Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

प्रादेशिक

.. अन् विर्कसरांचा क्लास झालाच नाही!
मुंबई, ४ एप्रिल / प्रतिनिधी

राज्याचे पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडील शस्त्रास्त्रांची काय स्थिती आहे तसेच त्यांना शस्त्र चालविण्याचे ज्ञान अवगत आहे का, याची परीक्षा घेण्यासाठी आज गोरेगावच्या फायरिंग रेंजवर वर्गाचे आयोजन केले होते. मात्र आज काही कारणास्तव हा वर्ग रद्द करण्यात आला. विर्क यांचा संपर्क होऊ न शकल्याने यामागचे कारण समजू शकले नाही.

डॉ. के. राममूर्ती यांचे निधन
मुंबई, ४ एप्रिल / प्रतिनिधी

डॉक्टरांचेही डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले विख्यात डॉक्टर कृष्णन राममूर्ती यांचे आज पहाटे लीलावती रुग्णालयात अल्पशा आजारानंतर निधन झाले. ते ७५ वर्षांंचे होते. शिवाजी पार्क येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळेस जनसमुदाय लोटला होता. त्यांच्यामागे पत्नी सुशीला, मुलगी रंजनी, जावई कनक, भाऊ शंकर आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. अजित फडके, डॉ. श्रीखंडे, डॉ. मुकुंद जोशी, डॉ. सतीश गुप्ते आदी मुंबईतील अनेक नामवंत डॉक्टर्स त्यांच्या अंत्ययात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

पालिकेने बेघर केलेल्या विधवेला १० वर्षांनी पर्यायी घर
मुंबई, ४ एप्रिल/प्रतिनिधी

रस्ता सुशोभीकरणाच्या कामासाठी स्वत: महापालिकेनेच बेघर केलेल्या शांताबाई ऊर्फ नलू बाबू राठोड या चेंबूरच्या विधेवेला गेली १० वर्षे न्यायालयांत चिकाटीने लढा दिल्यानंतर अखेर पर्यायी घर मिळणार आहे. प्रकल्पग्रस्त या नात्याने कायमस्वरूपी पर्यायी घर मिळण्यास तिसऱ्यांदा अपात्र ठरविणाऱ्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध शांताबाई राठोड यांनी केलेली रिट याचिका २७ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने फेटाळी होती.

आ. संजय चव्हाण यांना विधानसभेत मतदान करण्यास मनाई
मुंबई, ४ एप्रिल/प्रतिनिधी
जात पडताळणी समितीने जातीचा दाखला रद्द केलेले नाशिक जिल्ह्यातील बागलाणचे अपक्ष आमदार संजय कांतीलाल चव्हाण विधानसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहू शकतील. मात्र त्यांना सभागृहात मतदान करता येणार नाही, असा हंगामी मनाई आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. आपण ‘ठाकूर’ या आदिवासी जमातीचे असल्याचा दाखला देऊन संजय चव्हाण यांनी बागलाण राखीव मतदारसंघातून गेली विधानसभा निवडणूक लढविली होती व भाजपचे उमाजी मंगळू बोरसे यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. नाशिक येथील जात पडताळणी समितीने गेल्या २२ ऑक्टोबर रोजी चव्हाण यांचा जातीचा दाखला अवैध ठरवून रद्द केला होता.

महापौरांच्या मतदारसंघात रहिवाशांची पाण्यासाठी वणवण
मुंबई, ४ एप्रिल / प्रतिनिधी

दहिसर पश्चिम परिसरातील बहुतांश इमारतींना बऱ्यापैकी पाणीपुरवठा होत असतानाही गुरुकूल या इमारतीला गेले काही दिवस पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. टँकरद्वारे होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ावर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. महापौर डॉ. शुभा राऊळ यांचा हा मतदारसंघ असून काही नागरिकांनी त्यांच्याकडेही तक्रारी केल्या. परंतु त्याचा फायदा झाला नाही. वास्तविक महापालिकेच्या हद्दीत पाणीपुरवठा होत नसल्यास महापालिका पाण्याचे दहा हजार लिटरसाठी ११२ रुपये आणि टँकरपोटी सातशे रुपये म्हणजे आठशे रुपयांना या रहिवाशांना टँकर मिळणे अपेक्षित आहे. परंतु त्याऐवजी गेले काही दिवस गुरुकुल सोसायटीला दीड हजार रुपये मोजावे लागत आहे. आलिशान घरात राहणाऱ्या या रहिवाशांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.