Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

काँग्रेस आघाडीचेही शक्तिप्रदर्शन
औरंगाबाद, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आणि रिपाइं पक्षाचे उमेदवार माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. क्रांती चौकातून भव्य अशी मिरवणूक काढून काँग्रेस आघाडीनेही जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. उत्तमसिंग पवार यांच्याबरोबर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेंद्र दर्डा, आमदार एम. एम. शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्जाची भाऊगर्दी
औरंगाबाद, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

येत्या २३ एप्रिलला मराठवाडय़ात होणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या मतदारसंघात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी या पाचही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाऊगर्दी होती. या पाचही ठिकाणी बहुरंगी लढती होणार, हे निश्चित. या पाच जागांसाठी १७२ उमेदवारांनी २५६ उमेदवारी अर्ज शनिवारअखेर दाखल केले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारांची संख्या जास्त असण्याची चिन्हे दिसत आहेत. आज शेवटच्या दिवशी २६ उमेदवारांनी ३१ नामनिर्देशनपत्रे दाखल केले. या मतदारसंघात आता एकूण ३८ उमेदवारांनी ५१ नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याने बहुरंगी लढतीचीच शक्यता दिसत आहे.

आपलीच आवड
खूप खूप दिवसांनी चित्रपट-गृहात गेलो. मित्र होता. दोघांचे कुटुंबीय होते. चित्रपट पाहिला. नवा कोरा. अगदी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ नाही; पण दुसऱ्याच दिवशी. ‘दिल्ली 6’. किती तरी दिवसांनी सहकुटुंब, सहमित्र चित्रपटगृहात गेलो होतो. मध्यंतरापर्यंत बरा वाटला. मध्यंतराला उठलो, तेव्हा मित्राला म्हणालो, ‘बरा चाललाय बुवा.’ चित्रपट संपला. सगळे बाहेर आलो. कोणाच्याच तोंडावरची निराशा लपत नव्हती. वेळ, पैसे वाया गेल्याचे जो तो बोलून दाखवित होता. टिंगल उडवित होते. मित्र म्हणाला, ‘तुला आवडलाच असेल!’ ‘ठीक होता, बरा होता.’ असं उत्तर दिलं. तिथं फसलो.

वधूपक्ष ना आमचा
घ्भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती असली, तरी कार्यकर्त्यांतील सख्य सर्वश्रुत आहे. नांदेड मतदारसंघातील भा. ज. प.च्या उमेदवाराची प्रचारसभा सोनखेड येथे होती. ती वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर रद्द करण्यात आली. शिवसेनेच्याा कार्यकर्त्यांना डावलल्यांची चर्चा, भा. ज. प. कार्यकर्त्यांना सभा रद्द झाल्याचे दु:ख वरून मित्रपक्षाचे टोमणे, पदाधिकाऱ्यांवर मनधरणीची वेळ. ‘काय करावं, आमच्या दारात लग्नाचा मांडव, सहन करावं लागतंय,’ असं म्हणत त्यांनी दु:खाला वाट करून दिली.

खासदार रेंगे यांचा वरपूडकरांना पाठिंबा!
परभणी, ४ एप्रिल/वार्ताहर

काँग्रेस किंवा अन्य पक्ष प्रवेशाचा निर्णय प्रलंबित ठेवीत खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी मित्र मंडळ व समर्थकांचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांना हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर केला. या वेळी व्यासपीठावर श्री. वरपूडकर उपस्थित होते. खासदार तुकाराम रेंगे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यापासून त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाची जिल्हाभर चर्चा रंगत राहिली. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी रेंगे यांचा काँग्रेस प्रवेश होईल असे समर्थक सांगत होते. रेंगे यांनीही काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश घेणार असे अनेकदा जाहीर केला.

मुंडेंनी ३० वर्षे जनतेला झुलवले-अजित पवार
बीड, ४ एप्रिल/वार्ताहर

गोपीनाथ मुंडे यांना जनतेने सलग ३० वर्षे संधी दिली मात्र त्यांनी जनतेला झुलवत ठेवून स्वत:च्या घरचा चेहरा बदलला, असा थेट आरोप करून जिल्ह्य़ाच्या विकासासाठी जलसंपदामंत्री म्हणून आपणच सर्वात जास्त निधी दिल्याचा दावा अजित पवार यांनी केला. तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लिम समाजाबरोबरच धनगर समाजालाही आरक्षण देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

