Leading International Marathi News Daily
रविवार, ५ एप्रिल २००९

आघाडीतील बिघाडी
बंड, दगाबाजी आणि फितुरी या गोष्टी राजकारणाचा स्थायीभाव मानल्या जातात. सर्वच राजकारणी तसे नसतात, पण जे असतात ते राजकारणाचा पटच विस्कटून टाकतात. म्हणूनच निष्ठावानांपेक्षा बंडखोरांना व फितुरांना महत्त्व प्राप्त होते. निवडणूक हा या दगाबाजीचा मोसमच असतो. आपल्या प्रबळ प्रतिस्पध्र्याला खिंडीत गाठून कुचकामी किंवा हतबल करण्याची कारस्थानेही याच काळात फोफावतात. महाराष्ट्रातील युती, आघाडी आणि दिल्लीच्या राजकीय क्षेत्रातील अशा बंडाळीच्या या सुरस कथा!
मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे कधी नव्हे एवढी लोकसभा निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. पूर्वी काँग्रेस पक्षात लोकसभेवर जाण्यास फारसे कोणी इच्छुक नसायचे. राज्यात पत्ता कापण्यासाठी मग एखाद्याच्या गळी बळेबळे लोकसभेची उमेदवारी लादून प्रतिस्पर्धी कमी करण्याची खेळी खेळली जायची. लोकसभेत गेला म्हणजे राज्याच्या राजकारणातून संपला, असेच सर्वसाधारण मत होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. विधानसभेचा
 

मतदारसंघ नव्या रचनेत बदललेल्यांना लोकसभेचे वेध लागले. एकदा आमदारकी भूषविलेल्यांना लोकसभेचे वेध लागले. यातूनच विधानसभेच्या धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये कधी नव्हे एवढी लोकसभेच्या उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली. त्याचे प्रत्यंतर इच्छुकांच्या मुलाखतींच्या वेळी आले. विधानसभेप्रमाणे तिकीटवाटपाच्या वेळी झिंदाबाद-मुर्दाबादच्या घोषणांनी टिळक भवन दुमदुमले होते.
लोकसभेपासून अगदी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपर्यंत काँग्रेसजनांना स्वपक्षातील असंतुष्टांशी सामना करावा लागे. या वेळी राज्यातील काँग्रेस उमेदवारांना स्वपक्षातील असंतुष्टांबरोबरच राष्ट्रवादी अशा दुहेरी आघाडीवर सामना करावा लागणार आहे. काहीही करून राज्यात काँग्रेसच्या जागा जास्त निवडून येऊ नये, असे राष्ट्रवादीचे धोरण आहे. यामुळेच काँग्रेसच्या उमेदवारांना कसे पाडता येईल याची खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जाण्याची शक्यता अधिक आहे.
पक्षातील अन्य इच्छुकाने उघडपणे बंडखोरी केल्यास त्याच्याबरोबर कोणकोण नेते वा कार्यकर्ते आहेत, त्याचा कोठे जोर आहे हे समजू शकते. मात्र पक्षात राहून उमेदवाराच्या विरोधात काम करणे हे अधिकृत उमेदवाराला अधिकच त्रासदायक ठरते. ही बाब सर्वच पक्षांना लागू होत असली तरी काँग्रेस पक्षात त्याचा धोका अधिक असतो. कारण जेथे काटय़ाची टक्कर असते तेथे स्वपक्षातील असंतुष्टांची पक्षात राहून केलेल्या विरोधी कारवाया अधिकच अडचणीत आणतात. त्यासाठी मग जातीपातीचा आधार घेतला जातो.
राज्यात आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला २६ जागा आल्या आहेत. त्यातील काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकतील अशा सुमारे डझनभर मतदारसंघांमध्ये स्वपक्षातील लाथाळ्यांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पक्षातील असंतुष्टांची समजूत काढावी लागणार आहे. स्वपक्षातील असंतुष्ट शांत झाल्यावर मग विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे.
रायगडमधून निवडणूक लढविण्यावरून केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सुरुवातीपासून तळ्यात-मळ्यात सुरू होते. पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतरही हो-ना, हो-ना सुरूच होते. रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचा एक गट उघडपणे अंतुले यांच्या विरोधात आहे. पुण्यातही सुरेश कलमाडी यांना अजित पवारांच्या नाराजीबरोबरच स्वपक्षातील नाराजांचा सामना करावा लागत आहे. स्वपक्षीय बंडखोर नेते कितपत साथ देतील याबाबत साशंकताच आहे. धुळ्यात अमरिश पटेल यांना माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या समर्थकांनी पाडण्याचा चंगच बांधला आहे. अमरिश पटेल यांचा विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांना लोकसभेचे वेध लागले. पटेल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रोहिदास पाटील यांच्या समर्थकांनी दोन दिवस काँग्रेस कार्यालयाबाहेर अभूतपूर्व असा गोंधळ घातला. तसेच पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिमा जाळण्यापर्यंत मजल गेली. नागपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांना शहरातील स्वपक्षाच्या सर्व नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे मुत्तेमवार विरुद्ध काँग्रेसचे स्थानिक नेते असे चित्र आहे. यातूनच मुत्तेमवार यांच्या विरोधातील उमेदवाराला सारी रसद पुरविण्याचे उद्योग स्वपक्षातूनच सुरू झाले आहेत. चंद्रपूरमध्ये नरेश पुंगलिया यांना असाच विरोध आहे. तेथेही माजी मंत्री पोटदुखे यांचा गट पुंगलिया यांना नाट लावल्याशिवाय राहणार नाही. वर्धा मतदारसंघात दत्ता मेघे यांना प्रभा राव यांचा गट विरोध करीत आहे. लातूरच्या उमेदवारीवरून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात धुसफूस सुरू आहे. विलासरावांनी शिफारस केलेल्या उमेदवाराच्या नावाला शिवराज पाटील यांनी विरोध केला.
