Leading International Marathi News Daily शनिवार, ४ एप्रिल २००९
  समानतेच्या वाटेवरील पाऊलखुणा...
  समानतेसाठी आम्ही!
  कापूसकोंड्याची गोष्ट
  खरेदी
  हाडाची समाजसेविका
  विज्ञानमयी
  गुजगोष्टी!
  प्रेमाचा चमत्कार
  चंदेरी
  समृद्ध जीवनासाठी दिशादर्शक शिबिरं
  आला चेंडू गेला चेंडू...
  पोथ्यांमधलं ज्ञान उलगडताना
  ‘स्माइल पिंकी’च्या निमित्ताने..
  सोन्याच्या शोधात..
  फ्लेवर्स ऑफ इटली

 

‘लिंग-समानतेसाठी मी काय करतो/ करते?’ या विषयासंबंधात आपले प्रत्यक्षानुभव पाठविण्याच्या केलेल्या ‘चतुरंग’च्या आवाहनाला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातून अधोरेखित झालेलं समाजवास्तव आणि वैविध्यपूर्ण दृष्टिकोन यांचा कोलाज एकीकडे डोळ्यांत अंजन घालणारा होता, तर दुसरीकडे काहीसा आश्वस्त करणारा, आशादायकही होता. या प्रतिक्रियांतून निघालेले काही निष्कर्ष व त्यांचं विश्लेषण याबद्दल..
‘लिंग-समानतेसाठी मी काय करतो/ करते?’ या विषयावर प्रतिक्रिया पाठविण्याच्या ‘चतुरंग’च्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. संख्या आणि दर्जा या दोन्ही दृष्टींनी तो आश्वासक आहे. यानिमित्ताने ज्या तीनेकशे प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या, त्या वाचल्यानंतर समानतेबद्दलच्या कल्पना आणि त्यादृष्टीने होणाऱ्या प्रयत्नांची दिशा यांचे वैविध्य समोर आले. मुळात स्त्री-पुरुष समानतेची संकल्पना अजूनही सर्वसामान्य समाजात किती अल्पस्वल्प प्रमाणात भिनली आहे, हेही त्यातून दिसून

 

आले. तसेच काही संवेदनशील व्यक्तींनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून समानतेची स्वत:ची स्वत:च व्याख्या करून त्यानुसार वागण्याचा केलेला प्रांजळ प्रयत्न तितक्याच प्रामाणिकपणे शब्दबद्ध केलेला आहे.
काहीजण अजून या वाटेवर रुळलेले नाहीत, पण त्यांनी निदान त्या वाटेवर प्रवास तरी सुरू केलाय, हे त्यांच्या लेखनातून व्यक्त झाले आहे. काहींनी समानतेच्या वाटेवर अर्धामुर्धा प्रवास केला आहे. आणि त्यातही त्यातल्या काहींना यातल्या अपुरेपणाची जाणीव असल्याचे दिसते. तर काहींना मात्र ही जाणीव तितक्याशा तीव्रतेने झालेली नाही. त्यामुळे आपण लिंगवैशिष्टय़ांना फार चिकटून वागत नाही, याचा अभिमान त्यांच्या लेखनातून डोकावला आहे.
स्वानुभव पाठवणाऱ्यांमध्ये पंचाहत्तरीतील ज्येष्ठ नागरिक आहेत, तशीच विशीतील तरुणाईसुद्धा. सामाजिक परिस्थितीतील बदलांचे पडसाद त्यातून स्पष्टपणे उमटताना दिसतात. लिंग-असमानतेच्या वातावरणामुळे उच्च शिक्षण, नोकरी अशा संधींना मुकलेल्या एका आजीबाईंनी त्यांच्या सुनांना करिअर करण्याचा सल्ला किती आग्रहाने दिला, हे वाचताना पुढल्या पिढीतील सुधारणांसाठी आपले योगदान असावे, यासाठीची त्यांची कळकळ दिसून आली. ही तळमळ अनेक वयस्कांच्या पत्रांतून व्यक्त झाली आहे. स्वत:च्या मुलाच्या लग्नात वरपक्षाचा वरचढपणा ठामपणे झुगारू बघणारे आणि सुनांना, नातवंडांना लिंगसमानतेच्या भावनेने वागवणारे आजोबा भेटतात. पूर्वी पत्नीला घरकामात फारशी मदत न केलेल्या या आजोबांना आता सुनेला मात्र आवर्जून मदत करावीशी वाटते. आता अनेक घरांत ‘ए बाबा’ हे संबोधन रुजू पाहताना बघून आपल्यालाही ‘ए आजोबा’ संबोधावे, असा आग्रह धरणारे काही आजोबा या पत्रांतून भेटले.