परळी रस्त्यावर मशिदीजवळ स्फोट; जीवितहानी नाही
बीड, ४ एप्रिल/वार्ताहर

शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या परळी रस्त्यावरील घाटसावळी येथे शनिवारच्या पहाटे तीनच्या सुमारास मशिदीच्या पाठीमागील भागात स्फोट झाल्याने भिंतीला भगदाड पडले. सकाळी पडलेला भाग तात्काळ बांधून घेण्यात आला. स्फोट कशाने झाला याचा शोध प्रशासन घेत असून, घटनेनंतर दोन अज्ञात लोकांना पळून जाताना पाहिल्याचे काही नागरिकांनी सांगितल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. सकाळी शांतता कमिटीची बैठक घेऊन पोलिसांनी दोन्ही समाजातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. बीड तालुक्यातील परळी रस्त्यावर असलेल्या घाटसावळी येथे बस स्थानकाच्या बाजूलाच मशीद आहे. शनिवारी पहाटे अंदाजे तीनच्या सुमारास मागच्या बाजूला स्फोट झाल्याचा आवाज आला. या आवाजाने गावातील सर्वच लोक घटनास्थळाकडे धावले. त्या वेळी मशिदीच्या मागच्या भिंतीला मोठे भगदाड पडल्याचे दिसून आले. घटनेनंतर लागलीच पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गांभीर्य ओळखून फौजफाटय़ासह घटनास्थळी धाव घेतली, तर पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.

वादळामुळे चाकूरमध्ये ८० हजारांचे नुकसान
चाकूर, ४ एप्रिल/वार्ताहर

चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रावरील शनिवारी दुपारी सुटलेल्या वादळामुळे चार तंबू उखडून गेल्याने अंदाजे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चाकूरपासून जवळच असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास जोराचा वारा सुटल्यामुळे तेथील जवानांसाठी उभारण्यात आलेल्या तंबूवरील ताडपत्री उडाल्याने त्यातील रंगीत टीव्ही, टेबल, पलंग तसेच इतर फर्निचर असे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच केंद्रातील जवानांसाठी प्राथमिक उपचारासाठी उभे करण्यात आलेल्या रुग्णालयातील तंबूचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळाची बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी सुदीपकुमार यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. आठवडय़ातील ही तिसरी वादळाची घटना असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासकीय निवडणूक निरीक्षकांचे लातूरमध्ये आगमन
लातूर, ४ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या लातूर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय निवडणूक निरीक्षक लातूरमध्ये दाखल झाले आहेत. केरळ येथील प्रशासकीय सेवेतील के. शेषिधर, आंध्र प्रदेशातील महंमद अली रफत, राजस्थानमधून संजय पंत हे निवडणूक निरीक्षक म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघात काम पाहणार आहेत. के. शेषिधर यांच्याकडे अहमदपूर आणि लोहा हा विधानसभा मतदारसंघ आह व महंमद अली रफत यांच्याकडे लातूर शहर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहे. संजय पंत यांच्याकडे उदगीर व निलंगा मतदारसंघाची जबाबदारी आहे. मतदारांच्या काही अडचणी असतील किंवा आचारसंहितेसंदर्भात निरीक्षकांना तक्रार करावयाची असेल तर अनुक्रमे ९४२३७७२६३, ९२३७७७२६२, ९४२३७७७२६१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या निरीक्षकांचे राहण्याचे ठिकाण शासकीय विश्रामगृहात आहे.

‘लोहा तालुक्यातील ११ गावांत टँकर सुरू करा’
लोहा, ४ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील ११ गावांतील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे; परंतु टंचाईग्रस्त या गावातील टँकरचे प्रस्ताव दोनदा फेटाळले गेले.विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील-कऱ्हाळे यांनी मागणी केली आहे. लोहा तालुक्यात पाण्याचा प्रश्न तीव्र बनत आहे. त्यातच ग्रामसभेचाठराव नाही म्हणून ११ गावांतील टँकरचे प्रस्ताव दोनदा फेटाळण्यात आले. वास्तविक पाहता निवडणूक आचारसंहितेमुळे ग्रामसभा घेता येत नाही.

