Leading International Marathi News Daily
शनिवार, ४ एप्रिल २००९

अमेरिकेच्या दारावर पुन्हा दहशतवादाची थाप!
अज्ञात इसमाच्या गोळीबारात १२ ठार; ४१ ओलिस
न्यूयॉर्क, ३ एप्रिल/पीटीआय
बिंग्हॅम्टन येथील इमिग्रेशन सव्‍‌र्हिसेस सेंटरमध्ये आज एका बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार झाले. हे सेंटर असलेल्या अमेरिकन सिव्हिक असोसिएशनच्या इमारतीमध्ये या हल्लेखोराने किमान ४१ लोकांना ओलिस ठेवले आहे. बिंग्हॅम्टन प्रेस व सन बुलेटिनने यासंदर्भात दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हा बंदुकधारी इमारतीमध्ये शिरला आणि त्याने अचानक बेछूट गोळीबाराला प्रारंभ केला.

काँग्रेसच्या दबावामुळे भुवनेश्वरला जाणाऱ्या पवार यांच्या विमानात ‘तांत्रिक बिघाड’
नवी दिल्ली, ३ एप्रिल/खास प्रतिनिधी
भुवनेश्वरमध्ये तिसऱ्या आघाडीच्या विमानतळावर उतरण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ‘सज्ज’ होते. पण भुवनेश्वरला जाणारे त्यांचे विमान युपीएच्या धावपट्टीवरून उडालेच नाही. काँग्रेस विरोधकांच्या व्यासपीठावर जाऊ नका, असा काँग्रेसच्या वतीने गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेल्या इशाऱ्याचा परिणाम होऊन पवार यांच्या विमानात ऐनवेळी ‘तांत्रिक बिघाड’ उद्भवला आणि त्यांना काँग्रेसच्या दबावाखाली तिसऱ्या आघाडीला ‘खो’ देणे भाग पडले.

डाव्यांना टाळून पवारांचा आता भुवनेश्वर दौरा!
मुंबई, ३ एप्रिल / खास प्रतिनिधी

काँग्रेसच्या दबावामुळेच शरद पवारांनी भुवनेश्वरचा दौरा रद्द केल्याचा दावा काँग्रेसच्या वर्तुळातून केला जात असला तरी आपल्याला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही व आपण अन्य पक्षाच्या नेत्यांच्या सल्ल्याला फारशी किंमत देत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या दबावामुळे दौरा टाळल्याच्या आरोपांचा इन्कार करण्याचा आज प्रयत्न केला.

भाजपची रामनवमी
नवी दिल्ली, ३ एप्रिल/खास प्रतिनिधी

गरीबांना तीन रुपये प्रतिकिलो दराने महिन्याला २५ किलो गहू किंवा तांदूळ उपलब्ध करण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावर कुरघोडी करताना आज भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दारीद्रय़रेषेखालील कुटुंबांना २ रुपये प्रतिकिलो दराने महिन्याला किलो गहू वा तांदूळ देण्याची घोषणा केली. भाजप मुख्यालयात आज दुपारी पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थित प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात भाजपने राम मंदिर, राम सेतु, गंगा व गोवंश या हिंदूुत्वाच्या मुद्यांसह कलम ३७० आणि समान नागरी कायद्यासारखे मुद्दे ऐरणीवर आणले आहेत.
रामनवमीचे निमित्त साधून आज भाजपने २००९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा जनतेपुढे मांडला. पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या या जाहीरनाम्यात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंसह अंतर्गत सुरक्षा, दहशतवाद, ऊर्जा, आरोग्य, महिला, युवक, देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित वर्गाविषयी पक्षाच्या भूमिका स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ‘आम आदमी’वर लक्ष केंद्रीत करणाऱ्या प्रतिस्पर्धी काँग्रेसप्रमाणेच भाजपनेही चाळीस पानांच्या या जाहीरनाम्यात गरीबांच्याच प्रश्नांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.

दहशतवादाचा बिमोड करण्याची संधी पाकिस्तानने साधावी
मनमोहन सिंग यांचे आवाहन
लंडन, ३ एप्रिल/पी.टी.आय.
दहशतवादाला आळा घालण्याबाबत आपण प्रामाणिक आणि इच्छुक आहोत, हे जगाला दाखविण्याची सुसंधी पाकिस्तानकडे चालून आली आहे. ही संधी पाकिस्तानने साधावी, असे आवाहन करतानाच पाकिस्तानी भूमीवरून दहशतवादाला प्रोत्साहन मिळणे थांबत नाही तोपर्यंत द्विपक्षीय संवाद होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. ‘जी-२०’ देशांच्या शिखर परिषदेसाठी येथे आलेल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानविषयीची भारताची भूमिका जगातील सर्वात प्रबळ अशा राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीच्या पाश्र्वभूमीवर विषद केली.

ग्वान्टानामोचा तुरुंग बंद करण्याच्या ओबामा यांच्या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत
स्ट्रॉसबर्ग, ३ एप्रिल/वृत्तसंस्था

ग्वान्टानामो येथील तुरुंग बंद करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्ट्रॉसबर्ग येथील टाऊन हॉलमध्ये आयोजिलेल्या सभेत जाहीर करताच तेथे उपस्थित असलेल्या शेकडो लोकांनी या घोषणेचे टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्वागत केले. या सभेला मुख्यत्वे फ्रान्स व जर्मनी येथील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अण्वस्त्रांच्या संख्येत कपात करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचीही ओबामा यांनी आपल्या भाषणादरम्यान घोषणा केली.