काही आजीबाईंनी पक्व संसाराच्या अनुभवानंतर पतीची साथ कशी मोलाची ठरली, हे कौतुकाने लिहिले आहे. मॅट्रिक झालेल्या पत्नीला आणखी शिकण्याचा आग्रह धरणारे, तिच्या आजारपणात तिची मनोभावे सेवा करणारे, तिच्या आवडीनिवडी जपणारे, मुलांनीही तिला सन्मानाने वागवावे, असा वस्तुपाठ स्वत:च्या वागणुकीतून घालून देणारे, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी उचललेले, तिला प्रत्येक आर्थिक व्यवहारात सामील करून घेतलेले अशा काही गुणी जोडीदारांचे गुणगान गात काही ज्येष्ठ महिलांनी मनस्वीपणे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. काहींनी तर त्यांच्या कव्हरिंग लेटरमधून कृतज्ञता प्रकटीकरणाची संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे ऋण मानले आहेत. त्यांच्या काळात हक्काच्या माणसांना वेळोवेळी ‘थॅंक यू’ म्हणण्याचा प्रघात नव्हता आणि म्हणून या भावना कायम अव्यक्तच राहिल्या, ही रुखरुख काहींच्या लेखनातून डोकावली आहे.
काही पत्रांतून लिंगसमानतेच्या त्यांच्या कल्पना किती खुज्या आहेत, हेही दिसून आले. पत्नीला अनेकदा सकाळी चहा करून देतो, तिला अधूनमधून रेस्टॉरंटमध्ये आयते जेवायला घेऊन जातो, एकेरी संबोधनाचा आग्रह धरतो, बायकोला माहेरी जायला अडवत नाही, मुलीलाही उच्च शिक्षणाला तसेच शर्ट-पॅंट घालण्यास मज्जाव केला नाही- अशा तुटपुंज्या निकषांवर स्वत:ला लिंगसमानतावादी समजणारे महाभागही या पत्रांतून भेटले. तसेच शारीर वैशिष्टय़ांनुसार लिंगभेद राहणारच, बालसंगोपन, घरेलू जबाबदाऱ्या यांवर गृहस्वामिनींचा पगडा असणे नैसर्गिक न्यायाला धरूनच आहे, असे म्हणणाऱ्या पुरुषांना हे भेद नैसर्गिक नसून, सामाजिक परिस्थितीजन्य आहेत, हे अद्यापि आकळलेले नाही, हेही अधोरेखित होते.
तरुणाईच्या काही प्रतिनिधींच्या प्रतिक्रियांतून समाजबदलाचे नवे सुखावणारे चित्र समोर येत आहे. काही तरुण मुलींनी समान संधी दिल्याबद्दल आपल्या आई-वडिलांचे ऋण मानले आहेत. उच्च/परदेशी शिक्षण, वर्तणुकीचे साचेबद्ध संकेत याच्या पलीकडे घडण्याची संधी मिळाल्यामुळे आज कोणते लाभ जाणवतात, तसेच पालकांच्या अशा पाठिंब्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा फुलोरा कसा फुलत गेला, हेही त्यांनी विशद केले आहे. समानतेची पक्की रुजवात झालेल्या या तरुण मुलींच्या निवेदनातून आत्मप्रतिष्ठा जपण्याच्या भावनेतून त्यांनी अनुसरलेले नवे संकेत समोर येतात. पुरुष सहकाऱ्यांसोबत काम करताना कसे वागावे, पेहेराव कसा असावा, देहबोली कशी असावी, जोडीदारनिवडीचे निकष काय, याचे त्यांचे त्यांनी आखून घेतलेले विचारी संकेत त्या आत्मविश्वासाने व्यक्त करतात.
एका तरुण महिलेचे मनोगत मात्र चटका लावून गेले. मुलगी म्हणून नमते घेण्याचा तिच्यावर झालेला संस्कार आणि मुलगी म्हणून दुय्यम वागणूक मिळाल्याने तिच्या वाटय़ाला अनेकदा आलेले नाकारलेपण- यामुळे आज संसारी जीवनात अन्याय वाटय़ाला आला तरी विरोधाची पुरेशी ताकद तिच्यात नाही, याचे शल्य तिने मांडले आहे.
काही तरुण मुलग्यांनी घरातील सम-संस्कारांचा परिपाक म्हणून समानतेने वागण्याची मनोवृत्ती आणि त्यासाठी लागणारे बळ त्यांच्यात कसे आले आहे, हे छान सांगितले आहे. मुलांच्या पालनपोषणासाठी स्वत:हून घरून काम करणारा इंजिनीअर, पत्नीच्या बदलीनंतर तिच्या कामाच्या ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर सुकर व्हावे, यासाठी प्रसंगी स्वत: वर्षभराचा ब्रेक घेणारा नवरा- असे सुखद अपवादही पत्रांमधून भेटले.
एकीकडे मागच्या पिढीतील काही पुरुषांनी घरातील समानतेच्या वर्तणुकीमुळे आजूबाजूच्यांकडून कसे टोमणे सहन करावे लागत आणि मग मन:स्थिती कशी द्विधा होई, हे सांगितले आहे, तर दुसरीकडे समानतेने वागण्याचे बळ आपल्यात आलेले आहे, हे आजचे तरुण ठामपणे मांडत आहेत. त्यांना तसे घडवणाऱ्या पालकांचे हे समाजाला मोठेच योगदान आहे.
