Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९

चित्रपट अभिनेत्यांचा अपवाद वगळता बहुतेक सामान्य माणसे उतारवयात वाढदिवस साजरा करणे सोडून देतात. तारुण्यातील उत्साह, वेड यांचा भर ओसरून त्यांची वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल सुरू झालेली असते. काही जण मात्र ‘अभी तो मै जवान हूँ’ या ब्रीदवाक्याला अगदी चिकटून असतात. शारीरिक वय वाढत असले तरी मनाची उभारी मात्र कायम असते. इंग्लंड येथील मॉयस यांनी त्यांचा ९८ वा वाढदिवस चक्क पॅराशूट जंप घेऊन साजरा केला.

बेसिन रिझव्‍‌र्हवरील कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव सुरू झाला..झहीरच्या तिखट आणि झणझणीत माऱ्याने यजमानांच्या तोंडचे पाणी पळविले..क्रिकेटचाहत्यांना मात्र या गोलंदाजीची चव भलतीच आवडली..भारताच्या ३७९ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर मॅकिन्टोश (३२), मार्टिन गुप्तिल (१७) आणि वन डाऊन डॅनियल फ्लिन (२) यांचे आव्हान झहीरच्या झंझावातापुढे पालापाचोळ्यासारखे उडून गेले. झहीरने घेतलेल्या जेसी रायडरच्या हुकमी बळीमुळे तर किवींची तारांबळ उडाली. कणा मोडलेल्या किवींना मग उभे राहणेही कठीण गेले. न्यूझीलंडच्या मातीत तीनवेळा पाच बळींचा पराक्रम झहीरच्या नावावर नोंदला गेला. ६५ धावांत पाच बळींची कामगिरी करून झहीरने किवींना केवळ १९७ धावावर रोखले. ऑफ स्पिनर एरापल्ली प्रसन्ना यांनी न्यूझीलंडमध्ये यापूर्वी तीनवेळा पाच बळी मिळविण्याची कामगिरी केली होती. झहीरने त्यांच्या पंक्तीत स्थान मिळविले. त्याशिवाय, बेसिन रिझव्‍‌र्हवर न्यूझीलंड दौऱ्यात डावात पाच बळी घेण्याची कामगिरी दोन वेळा करणाराही झहीर पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.

धोनीचा विक्रम
झहीर खानचा तोफखाना एकीकडे धडाडत असताना यष्टीरक्षक धोनीने यष्टीपाठी झेल पकडण्याचा सपाटा लावला. तब्बल सहा झेल टिपून त्याने यष्टीपाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा भारतीय खेळाडू म्हणून आपल्या नावाची नोंद केली. भारतीय यष्टीरक्षकाने सहा झेल पकडण्याचा हा विक्रम होता. यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांच्या विक्रमाशीही धोनीने बरोबरी केली.

न्यूयॉर्कमधील हल्ल्याचा तालिबानी दावा अमेरिकेने फेटाळला
बिंगहॅम्पटन, न्यूयॉर्क/पी.टी.आय.

न्यूयॉर्कमध्ये इमिग्रेशन सेंटरवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख दहशतवादी नेता बैतुल्ला मेहसूद याने शनिवारी स्वीकारली. मात्र हा दावा अमेरिकेने फेटाळला आहे. बिगहॅम्पटन येथील इमिग्रेशन सेंटरवर एका बंदूकधारी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात किमान १३ जण ठार झाले होते. या हल्लेखोराने एकूण ४१ जणांना ओलिसही ठेवले होते. मेहसूद याने अज्ञात ठिकाणाहून रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, मी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत आहे, ते माझेच लोक होते. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी मीच त्यांना हल्ला करण्याचे फर्मान सोडले होते.

पाकिस्तानात पुन्हा दहशतवादाचा भडका
आत्मघाती हल्ल्यात आठ सुरक्षा रक्षक ठार
इस्लामाबाद, ४ एप्रिल/पीटीआय

इस्लामाबाद येथील निमलष्करी दलाच्या छावणीला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने घडविण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये आठ सुरक्षा रक्षक ठार तर पाच जण जखमी झाले. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी या रक्षकांवर सोपविण्यात आली होती. ही छावणी गजबजलेल्या जिना सुपरमार्केटजवळ आहे. या आत्मघाती बॉम्बस्फोट प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले पण त्यासंदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला. इस्लामाबाद येथील मारगाला रोडवरील ‘२४ फ्रंटियर कॉर्प्स’ च्या छावणीला लक्ष्य करण्यासाठी आज रात्री साडे सात वाजता एका दहशतवाद्याने हा आत्मघाती बॉम्बस्फोट घडविला. त्यावेळी या छावणीमध्ये २४ सुरक्षा रक्षक उपस्थित होते. दरम्यान या बॉम्बस्फोटानंतर जिना सुपरमार्केटजवळ दहशतवादी व सुरक्षा सैनिकांमध्ये चकमक झाल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी इन्कार केला आहे.
वझिरीस्तानमध्ये ३० ठार
पाकिस्तानमधील वझिरीस्तान भागामध्ये आज अमेरिकी सैन्याने केलेले क्षेपणास्त्र हल्ले तसेच सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करण्यासाठी घडविण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये ३० जण ठार झाले. अमेरिकी ड्रोन विमानांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १३ जण ठार झाले. या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच वझिरीस्तानमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्याच्या लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्याने आत्मघाती बॉम्बस्फोट घडविला. त्यामध्ये १७ जण ठार झाले.