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजारावर बंदी
नांदेड, ४ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात १६ एप्रिलला मतदान होणार असल्याने त्या दिवशी वेगवेगळ्या भागात भरणाऱ्या आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्य़ाच्या भोकर, बेटमोगरा (मुखेड), नायगाव, उमरी, धानोरा (ता. किनवट), वाळकी, वाळकी फाटा, तळणी (हदगाव), सिडको (नांदेड), कुरुळा (कंधार) व मालेगाव (अर्धापूर) या ठिकाणी दर गुरुवारी आठवडी बाजार भरवला जातो. गुरुवारीच मतदान होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज हे सर्व बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी भरणारा बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भरविण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील ११ आणि लातूर मतदारसंघात येणारया मंगलसांगवी (ता. कंधार) येथील २३ एप्रिलला होणारा बाजार २४ ला ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मालमोटारीच्या धडकेत चौकीदाराचा मृत्यू
औरंगाबाद, ४ एप्रिल/प्रतिनिधी

सिडको एन-३ येथे एका बंगल्याचे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी मुरुम टाकण्यासाठी आलेल्या ट्रकने वॉचमनला चिरडले. त्यात ३५ वर्षीय शेख रऊफ या चौकीदाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. सिडको एन-३ येथे शहराचे माजी महापौर व भाजपा नेते डॉ. भागवत कराड यांच्या प्लॉक क्र. ३९१ या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. बांधकाम साहित्यावर लक्ष ठेवण्यासाठी शेख रऊफ शेख बन्नू या चौकादीराची नियुक्ती करण्यात आली होती. आपले काम इमाने इतबारे करणारा शेख रऊफ हा शुक्रवारी उशिरा झोपला होता. आज सकाळी बांधकामाच्या ठिकाणी ६ च्या सुमारास मुरुमाचा ट्रक आला. ट्रकचालकाने मुरुम टाकण्याचे ठिकाण निश्चित करताना ट्रक मागे-पुढे केला, त्याचवेळी ट्रकमागे उभा असलेला शेख रऊफ हा अचानक चिरडला गेला. घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळाला असून त्याचा शोध मुकुंदवाडी पोलीस घेत आहेत.

महिलांच्या ३३ टक्के आरक्षणासाठी मोहीम
लातूर, ४ एप्रिल/वार्ताहर

महिलांना लोकसभा, राज्यसभा, विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी देशभरात विविध संघटनांच्या वतीने लोकसभा महिला मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. शैला लोहिया यांनी दिली.
विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी अरुंधती पाटील उपस्थित होत्या. लोकसभेच्या निवडणुकांसंबंधी जनजागृती केली जाणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक महिला प्रतिनिधी निवडली जाणार आहे. त्यानंतर ही मोहीम देशभरात राबविली जाणार आह. या महिला ३३ टक्के आरक्षणासाठी पाठपुरावा करणार आहेत.
महिलांचा राजकारणातील सहभाग या विषयावर ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्य़ाची कृतिसमितीही स्थापन करण्यात आली. यात लातूर जिल्हाप्रमुखपदी आशा भिसे व सुिनती जगताप यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे अनुभव व त्यांच्या अडचणी यावरही चर्चा झाली. बैठकीस कुशावर्ता बेळ्ळे, छाया काकडे, शहनवाज शेख, झिया शेख आदी उपस्थित होत्या.

रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुखांची आज नांदेडमध्ये बैठक
नांदेड, ४ एप्रिल/वार्ताहर

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाला डावलून जनाधार नसलेल्या दुसऱ्या गटाला आपल्यासोबत घेतल्याने कार्यकर्त्यांत निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पाश्र्वभूमीवर रिपाइंच्या प्रमुखांची बैठक उद्या (दि. ५) घेण्यात येत आहे.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक ढोले यांनी वरील माहिती दिली. राज्य व राष्ट्रीय पातळीवर रिपाइं गवई गट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आहे. पण नांदेड मतदारसंघात काँग्रेसने केवळ आठवले गटाला सोबत घेतल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी रविवारी दुपारी १२ वा. जवाहरनगर येथे बैठक होईल. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड हे या बैठकीला उपस्थित राहणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन मनोहर ढवळे, टी. जी. हनमंते, विनोद कांबळे यांनी केले आहे.

महाविद्यालयीन शिक्षक आता मतदान अधिकारी
गेवराई, ४ एप्रिल/वार्ताहर

आतापर्यंत जिल्हा परिषद, विधानसभा लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना निवडणुकीची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवडणूक काळात मतदान अधिकारी म्हणून नियुक्त केले जात असे. परंतु या वेळी प्रथमच राजकीय वर्चस्व असलेल्या शिक्षण संस्थेतील २८ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना निवडणूक मतदान अधिकारी म्हणून नियुक्तया दिल्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत मतदान व मतमोजणीचे काम करण्यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावले जाते. निमशासकीय संस्था तसेच शिक्षण संस्था या राजकीय व्यक्तींच्या प्रभावाखाली कार्यरत असल्याने त्यांना निवडणुकीत अलिप्त ठेवले जाई; एवढेच नाही तर या संस्थांतील कर्मचारी आपल्या संस्थाप्रमुख उमेदवाराचा प्रचार राजरोसपणे करत असत. असे असतानाही बीड जिल्हाधिकारी पंकजकुमार यांनी महाविद्यालयातील २८ कर्मचाऱ्यांना मतदान अधिकारी म्हणून काम करण्याचे आदेश काढले आहेत.

