Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

न्यूयॉर्कमधील हल्ल्याचा तालिबानी दावा अमेरिकेने फेटाळला
बिंगहॅम्पटन, न्यूयॉर्क/पी.टी.आय.

न्यूयॉर्कमध्ये इमिग्रेशन सेंटरवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख

 

दहशतवादी नेता बैतुल्ला मेहसूद याने शनिवारी स्वीकारली. मात्र हा दावा अमेरिकेने फेटाळला आहे. बिगहॅम्पटन येथील इमिग्रेशन सेंटरवर एका बंदूकधारी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात किमान १३ जण ठार झाले होते. या हल्लेखोराने एकूण ४१ जणांना ओलिसही ठेवले होते. मेहसूद याने अज्ञात ठिकाणाहून रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, मी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत आहे, ते माझेच लोक होते. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी मीच त्यांना हल्ला करण्याचे फर्मान सोडले होते. शुक्रवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये घडलेल्या या घटनेत एका सशस्त्र इसमाने दोन हँडगनच्या मदतीने इमिग्रेशन सव्‍‌र्हिसेस कार्यालयावर हल्ला करून १३ जणांना ठार केले होते. नंतर त्याने स्वत:वर बंदूक रोखून गोळी झाडून घेतली होती, असे बिगहॅम्पटन येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ज्यांचा जिल्हा बिगहॅम्पटनमध्ये येतो त्याचे प्रतिनिधी मॉरिस हिंचे यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, हा बंदूकधारी हल्लेखोर हा व्हिएतनामी स्थलांतरित असावा. पोलीसप्रमुख जोसेफ झिकुस्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या इमारतीचे मागचे दार या बंदूकधाऱ्याने कारच्या मदतीने बंद केले होते व नंतर तो समोरच्या प्रवेशद्वाराकडे आला व त्याने स्वागतकक्षातील दोघांवर गोळ्या झाडल्या. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आणखी बारा जणांना ठार केले व नंतर त्याने आत्महत्या केली. इतर चारजण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. तालिबानी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी अमेरिकेतील तपास यंत्रणेला मात्र हल्लेखोराच्या हेतूबद्दल अद्याप कोणताही छडा लावता आलेला नाही. हा हल्लेखोर तालिबानी असल्याबद्दलही कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणेला अद्याप मिळालेला नाही, असे समजते.