अमेरिकेतील बोगस वर्क व्हिसाप्रकरणी दोन भारतीयांसह पाच आरोपी दोषी
ह्यूस्टन, ४ एप्रिल/पीटीआय
८७ भारतीयांना बोगस वर्क व्हिसा दिल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरविले. या आरोपींमध्ये दोन भारतीयांचाही समावेश आहे. या आरोपींनी प्रत्येक वर्क व्हिसामागे २० हजार डॉलर घेतले होते. महेंद्रकुमार ऊर्फ मॅक पटेल (५५), राकेश पटेल (३६), अल्बटरे पेना (३८), बर्नाडो पेना (३८), मार्टे ओथोन व्हिलर (४८) अशी या पाच आरोपींची नावे आहेत. प्रत्येक व्हिसामागे हजारो डॉलर उकळून ८७ भारतीयांचे अमेरिकेत बेकायदा स्थलांतर घडवून आणल्याचा आरोप या पाच जणांवर आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या पाचही आरोपींना येत्या २६ जून रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

वरुण गांधींना रासुकाखाली स्थानबद्ध करण्याचा निर्णय दुर्दैवी - अर्जुन सिंह
नवी दिल्ली, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी
भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्याचा प्रकार दुर्दैवी आहे, असे मत आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अर्जुन सिंह यांनी व्यक्त केले. पिलीभीतमध्ये आपल्या प्रचारादरम्यान वरुण गांधी जे काही बोलले तेही अनुचित होते, असेही ते म्हणाले.

रायगड व मावळमध्ये शिवसेनेला शेकापची साथ
अलिबाग, ४ एप्रिल / प्रतिनिधी
राज्यातील महत्त्वपूर्ण लढतीतील रायगड व मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला आज शेकापने अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याने येथील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. मावळ मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील चार, तर रायगडमधील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या दोन्हीही मतदारसंघात शेकापचे प्राबल्य असून, त्याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर यांना होण्याची शक्यता आहे. तर रायगडमध्ये शिवसेनेतर्फे अनंत गिते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेकापच्या पाठिंब्यामुळे त्यांचे पारडे अधिकच जड होण्याची शक्यता आहे. शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आज ही घोषणा केल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘मदत हवी असेल तर भारतातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणे थांबवा’
वॉशिंग्टन ४ एप्रिल/पीटीआय

पाकिस्तानची लष्करेतर मदत तिप्पट म्हणजे वर्षांला १.५ अब्ज डॉलर करण्याबाबतच्या विधेयकातच अमेरिकेने एक मेख मारून ठेवली असून भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे पाकिस्तानने थांबवावे असे म्हटले आहे. याचाच अर्थ गेली अनेक दशके भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवाया पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या पाठिंब्याने घडवून आणीत आहेत हे अमेरिकेने एक प्रकारे मान्य केले आहे. पाकिस्तान एंडय़ुरिंग असीस्टन्स अँड कोऑपरेशन अ‍ॅक्ट हे विधेयक प्रतिनिधिगृहात हॉवर्ड बेरमन यांनी मांडले होते. बेरमन हे सभागृहाच्या परराष्ट्र संबंध समितीचे प्रमुख आहेत. सिनेटमध्ये अशाच स्वरूपाचे एक विधेयक मांडण्यात येणार असून त्यात येत्या पाच वर्षांत पाकिस्तानला दिली जाणारी मदत तिप्पट म्हणजे १.५ अब्ज डॉलर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच अमेरिकेचे नवे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान धोरणाचा तो एक भाग आहे.आता मांडण्यात येत असलेल्या विधेयकात अमेरिकेने असे म्हटले आहे की, पाकिस्तानातील कुठल्याही दहशतवादी गटाला भारतात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने प्रोत्साहन देऊ नये. कारण भारतामधील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानातील गटच जबाबदार असून ते आयएसआयच्या मदतीने ही कृत्ये करीत आहेत असे अमेरिकेला वाटते.

होशियार!
जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचा लाडका महासोहळा सुरू झाला आहे.
होशियार!!
चिखलातील कमळ पुन्हा उगवेल, की दहा वाजून दहा मिनिटांनी घडय़ाळाचा गजर होईल? धनुष्यातून बाण सुटेल, की नवनिर्माणाच्या नवरंगी पताका फडकतील? उजव्या हाताला डाव्यांनी झिडकारले आणि तिसराच खांदा आपला मानला त्यामुळे सत्तेची साखर हाताने वाटायची, की हत्तीवरून?
..असल्या लोकविलक्षण त्रराशिकांचा हा भन्नाट लोकसोहळा.
आम आदमीसाठी केवळ इलेक्शन!
याने की आयपीएलच..
पण म्हणायचं इंडियन पोलिटिकल लीग..
तारखा ठरल्या. मुहूर्त ठरले. मैदाने धगधगू लागली. खिलाडी मंडळींच्या बोलीही ठरल्या. चिअर लिडरचा पदन्यास सुरू झाला. सट्टय़ापासून स्पॉन्सपर्यंत सारे कसे फिक्स झाले. आयपीएलला उधाण आले.
अटीतटीच्या तुंबळ लढतींचा प्रत्येक थरारक क्षण, संघर्षांचा माहोल तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा विडा उचललाय म्हणून तर या पानांचा प्रपंच!
अगदी ड्रेसिंगरूममधल्या चटकदार हकिकतींसह थेट निर्णायक स्कोअरबोर्डपर्यंत.
सारे डावपेच, कल आणि कौल, तसेच खमंग गॉसिपसह सबकुछ..
हे फक्त खास तुमच्यासाठी कारण मतदारांनो नॉन प्लेयिंग कॅप्टन तुम्हीच तर आहात!
राज्यातील प्रत्येक मतदारसंघ,
देशातील प्रत्येक राज्य..

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी