Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अमेरिकेतील बोगस वर्क व्हिसाप्रकरणी दोन भारतीयांसह पाच आरोपी दोषी
ह्यूस्टन, ४ एप्रिल/पीटीआय

८७ भारतीयांना बोगस वर्क व्हिसा दिल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने पाच जणांना दोषी

 

ठरविले. या आरोपींमध्ये दोन भारतीयांचाही समावेश आहे. या आरोपींनी प्रत्येक वर्क व्हिसामागे २० हजार डॉलर घेतले होते.
महेंद्रकुमार ऊर्फ मॅक पटेल (५५), राकेश पटेल (३६), अल्बटरे पेना (३८), बर्नाडो पेना (३८), मार्टे ओथोन व्हिलर (४८) अशी या पाच आरोपींची नावे आहेत. प्रत्येक व्हिसामागे हजारो डॉलर उकळून ८७ भारतीयांचे अमेरिकेत बेकायदा स्थलांतर घडवून आणल्याचा आरोप या पाच जणांवर आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या पाचही आरोपींना येत्या २६ जून रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
यासंदर्भात अमेरिकेच्या अ‍ॅटर्नी कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेत नोकरीसाठी करण्यासाठी तात्पुरता एच-२ बी व्हिसा मिळविणे आवश्यक असते. गुजरातचे मुळ रहिवासी असलेल्या ८७ भारतीयांना बोगस तात्पुरते एच-२ बी व्हिसा ब्राऊन्सव्हिला येथील अल्बटरे व बर्नाडो पेना या जुळ्या भावांनी मिळवून दिले. अमेरिकेतील विशिष्ट बांधकाम कंपनीमध्ये हे भारतीय नोकरी करणार आहेत असे हे तात्पुरता एच-२ बी व्हिसा मिळवून देताना दाखविण्यात आले, पण वस्तुस्थिती वेगळी होती. पण या कंपनीच्या नावावर वर्क व्हिसा मिळविलेल्या भारतीयांपैकी एकानेही तेथे एकही दिवस काम केले नाही. ते अमेरिकेत वेगळ्याच ठिकाणी नोकरीधंदा करीत होते. तसेच या व्हिसाची १० महिन्यांची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेतून मायदेशी परत न जायचे नाही असे या भारतीयांनी ठरविले होते. व्हिसा मिळालेल्या भारतीयांचे हे इरादे माहित असूनही त्यांना या पाच आरोपींनी बोगस वर्क व्हिसा तयार करून दिला व अमेरिकेत बेकायदा स्थलांतर घडवून आणले. हे व्हिसा तयार करून देण्याच्या कामासाठी अल्बटरे व बर्नाडो पेना हे भारतामध्ये जाऊन आले होते.
अमेरिकेमध्ये नोकरीधंदा करण्यासाठी येऊ इच्छिणारे काही भारतीय नागरिक त्या देशाचा वर्क व्हिसा मिळविण्यासाठी प्रत्येक व्हिसामागे २० ते ६० हजार डॉलर देण्यासही तयार होते. अशा लोकांकडून पैसे उकळून त्यांना बोगस वर्क व्हिसा मिळवून दिल्याप्रकरणी महेंद्रकुमार ऊर्फ मॅक पटेल (५५), राकेश पटेल (३६) या दोन भारतीयांनाही दोषी ठरविण्यात आले.
भारतीय अमेरिकेतील न्यू इबेरिया येथील एका बांधकाम कंपनीमध्ये काम हे ८७ भारतीय काम करणार असल्याचे त्यांना वर्क व्हिसा मिळवून देताना दाखविण्यात आले होते. या बोगस कंपनीचा मालक चार्ल्स किथ व्हिस्कार्डी हा या प्रकरणात गुंतला असल्याचा आरोप आहे.