सांगलीत महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांची नाराजी काँग्रेसला तापदायक ठरू शकते. प्रतीक पाटील यांना डॉ. कदम यांचा गट मनापासून कितपत साथ देईल याबाबत साशंकताच आहे. गेली चार दशके ताब्यात असलेली ही जागा कायम राखण्याचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्ह्यातही सारे काही आलबेल नाही. भाजपमधून काँग्रेसवासी झालेल्या हरिभाऊ राठोड यांना मतदारसंघातील सुमारे अडीच लाख बंजारा मते डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी देण्यात आली असली तरी जुने काँग्रेसजन राठोड यांना मदत करणार नाहीत. शिर्डी व नगरवरून ज्येष्ठ खासदार बाळासाहेब विखे-पाटील हे नाराज आहेत. शिर्डीत रामदास आठवले यांना उमेदवारी मिळाल्याने कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा गट समाधानी असला तरी विखे-पाटील यांची नाराजी दूर झाल्याशिवाय आठवले यांचे काही खरे नाही. गेल्या वेळी मुंबईने काँग्रेसला साथ दिली होती. आता मात्र मुंबईत काँग्रेसमध्ये लाथाळ्या एवढय़ा टोकाला गेल्या आहेत की परस्परांना पाडण्याचे उद्योग त्यातून होणार आहेत. दक्षिण-मध्य मुंबईतून पुन्हा उमेदवारी मिळालेल्या खासदार एकनाथ गायकवाम्ड यांच्या प्रचारात स्थानिक पातळीवर एक गट सक्रियच झालेला नाही. या गटाने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेकडे पाठ फिरवली होती. ईशान्य मुंबईऐवजी उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या गुरुदास कामत यांनाही पक्षांतर्गत आव्हान आहेच. जुना हिशेब चुकता करण्याची संधी पक्षातील काही नेते सोडणार नाहीत. मुंबईत अन्य उत्तर भारतीय नेता मोठा होऊ नये असा प्रस्थापित नेत्यांचा प्रयत्न असतो. यातूनच संजय निरुपम यांना पक्षातून कितपत मदत होईल याबाबत साशंकताच आहे. पालघरमध्ये दामू बारकू शिंगडा यांना पक्षातील बहुतांशी नेत्यांनी विरोध केला आहे.
विधानसभा मतदारसंघ नव्या रचनेत इतरत्र विभागला गेल्याने लोकसभेवर जाण्यासाठी काँग्रेसचे पाथर्डीचे आमदार राजीव राजळे यांनी किती धडपड केली हे उदाहरणही मजेशीर आहे. नगर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेल्याने आमदार राजळे यांनी शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारीची मागणी केली. मात्र पवारांनी त्यांना अजिबात थारा दिला नाही. उलट चार गोष्टी सुनावल्या. त्यानंतर राजळे यांनी भाजपमध्ये खडे टाकून बघितले. तेथेही डाळ शिजली नाही. शेवटी बसपाची दारे ठोठावली. तेथे आधीच राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारलेल्या खासदार तुकाराम गडाख यांनी फिल्डिंग लावली होती. मग म्हणे राजळे यांनी मनसेचा पर्याय बघितला. अशा या राजळे यांना कोणत्याच पक्षाने थारा दिला नाही.
काँग्रेस उमेदवाराचा पराभव काँग्रेसजनच करतात असे नेहमी बोलले जाते. महाराष्ट्रातील काँग्रेसमधील पक्षांतर्गत लाथाळ्यांचे चित्र बघता काँग्रेसच्या उमेदरवारांना स्वपक्षीयांचाच अधिक धोका जाणवत आहे !