या मनोगतांमधून समानतेचा संस्कार आजच्या लहानग्यांवर घडवू पाहणाऱ्या तरुण आया तर अनेक भेटल्या. पुढच्या पिढीपर्यंत लिंगभेद मिटवू पाहणाऱ्या अशा पालकांचे प्रमाण जितके वाढेल, तितके हे ध्येय परिणामकारकरीत्या साध्य होईल.
कामाच्या ठिकाणी लिंगसमान वर्तणुकीचे दाखले देणारी काही पत्रेही या गठ्ठय़ात होती. एका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयात गर्भलिंग जाणण्यासाठी आलेल्यांना कसे समुपदेशन केले जाते, नसबंदीसाठी पुरुषांनी पुढे येण्याचे महत्त्व कसे पटवले जाते, ते लिहिले आहे. महिला बॉस, महिला सहकारी यांच्याबरोबर काम करण्याचे सकारात्मक अनुभव काही पुरुषांनी मोकळेपणे मांडले आहेत. महिलांना बदलीपासून कायम दूर ठेवल्याने पुरुष शिक्षकांना सहन कराव्या लागणऱ्या अन्यायाचे परिमार्जन महिलांना फार गैरसोयीची झळ लागू न देता कसे केले, याचा एक वेगळा अनुभव एका अधिकाऱ्याने विशद केला आहे. वसईच्या एका शाळाशिक्षिकेने विद्यार्थ्यांमध्ये समानता रुजविण्यासाठी कोणते प्रयत्न केले जावेत, ते सुचविले आहे.
एकंदरीत या मनोगतांमध्ये बरेच आशेचे किरण दिसले. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व वयोगटांचे वाचक या विषयावर लिहिते झाले, याचे मोठे समाधान आहेच, पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आवाहनाच्या चौकटीत आम्ही जे म्हटले होते, की अशा आवाहनांना महिलांचाच प्रतिसाद भरभरून मिळतो, मात्र पुरुषांचा प्रतिसाद जेमतेम तीन टक्केही मिळत नाही, हे वाक्य अनेक पुरुषांनी मनावर घेतलेले दिसते. कारण यावेळी पुरुषांचा प्रतिसाद ३३ टक्क्यांहून जास्त लाभला आहे.
या मनोगतांच्या निमित्ताने जणू स्त्री-पुरुष समानता या विषयावरचा एक जलद ‘सॅम्पल सव्‍‌र्हे’ झाला, असे म्हणता येईल. काही पत्रांच्या वाचनातून समानतेचे लक्ष्य अजून किती दूर आहे, याची लख्ख जाणीव झाली, तर काही पत्रांतून निदान त्या वाटेवर आपला मराठी समाज मार्गक्रमण करीत आहे, याचे समाधान मिळाले. आणि काही पत्रे सुखावणारी होती. हे ‘रोल मॉडेल’ समाजासमोर प्रकर्षांने यावेत म्हणून अशी काही पत्रे आम्ही पूर्णत: प्रकाशित करीत आहोत, तर काही पत्रांतील निवडक मुद्दे तुमच्यासमोर मांडत आहोत. ही निवड प्रातिनिधिक आहे. पुनरावृत्ती टाळण्यासाठी समान मुद्दे असलेल्या पत्रांतील काही प्रातिनिधिक पत्रे प्रसिद्ध करीत आहोत. या मनोगतांमुळे समाजात या विषयावर अधिक विचार आणि चर्चा व्हावी, ही अपेक्षा सार्थ ठरेल, अशी आशा वाटते.
आमच्याकडे आलेली शेकडो पत्रे वाचून, त्यातील काही निवडून, संपादित करून प्रसिद्ध करण्याचे हे काम तसे सोपे नव्हते. हे जिकिरीचे काम करण्याच्या कामी मला माझे सहकारी रवींद्र पाथरे, सुचिता देशपांडे आणि लता दाभोळकर यांची जिव्हाळ्याची व मोलाची साथ लाभली. एक नक्की, की आम्ही सर्वानीच हे काम एन्जॉय केले. समानतेच्या चुकीच्या किंवा अपुऱ्या कल्पना मांडणारी काही पत्रे सलग वाचून मरगळ आली की, एखादे प्रेरणादायी पत्र हाती लागायचे आणि मग मन उल्हासित व्हायचे. एखादे पत्र तर मनाला इतके भावायचे, की मग त्याचे आम्ही जाहीर वाचन करायचो. एकंदरीत पत्रनिवडीच्या या प्रवासात अनेक सोनेरी कवडसे भेटले. त्यामुळे ‘माइल्स टू गो..’ ही जाणीव जितकी उत्कटपणे झाली, तितकीच ‘जर्नी इज ऑन आणि डायरेक्शन इज राइट’ याही भावनांनी आश्वस्त केले.
हे संकलन म्हणजे समानतेच्या वाटेवरच्या काही ठळक पाऊलखुणा वाचकांसमोर आणण्याचा एक प्रयत्न आहे. त्यात अधिकाधिक पाऊलखुणांची भर पडो.. या पायवाटांचे हमरस्ते होवोत, यासाठी आपण सर्वानी कटिबद्ध होऊया.
शुभदा चौकर