॉटलंडजवळ हेलिकॉप्टर अपघातात १६ ठार झाल्याची भीती
लंडन, २ एप्रिल/पी.टी.आय.

ईशान्य स्कॉटलंड समुद्र किनाऱ्याजवळ ‘ब्रिटिश पेट्रोलियमच्या’ तेलखाणीमधील कामगारांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने १६ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमधील ८ जणांचे मृतदेह हाती लागले असून अन्य आठ जणांचा शोध घेण्यात येत असल्याचे, ‘ गार्डियन’ने म्हटले आहे. ब्रिटिश पेट्रोलियमच्या मिलर तेल कंपनीतून काम आटोपून परतणाऱ्या १४ कामगारांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर काल ईशान्य स्कॉटलंड समुद्र किनाऱ्याजवळ काल कोसळले होते.

मुंबई हल्ल्यातील आरोपींना पाकिस्तानने पकडावे - ओमर
जम्मू, २ एप्रिल/पी.टी.आय.

आपल्या भूभागाचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी करू दिला जाणार नाही, हे अभिवचन पूर्ण करीत पाकिस्तानने मुंबईवर हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्यांना पकडावे, अशी मागणी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केली. सध्या भारतात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने पाकिस्तानबरोबरची बोलणी नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच होतील, असे ते म्हणाले. अर्थात पाकिस्तानला मात्र आपला शब्द पाळायला पूर्ण वाव आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान स्वत: दहशतवादाने होरपळत आहे. त्यामुळे स्वहितासाठीदेखील त्यांनी दहशतवादी गटांवर कारवाई करायला हवी, असे अब्दुल्ला म्हणाले. काश्मीर खोऱ्यात नुकतीच घुसखोरांविरोधात झालेली धडक कारवाई व कुपवाडातील चकमकीबाबत विचारता ते म्हणाले, सीमेपलीकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न अधिक कठोरपणे चिरडले जातील. आम्ही दहशतवाद्यांची ताकद कमी लेखू इच्छित नाही त्याचबरोबर त्यांना अवास्तव महत्त्वही देऊ इच्छित नाही. बर्फ वितळू लागताच होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न लष्कर करीत आहे. माजी मंत्री राजौरीचे चौधरी तालिब हुसेन आणि अखनूरचे गोविंदराम शर्मा यांना पक्षात प्रवेश दिल्याची घोषणाही त्यांनी केली. हुसेन आधी नॅशनल कॉन्फरन्समध्ये होते. नंतर ते पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीत गेले व आता स्वगृही परतले आहेत. शर्मा यांनी याआधी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

‘दहशतवाद्यांना पाकिस्तानातील नेत्यांचाच पाठिंबा’
वॉशिंग्टन, २ एप्रिल/पी.टी.आय.
पाकिस्तानच्या अस्तित्वालाच दहशतवादाचा धोका सर्वाधिक असतानादेखील भारतविरोधी कारवायांसाठी या अतिरेक्यांचाच सर्वात जास्त उपयोग असल्याच्या भावनेतून दहशतवादी गटांना पाकिस्तानातील अनेक नेत्यांचेच पाठबळ लाभत आहे, असे मत अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जन. डेव्हिड पेट्रॉस यांनी काल मांडले. अमेरिकन सिनेटच्या अफगाणिस्तान व पाकिस्तानसंबंधातील सेनादल समितीसमोर बोलताना जन. पेट्रॉस यांनी हे मतप्रदर्शन केले. कित्येक नेत्यांना दहशतवादापेक्षा भारताचाच धोका सर्वाधिक वाटतो, असे ते म्हणाले. त्यातूनच अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर अल कायदा व तालिबानचा मुक्त संचार सुरू आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही देशाचे नाव न घेता ते म्हणाले, काही देश दहशतवादी गटांना पोसण्याची घोडचूक करीत आहेत. त्याचा आपल्या देशालाच खरा धोका पोहोचेल, याचे भानही त्यांना नाही. अफगाणिस्तान व पाकिस्तानातील अल कायदा व अन्य दहशतवादी गटांचा पाया कमकुवत करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न यापुढेही वेगाने सुरूच राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

मलेशियाचे पंतप्रधान बदावी यांचा राजीनामा
क्लालालंपूर, २ एप्रिल/पी.टी.आय.

सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन मलेशियाचे पंतप्रधान अब्दुल्ला बदावी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे सहकारी व उपपंतप्रधान नजीब रझाक आता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बदावी यांनी आज सकाळी मलेशियाचे राजे सुलतान मिझान झैनल अबीदीन यांची भेट घेतली व आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सोपविला. अबीदीन यांनी बदावी यांचा राजीनामा स्वीकारला असून नजीब रझाक हे शुक्रवारी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ऑक्टोबर २००३ मध्ये बदावी हे मलेशियाचे पंतप्रधान झाले होते.