मनमोहन सिंह हे सुज्ञ आणि आनंददायी व्यक्तिमत्व -ओबामा
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांना भेटल्याने विशेष आनंद झाला असे सांगतानाच मनमोहन सिंह हे सुज्ञ आणि आनंददायी व्यक्तिमत्व असल्याचे मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले. ओबामा यांनी मनमोहन सिंह यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा वेध घेताना त्यांची स्तुती केली. भारताला विकासाच्या रस्त्याने घेऊन जाणारा हा एक चांगाला पंतप्रधान असल्याचे सांगून ओबामा म्हणाले त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्यत्रामुळे भारताची प्रगती वेगाने होत आहे त्याला सिंह यांचे धोरण कारणीभूत आहे. मनमोहन सिंह हे हुषार आणि तेवढेच चांगले सर्वाना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व असल्याचेही ओबामा म्हणाले.

किवींना शेपटाचा तडाखा
वेलिंग्टन, ३ एप्रिल / पीटीआय
आघाडीचे पाच फलंदाज दोनशे धावांचा टप्पा ओलांडण्यापूर्वीच माघारी परतल्यानंतरही भारताच्या शेपटाने दिलेल्या तडाख्यामुळे तिसऱ्या आणि अखरेच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघ गलितगात्र झाला. भारताने ५ बाद १८२ धावसंख्येवरून दिवसअखेर ९ बाद ३७५ अशी आश्वासक धावसंख्या गाठली आहे. त्यात हरभजनसिंग (६०), झहीर खान (३३) यांच्यासह महेंद्रसिंग धोनी (५२) यांच्या जिगरबाज खेळीचा समावेश आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर यजमानांनी आज भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. भारताने सुरुवातही तडाखेबंद फलंदाजीने केली. वीरेंद्र सेहवागने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना ४८ धावांचे योगदान दिले. सचिन तेंडुलकरचीही ६२ धावांची खेळी मोलाची ठरली. पण १ बाद ७२ अशी सुरुवात करणारा भारतीय संघ ६ बाद २०४ अशा अडचणीत सापडला होता. मात्र पाठदुखीतून सावरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी व हरभजनसिंग यांनी सातव्या विकेटसाठी केलेली ७९ धावांची भागीदारी न्यूझीलंडच्या स्वप्नांवर पाणी फेरणारी ठरली. दिवसअखेर इशांत शर्मा (१५) व मुनाफ पटेल (१४) नाबाद होते. भारताने कठीण परिस्थितीतून स्वत:ला सावरल्यानंतरही किवी खेळाडू आपल्या कामगिरीबद्दल समाधानी होते. आपल्या पहिल्या डावात भारताची धावसंख्या मागे टाकून भक्कम आघाडी घेण्याचा यजमानांचा विचार आहे.

जादुई आकडय़ासाठी मदत करीन, पण पंतप्रधान सहमतीने ठरावा - शरद पवार
मुंबई, ३ एप्रिल / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यूपीएमध्येच राहील, अशी ग्वाही देतानाच यूपीएला २७२चा जादुई आकडा गाठण्यासाठी संख्याबळ कमी पडत असल्यास अन्य निधर्मवादी पक्षांची मदत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेईल, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. मात्र दुसऱ्याच क्षणाला पंतप्रधानपदाचा उमेदवार सहमतीने ठरावावा असा आग्रह धरीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील आपला दावा कायम ठेवला. राष्ट्रीय पातळीवर यूपीएने आघाडी करावी ही राष्ट्रवादीची मागणी काँग्रेसने मान्य केली नाही. त्यामुळे यूपीएतील प्रत्येक घटक पक्षांना वेगवेगळी भूमिका घ्यावी लागली. राष्ट्रवादीची महाराष्ट्र व गोव्यात काँग्रेसबरोबर आघाडी झाली आहे. अन्य काही राज्यांमध्ये राष्ट्रवादीची अन्य पक्षांबरोबर आघाडी होणार आहे. अन्य राज्यांमध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात असलो तरी निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी यूपीएबरोबरच कायम राहिल, अशी ग्वाही पवारांनी दिली. मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आदी यूपीएतील प्रमुख नेते काँग्रेसच्या विरोधात लढत असले तरी त्याचा भाजपसारख्या जातीयवादी पक्षांना फायदा होणार नाही, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. निकालानंतर यूपीएचे सर्व घटक पक्षांचे नेते एकत्र येतील व पंतप्रधानपदासाठी सहमतीने नाव ठरविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गुजरातमध्ये कडाक्याचा उष्मा
अहमदाबाद, ३ एप्रिल/पी.टी.आय.

गुजरातमध्ये उष्णतेची लाट असून ती आणखी काही दिवस कायम राहील, असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले. नेहमीपेक्षा राज्यातील तापमान तीन ते चार अंश सेल्सियसने वाढले आहे. अहमदाबादमधील कमाल तापमान काल ४० अंश सेल्सियस नोंदले गेले. राजकोटमध्ये ते ४२ अंश सेल्सियस नोंदले गेले. बडोद्यातही तापमान ४२ अंश सेल्सियस होते. नेहमीच्या तापमानापेक्षा ते दोन अंश सेल्सियसने अधिक होते. अरबी समुद्रापासून १५ किलोमीटरवर असलेल्या सुरतमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियस आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी