Leading International Marathi News Daily
रविवार, ५ एप्रिल २००९

अलौकिक आणि प्रतिभावान गायिका किशोरी आमोणकर येत्या १० एप्रिलला वयाच्या ७९व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. किशोरीताईंचा ‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ अलीकडेच ‘राजहंस प्रकाशन’ने प्रसिध्द केला आहे. या दोन्हींचे निमित्त साधून त्यांच्या सुहृदाने शब्दबध्द केलेले हे किशोरीताईंचे व्यक्तिमत्त्व-
‘‘हीआयोजकांची रीत झाली का?’’ ताई संतापून बोलत होत्या, ‘‘हे यूपीचे कोण आयोजक आहेत. त्यांना मी सांगितलं की, मला या महिन्याची १८ तारीख जमणार नाही. तर चार चार वेळा दिवसांतून फोन. मी रियाझ करू की यांचे फोन घेऊ? मी काय ऑपरेटर आहे? अहो! आता तर या माणसाने मला २५ हजारांचा डीडीच पाठवलाय! हा मला विकत घ्यायला निघालाय की काय? मी आता तो डीडी रघूबरोबर पोस्टाने रजिस्टर करून परत पाठवायला दिलाय! त्याला वाटले असेल, मी डीडी पाहून हो म्हणेन! मूर्ख कुठला! ही काय रीत झाली! माझा सगळा दिवस व शक्ती वाया गेली!’’
ण्ण्ण्
एके दिवशी माझा भाग्ययोग उजाडला! ती. प्रभाकर मला किशोरीताईंकडे घेऊन गेला. ती त्यांची- माझी पहिली भेट. पण
 

पहिल्या भेटीतच आम्हा दोघांनाही कळले की, आमची ‘जातकुळी’ एकच आहे! अध्र्या तासाने आम्ही त्यांच्या घरून जायला निघालो तशा निरोप देताना ताई म्हणाल्या, ‘‘दाजी, परत या लवकर!’’

डोळे तेजस्वी, वाणी ओजस्वी, शरीर म्हणजे सडसडीत काठी, आवाज लाघवी, विचार स्पष्ट, मन चंचल, चित्त अस्थिर, प्रकृती अस्वस्थ, स्वभाव अशांत- डोळे कशाच्या तरी अदृष्टाच्या शोधात, प्रेम स्वरांवर, निष्ठा गुरुमाऊली माई कुर्डीकरांवर, बोलणे-चालणे भराभर, अक्षर सुंदर, घर आवरलेले, नीटनेटके, रांगोळी अप्रतिम, सगळ्यांचे सगळे अंदाज चूक ठरावेत असा अवसानघातकी स्वभाव! हात कर्णाचा असला तरी भाजीवालीशी आठ आण्यांसाठी घासाघीस करण्यात पटाईत. ताईंचे प्रेमही आक्रमक व अंगावर चालून येणारे! ताईंशी सख्य करणे म्हणजे जळता निखारा तळहातावर घेऊन, भर दुपारी रणरणत्या उन्हात अनवाणी हिंडण्याचा जळता अनुभव! कोण कशाला जाईल आपणहून मगरीच्या जबडय़ात हात घालायला?

चि. रघुनंदन ताईंकडे गाणे शिकायला जाऊन सात-आठ महिने झाले होते. सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ९ अशी वेळ ठरलेली होती. ताईंच्या उत्तुंग प्रभावामुळे व दैवी प्रतिभेपुढे बिचारा रघू सतत धास्तावलेला होता! कारण त्यांचा गळा हाच एक प्रतिभेचा महान चमत्कार होता! क्षणापूर्वी त्यांच्या गळ्यातून निघालेली तान किंवा नवीन स्वरावली तशीच्या तशी त्यांच्याही गळ्यातून कधी निघत नसे! प्रत्येक क्षणी वेगळेच स्वरविश्व साकार होत असे! रघूचे तर सोडाच; परंतु ताईंनाही याचे फार आश्चर्य वाटे. अशा चपल, तरल, चंचल, विजेप्रमाणे गतिमान, अनाकलनीय स्वरचमत्कृती कोणाच्या गळ्यातून सहीसही निघणार? इथे फिरत्या गळ्याची मातब्बरी काय कामाची? या गतिमान गळ्याशी कोणता विद्यार्थी रियाझाच्या आधाराने टक्कर देणार? म्हणून ताईंकडे अनेक विद्यार्थी आले, राहिले, शिकले; परंतु एकही जण शिष्यत्वाला पोहोचला नाही! कारण किशोरीताई कधी गुरुपदी बसल्याच नाहीत. ताई फक्त गात राहतात, रियाझ करतात, तालीम करतात, दिवसरात्र स्वरांच्या आकाशात विहार करतात! त्या वर्तमानात कधी नसतातच! त्या गळ्याने कधी गातच नसतात! त्यांच्या हालचालीतून, त्यांच्या बोलण्या-चालण्यातून, त्यांच्या रागावण्यातून, त्यांच्या तऱ्हेवाईकपणातून किंवा त्यांच्या सर्वागातूनच स्वरांचे मोती सर्व घरभर उधळत असतात! कधी मोहक स्वरांची आवर्तने, कधी एखाद्या मारवा रागाची बंदिश असते, तर कधी विजेच्या चपळाईशी स्पर्धा करणारी तान असते, तर कधी ठाय लयीतील दोन आवर्तनांची अस्ताई असते, तर कधी रागातील लयीशी खेळणारी लडिवाळ दुगण असते! ताई कधी शिकवतात? ताईंनी कधी कोणाला शांत चित्ताने शिकवले? ताईंनी कधी भविष्यातील संगीताची काळजी वाहिली? ताई कधी आपली जयपूर घराण्याची परंपरा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध झाल्या होत्या? ताई कधी आपल्या गायकीचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या शिष्याच्या शोधात होत्या? कारण ताईंचा जन्म तुमच्या-माझ्यासारख्या हाडामासाचा असला तरी, विश्वशक्तीचे अर्धाग असलेली ती दिव्य प्रतिभाच ताईंच्या कुडीच्या आश्रयाने या भूलोकी अवतीर्ण झाली होती! त्यामुळे शरीर स्त्रीचे व चलनवलन विजेचे अशी वस्तुस्थिती होती! किशोरीताई या वर्तमानाला न कळण्याचे हे महत्त्वाचे कारण होते! आणि नेमके हेच कारण फारसे कोणाला न कळल्यामुळे ताई कोणाच्या हाती फारशा कधी लागल्याच नाहीत! ना माई कुर्डीकरांच्या, ना यजमान रवींद्र आमोणकरांच्या, ना कधी मुलांच्या, नातवंडांच्या, ना कधी श्रोत्यांच्या, ना कधी जवळच्या रसिकांच्या!

श्रीमती मोगुबाई कुर्डीकरांच्या गर्भातच किशोरीताईंना घराणेदार शुद्ध खानदानी संगीत मिळाले; परंतु माझा अंदाज असा आहे की, वयाच्या सोळा-सतरा वर्षांपर्यंत ताईंना आपला जन्म कशासाठी असावा, याची नेमकी जाण नसावी. कारण त्या त्यावेळी मॅट्रिक पास होऊन कॉलेजमध्ये रमल्या होत्या. त्यांना डॉक्टर व्हायचे होते; शिवाय त्या टेबल टेनिसमध्ये चॅम्पियन होत्या. या दोनही आवडी त्यांच्या गर्भस्थ संगीताला छेद देणाऱ्या होत्या. शुद्ध गाणे घरातच असल्यामुळे कानावरती सच्चे सूर येत होते. माईंच्या इतर विद्यार्थिनींसह ताईंनाही तालीम मिळतच होती, तरीही त्यांना संगीताचे पंख फुटले नव्हते! त्यांच्या गळ्यात अजून प्रतिभा मुक्कामाला आली नव्हती! गंधर्वनगरीतील स्वरदेवतांच्या सूक्ष्म नजरेला अजून मोगुबाईंची कन्या पडलेली नव्हती! संगीताच्या घराणेदार चौकटीला छेद देऊन, वैश्विक स्वरगंगेच्या प्रचंड प्रवाहाला कोणाच्या कंठात आश्रय मिळू शकेल, या चिंतेत सारी गंधर्वनगरी पडलेली असतानाच, अकस्मात किशोरी कुर्डीकर या स्वरकन्येला ‘त्या’ प्रतिभेचा दिव्यदाहक स्पर्श झाला मात्र; आणि तत्क्षणीच त्यांच्या मनातील डॉक्टरचे चित्र धूसर होऊन, हातातील टेनिसची रॅक गळून पडली आणि तेथे तानपुरा विलसू लागला! ही घटना ज्या शुभ दिवशी घडली त्याच दिवशी मोगुबाई कृतकृत्य झाल्या, गंधर्वनगरीत दीपोत्सव साजरा झाला आणि भारतीय संगीताचे क्षेत्र अधिक व्यापक व क्रांतिकारक झाले; आणि किशोरीच्या रूपाने या भूमंडळावर एक प्रत्यक्ष प्रतिभाच स्त्रीरूपाने विहरू लागली! या इहलोकातच गंधर्व संगीताचा प्रत्यक्ष सहवास रसिकांना मिळू शकला!
ज्याला प्रतिभा आपणहून वश होते त्याला ती सहसा लौकिक सुख लागू देत नाही, असे माझे निरीक्षण आहे. कारण प्रतिभेला व्यक्त होण्यासाठी, प्रकट होण्यासाठी एका शरीराच्या माध्यमाची गरज असते. ज्या कुडीत प्रतिभा प्रवेश करते त्या कुडीची सृजनक्षमता कल्पनातीत असते, म्हणूनच त्या कुडीला प्रतिभेचा दाहही सोसावा लागतो. तो दाह मरेपर्यंत कुडीची पाठ सोडीत नाही. म्हणून प्रतिभावंतांचे लौकिक व्यवहार, त्यांचे संसार, त्यांचे प्रापंचिक व सामाजिक अनुबंध नेहमी विस्कटलेले व अनाकलनीय वाटतात! प्रतिभावंत कुटुंबात- समाजात, प्रपंचात जगत असला किंवा नांदत असला तरी तो मनाने या लौकिकात कधीच रमत नसतो. त्याचे पाय कधीच भूमीवर स्थिर नसतात. तो माणसात असूनही कधीही माणसात नसतो! तो लौकिकात दिसला तरी त्याचे वास्तव्य असते अलौकिकातच! जिथे सामान्य प्रापंचिकाची दृष्टी पोचून थांबते, तेथूनच त्याचा डोळस प्रांत सुरू होतो! त्याला जे दिसते ते अपूर्व असते, तसेच ते असह्य़ही असते! आसन्नप्रसवा गर्भवतीला प्रसूतीच्या वेळी ज्या मरणांतिक वेदना होतात, त्या वेदना आणि प्रतिभावंताच्या सृजनप्रक्रियेतील वेदना वेगळ्या नसतात. दोहोतही सृजनासाठी परमानंद व संचित शक्तीचा प्रचंड क्षयही होतोच! हा शक्तीचा ऱ्हास ज्याचा अधिक वेगवान, अधिक चापल्याने होतो, त्या प्रतिभावंतांचा स्वभाव, व्यवहार, वर्तमानातील वर्तन हे व्यवहाराच्या चौकटी फोडून टाकणारे असले तर त्यात नवल कसले? तेच नैसर्गिक असते!
कोणत्याही प्रतिभावंतासमोर जे रसिक असतात ते चोवीस तास रसिक नसतात. क्षणभर भारावून नंतर पुन्हा जडत्वाकडे जाणे हा सामान्यांचा वस्तुधर्म असतो. या सामान्याला प्रत्यक्ष भगवान कृष्णाचे दर्शन झाले तर त्याचे क्षणभर डोळे विस्फारतील, पण त्यामुळे त्याची सामान्य दृष्टी सहजासहजी बदलणार नाही आणि बदलतही नाही. किशोरीताईंच्या अश्रुतपूर्व गाण्यावर लट्टू होणाऱ्या सामान्य रसिकाला ताईंनी गाणे सुरू करायला विलंब केला, हे सत्य मोकळेपणाने पचविता येत नाही. कारण त्याची नजर सामान्य असते, त्यांनी पैसे खर्च करून गाण्यासाठी तिकीट काढलेले असते, तो मुद्दाम वाकडीवाट करून, वेळ खर्च करून गाणे ऐकायला आलेला असतो. त्याचा वेळ वाया गेला, हे त्याच्या गणितात बसत नाही. तो त्याच्या गणितात ‘अगणित’ प्रतिभामूर्ती ताईंना कोंबायचा प्रयत्न करतो आणि इथेच तो फसतो! कारण ताई त्याला कळलेल्या नसतात! त्याला ताईंची प्रतिभा माहीत नसते! त्याला चौकट सोडून जगणे व श्वासोच्छ्वास घेणेही माहीत नसते. त्याच्या फूटपट्टीने तो अनाकलनीय प्रतिभेचे माप घ्यायला जातो आणि ताईंच्या नावावर ‘विक्षिप्त’ असा शिक्का मारून आपण मात्र पुन्हा सुरक्षित चौकटीत विसावतो!

निराकाराला साकार सावयव करते ती प्रतिभा! या प्रतिभेचे व विजेचे गोत्र एक असले तरी कार्य मात्र अगदी भिन्न असते. दोघांच्याही प्रकटीकरणात संघर्ष असला तरी ढगातील वीज दाहक व संहारक असते, तर देहाश्रित प्रतिभा मोहक व सृजनशील असते! ती आकाशातील वीज भयप्रद व पडेल तिथे जाळून राखाडी करते; तर ही प्रतिभा सुखावह व आसमंत उजळून टाकते! ती वीज प्रलयंकर शंकराची हिंस्र प्रतिनिधी असते; तर ही प्रतिभा भगवान ब्रह्मदेवाची सृजनदेवता असते! ती वीज कोणतेही अस्तित्व बेचिराख करते; तर ही प्रतिभा नश्वराला सौंदर्यान्वित करून अस्तित्वाची प्रतिष्ठा देते! विश्वातील दैन्याला, तमाला, काळोखाला, कुरूपतेला शह देऊन प्रतिसृष्टी निर्माण करते ती प्रतिभा! या त्रलोक्यातील अमंगलाला निष्प्रभ करून ठायी ठायी भद्रमंगलाची प्रतिष्ठा करते ती प्रतिभा! अशी प्रतिभा ज्यांच्या देहमाध्यमातून मनुष्यसृष्टीला सौंदर्याने अलंकृत करते त्या दिव्य प्रतिभावंतांचे योगदान कोणत्या शब्दांनी लिपिबद्ध करावे? किशोरीताई या अलौकिक प्रतिभावंत असल्यामुळेच खरे रसिक ताईंचे ‘प्रातिभ गाणेच’ स्मरणात ठेवतात व त्यांचे दैवी अस्तित्व वंदनीय मानून स्वत:सह साऱ्या वर्तमानालाच भाग्यवंत मानतात!
अशा किशोरीताईंनी दैवी स्फुरणाने साऱ्या कलाविश्वाला वेगळा आयाम देणारा ‘स्वरार्थरमणी’ हा सैद्धांतिक ग्रंथ लिहून आमचे संशोधन ग्रंथालय अधिक समृद्ध केले, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दाजी पणशीकर