उस्मानाबादमध्ये ३८ अर्ज
उस्मानाबाद, ४ एप्रिल/वार्ताहर

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज तब्बल २६ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले. गुरुवार (२ एप्रिल) पर्यंत फक्त १२ जणांनी अर्ज दाखल केलेले होते. आज मात्र उमेदवारांची नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी रीघ लागली होती. आज प्रमुख पक्षाच्या उमेदवारासाठी काही पर्यायी नामनिर्देशनपत्रही दाखल करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राणा जगजीतसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून पर्यायी व्यवस्था म्हणून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनीही नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बरीच गर्दी होती. क्रांती सेनेचे उमेदवार प्रकाश तावडे, बसपाचे उमेदवार दिवाकर नाकाडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना कुठलीही चूक राहू नये आणि चूक राहिलीच तर पर्यायी व्यवस्था म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील व रवि गायकवाड यांनीही पुन्हा नामनिर्देशनपत्रे दाखल केले. आजच्या दिवसभरात १८ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. हिंदुस्तान जनता पार्टी, क्रांतिकारी जयहिंद सेना अशा अनोळखी पक्षाचेही उमेदवार होते. भारिप बहुजन महासंघाच्या भगवान दादाराव जगताप यांनी अर्ज दाखल केला. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या २६ उमेदवारांची यादी करण्यास प्रशासनाला बराच वेळ लागला.

ऑलिम्पियाडच्या पूर्वतयारी शिबिरासाठी सुजित घोलपची निवड
कळंब, ४ एप्रिल/वार्ताहर

कळंब येथील सुजीत घोलप याची तेहरान (इराण) येथे होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडच्या पूर्वतयारीसाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या निवड झाली आहे. सुजीत हा कळंब येथील विद्याभवन हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याचे आई-वडील मोहेकर महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. सध्या तो हैदराबाद येथील रामय्या संस्थेमध्ये आय. आय. टी.च्या पूर्वपरीक्षेची तयारी करीत आहे. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांच्यासह सर्वानी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मनसेचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’!
गंगाखेड, ४ एप्रिल/वार्ताहर

परभणी लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवार न दिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शनिवारी गंगाखेड येथील पक्ष कार्यकर्ता बैठकीत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा नारा देण्यात आल्याचे समजते. शनिवारी मनसेचा गंगाखेड व पालम तालुका कार्यकर्त्यांचा मेळावा शहरातील सारडा कॉलनी येथे पार पडला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे नगरसेवक संजय तिरवड तर मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे उपस्थित होते. बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष भगवान शेळके, रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश कसबे, गंगाखेड तालुकाध्यक्ष सदानंद फड, शहराध्यक्ष श्याम कुलकर्णी, पालम तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाबर, शहराध्यक्ष अशोक भोळे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत गंगाखेड-पालम तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. तसेच लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेऊन पक्षवरिष्ठांना माहिती कळवीत वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतरच कार्यकर्त्यांना निरोप दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर शिवसेना उमेदवाराचा पराभव करणे हे आमचे उद्दिष्ट असून आताच कोणाच्या बाजूने शक्ती लावण्यात येईल याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया देत जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी तूर्त ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा सूचक इशारा दिला आहे. मेळाव्यास सुमारे ६०० पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

बसपा नेते हत्तीअंबिरेंचे वरपूडकर टार्गेट!
गंगाखेड, ४ एप्रिल/वार्ताहर

ज्यांचं आयुष्य सांस्कृतिक कार्यक्रम ऐकण्यातच गेले त्यांनाच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्रीपद देऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी वरपूडकरांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याची उपरोधिक टीका बहुजन समाज पार्टीचे नेते भीमराव हत्तीअंबिरे यांनी केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी गंगाखेड येथे बसपा उमेदवार राजश्री जामगे यांच्या मध्यवर्ती संपर्क प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. हत्तीअंबिरे बोलत होते. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव खंदारे, मराठा भाईचारा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू चव्हाण, ब्राह्मण भाईचारा जिल्हाध्यक्ष कृष्णा मोहरीर आदींची उपस्थिती होती.