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही लाथाळ्यांची कमतरता नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील गुप्त वा खुल्या बंडाचे शरद पवार हे आद्य प्रवर्तक मानले जातात. वयाच्या ३८व्या वर्षी वसंतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचे सरकार पाडून शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा पवारांनी उघडपणे काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसचे सरकार पाडले होते. पवारांच्या गुप्त कारवायांचा राज्यातील अनेक महान नेत्यांना फटका बसला आहे. पवार अशीही काही खेळी खेळतात की राजकारणात अनेक उन्हा़ळे व पावसाळे घालविलेल्यांना त्याचा पत्ता लागत नाही. पंतप्रधानपदाच्या मह्त्वाकांक्षेने निवडणुकीत उतरलेल्या पवारांनी या वेळी भल्याभल्यांना गारद करण्यासाठी जाळे टाकले आहेच. सध्या पवारांना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकेल असा राज्यातील एकच नेता आहे,तो म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख. यामुळेच पवारांनी विलासरावांचा दिल्लीचा मार्गच रोखून धरला. उस्मानाबादची राष्ट्रवादीची जागा निवडून येणे कठीण असल्याची जाणीव असूनही पवारांनी ही जागा काँग्रेस वा विलासरावांसाठी सोडली नाही.
पवारांच्या राजकारणाचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आल्यास ते भारी पडेल याचा पूर्ण अंदाज असल्यानेच काँग्रेसचे संख्याबळ बहुमताच्या जवळ कसे राहिल याची खबरदारी पवारांनी घेतली होती. आताही पवारांनी काँग्रेसला कसा धडा शिकविता येईल या दृष्टीने आखणी केली आहे. यामुळेच महाराष्ट्रात यूपीएचा घटक पक्ष तर देशातील अन्य राज्यांमध्ये काँग्रेसच्या विरोधातील आघाडीत राष्ट्रवादी असे काहीसे विचित्र समीकरण तयार झाले आहे.
राष्ट्रवादीला काही मतदारसंघांमध्ये स्वपक्षीयांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार देविदास पिंगळे व त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. समीर यांची निवडणूक छगन भुजबळांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. हिंगोलीत केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांना काँग्रेसपेक्षा स्वपक्षीयांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांंमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्याच नेते व कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात धन्यता मानली. परिणामी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासारखे नेते मनापासून कितपत साथ देतील याबद्दल साशंकताच आहे. नगरमध्ये उमेदवारी नाकारल्याने विद्यमान खासदार तुकाराम गडाख यांनी सरळ बसपाचा मार्ग धरला. गडाख हे राष्ट्रवादीच्या काही मतांवर तरी डल्ला मारतील अशी चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या बालेकिल्ल्यात विद्य्मान खासदार सदाशिव मंडलिक यांनी पवारांनाच उघडपणे आव्हान देत बंडाचे निशाण फडकविले आहे. साताऱ्याची जागा कायम राखण्याकरिता राष्ट्रवादीच्या नेत्यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. दोन आठवडे सातत्याने हुलकावणी देणाऱ्या उदयनराजे यांना शेवटी राष्ट्रवादीचे नेतृत्व शरण गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोल्हापूरमध्ये संभाजीराजे यांना आयात करण्यात आले आहे. दिंडोरीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने संतप्त झालेले माजी मंत्री ए. टी. पवार यांनी पक्षाच्या जाहीर सभेत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले. जळगाव जिल्ह्यात पक्षांतर्गतही सारे काही आलबेल नाही. बीडचे खासदार जयसिंहराव गायकवाड यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. बीडमध्ये पक्षाने तुलनेने कमकुवत उमेदवार दिल्याची चर्चा आहे.
उदयनराजे भोसले आणि अजितदादा पवार यांच्यातून विस्तवही जात नाही. यातूनच अजितदादांचा उदयनराजे यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. पण साताऱ्याची जागा कायम राखण्याकरिता उदयनराजे यांनाच शरद पवारांनी पसंती दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या आझम पानसरे यांना उमेदवारी देण्यास पक्षात सुरुवातीला विरोध होता. मात्र अजितदादांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे पानसरे यांचे निभावले. मावळमध्ये पक्षांतर्गत कुरबुरी आहेतच. पानसरे यांना पक्षातून छुपा विरोध होण्याची शक्यता आहे.
ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे संजय पाटील हे फारसे प्रभावी नाहीत. भंडाऱ्यात केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना काँग्रेसमधील विरोध काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकतो. तेथे काँग्रेसचे माजी आमदार नाना पटोले हे अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील गुफ्तगूबाबत जोरदार चर्चा होती. यामुळे सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही राष्ट्रवादीबाबत संशयाचे वातावरण आहे. दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खऱ्या अर्थाने मनोमिलन दोन-चार अपवाद सोडले तर झालेलेच नाही. पवारांच्या गुगलीचा जसा काँग्रेसला फटका बसू शकतो तसाच फटका राष्ट्रवादीला काँग्रेसच्या नाराजीचा बसू शकतो. पंतप्रधानपदाबाबत राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहीलच याची काहीही हमी नाही या दोन मुद्दय़ांवर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीबाबत असलेल्या संशयाच्या वातावरणाचा, जेथे काँग्रेसची मते निर्णायक आहेत तेथे फटका बसू शकतो.
काँग्रेस व राष्ट्रवादी ही अनिच्छेने झालेली आघाडी आहे. परस्परांना उभयतांची गरज आहे. राष्ट्रवादीमध्ये पवारांचा शब्द प्रमाण मानला जातो. तरीही या वेळी काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादीमधूनच हिशेब चुकते केले जाण्याची शक्यता अधिक आहे.
संतोष प्रधान