Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वरुण गांधींना रासुकाखाली स्थानबद्ध करण्याचा निर्णय दुर्दैवी - अर्जुन सिंह
नवी दिल्ली, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी
भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्याचा प्रकार दुर्दैवी

 

आहे, असे मत आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अर्जुन सिंह यांनी व्यक्त केले. पिलीभीतमध्ये आपल्या प्रचारादरम्यान वरुण गांधी जे काही बोलले तेही अनुचित होते, असेही ते म्हणाले.
वरुण गांधींना रासुकाखाली अटक करून एटा येथील तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेशी विसंगत मत मांडताना मायावती सरकारने केलेल्या रासुकाच्या वापराचा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. वरुण गांधींच्या प्रक्षोभक विधानांमुळे उत्तर प्रदेशात राजकीय धुव्रीकरण होऊन भाजपला लाभ होण्याची शक्यता नसल्याचे अर्जुन सिंह यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात आपण काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी जाणार असून लोकसभा निवडणुकांनंतर पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू, असे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील सिधी लोकसभा मतदारसंघातून अर्जुन सिंह यांची कन्या वीणा सिंह यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे ते नाराजी लपवू शकले नाहीत. मुलांना तिकीट नाकारल्यामुळे मी नाखूष नाही, असा दावा खरा ठरणार नाही, असे अर्जुन सिंह म्हणाले. सिधी मतदारसंघातून वीणा सिंह यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. अर्जुन सिंह यांचे विश्वासू इंद्रजीत पटेल यांना काँग्रेसने सिधीमध्ये उमेदवारी दिली आहे, तर सतनामध्येही अर्जुन सिंह यांचे पुत्र अजय सिंह यांना तिकीट नाकारून त्यांचेच खास विश्वासू सुधीरसिंह तोमर यांना िरगणात उतरविले आहे. काँग्रेसच्या या दोन्ही उमेदवारांचा आपण प्रचार करणार असल्याचे अर्जुन सिंह यांनी सांगितले.