Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

आठवलेंविरुद्धचा अपप्रचार तथ्यहीन - पवार
अकोले, कोपरगाव, ४ एप्रिल/वार्ताहर

सामाजिक ऐक्याचा संदेश देशात पोहोचविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पुन्हा लोकसभेवर पाठवा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. अ‍ॅट्रॉसिटीसंदर्भात आठवलेंविरुद्धच्या अपप्रचारात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांच्या प्रचारार्थ आज अकोले व कोपरगाव येथे झालेल्या सभांमध्ये श्री. पवार बोलत होते. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार मधुकर पिचड, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार यशवंतराव गडाख, विनायक देशमुख यावेळी उपस्थित होते.

स्पर्श
काही वर्षांपूर्वीची घटना.
मध्यरात्री स्टुडिओत
काम करत असताना
अचानक लाईट गेले
सगळीकडे अंधार..
हरिप्रसाद चौरसियांचे
टेपरेकॉर्डरमधून
ऐकू येणारे बासरीचे स्वर
टेप बंद झाला तरी
बराच वेळ त्या वातावरणात
घुमत राहिलेले..
आता तोही आवाज नाही नीरव शांतता
दूरवरून येणाऱ्या
कुठल्याशा मंदिरातील
भजनांचा पुसटसा आवाज
अन् थोडय़ा थोडय़ा वेळाने
रातकिडय़ांचे ओरडणे

अधीक्षक अभियंता अज्ञातवासात; ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांत अस्वस्थता
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

शिवसेनेचे आमदार अनिल राठोड व कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करून शाई फासले, शिवाय त्यांनीच विरोधात फिर्याद नोंदविल्याने भेदरलेले महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप पडळकर गेल्या २ दिवसांपासून अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी धावून येणाऱ्या वीज कर्मचारी संघटनाही या प्रकरणी चुप्पी साधून आहेत. महावितरणच्या वर्तुळात आजही तणावपूर्ण शांतता होती.

किरकोळ कारणावरून घोगरगावला तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला
श्रीगोंदे, ४ एप्रिल/वार्ताहर

यात्रेतील पालखी पुढे घेण्याच्या कारणावरून जि. प.चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या पुतण्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात आणखी एकजण जखमी झाला. घोगरगाव येथे रात्री हा प्रकार घडला. जि. प. सदस्य सचिन जगताप यांच्या बनपिंप्री येथील समर्थकांनी हल्ला केल्याचा भोस यांचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेचे श्रीगोंदे कारखाना शाखेतील रोखपाल विलास रामदास शेटे यांनी फिर्याद दिली. मारहाणीत किरण पंढरीनाथ भोस हा युवक गंभीर जखमी आहे. घोगरगाव येथे दर वर्षी रामनवमीला यात्रा भरते.

प्रखर विरोधानंतरही नागवडेसमर्थक कर्डिलेंबरोबर
श्रीगोंदे, ४ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील कार्यकर्त्यांचा प्रखर विरोध डावलून आज माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी पक्षहितासाठी आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा सक्रिय प्रचार करण्याचा आदेश दिला. मात्र, ४० वर्षांतील राजकीय प्रवासात जिल्ह्य़ातील काँग्रेसला मानणाऱ्या नेत्यांनी कायमच आपल्या पायात पाय अडकविण्याचा प्रयत्न केल्याची खंतही व्यक्त केली. तालुक्यातील ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी नागवडे बोलत होते.

----------------------------------------------------------------------------

ढोल-ताशे, झिंदाबादचे नारे..
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज शहराला जत्रेचे स्वरूप आले होते. भाजपचे दिलीप गांधी, काँग्रेस आघाडीचे खासदार रामदास आठवले, बहुजन समाज पक्षातर्फे रिंगणात उतरलेले खासदार तुकाराम गडाख, काँग्रेस बंडखोर प्रेमानंद रुपवते आदींनी आज शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. या सर्व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे जथ्थे, वाहने, पक्षध्वज यामुळे शहराला सकाळपासून निवडणुकीचा ‘फिल’ आला होता. हार-तुरे, ढोल-ताशे, घोषणाबाजी यामुळे निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू झाल्याची जाणीव होत होती.

अ‍ॅट्रॉसिटीची भोकाडी!
लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय व राज्यस्तरावर कोणताही मुद्दा नाही. जेव्हा कोणताच मुद्दा किंवा प्रश्न नसतो, तेव्हा जातीची समीकरणे नेहमीच प्रभावी ठरतात. स्वतला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष म्हणविणारे पक्षही उमेदवारी देताना जातींचा प्रभाव हाच प्रमुख निकष मानतात. प्रचारात उघड जातपात नसली, तरी जातीचा छुपा अजेंडा असतो. गेल्या दोन दशकांत उपेक्षित घटक, इतर मागासवर्गीयांमध्ये जागृती आली. त्याचा मतपेढीकरिता वापर करणे सुरू झाले. त्यातून जातीच्या मेळाव्यांचे पीक आले.

मौनी खासदार नसावा!
राजकारणामध्ये ‘खासदारकी’ला एक प्रकारचे वलय आहे. खासदार केंद्रात मतदारसंघाचे नेतृत्व करणार असल्याने तो बहुश्रुत, बहुआयामी असावा. जागतिक घडामोडींबद्दल तो सतर्क असावा. बरेचसे खासदार संसदेत तोंड उघडत नाहीत किंवा चर्चेच्या वेळी अनुपस्थित राहतात, ही वस्तुस्थिती आहे. संसदेत तुम्ही चर्चा करू शकणार नसाल, प्रश्न मांडू शकणार नसाल तर तुम्हाला निवडून दिल्याचा फायदा काय?आरोग्य, बेरोजगारी, पर्यावरण, रस्ते, महिलांची सुरक्षा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. महिला आरक्षण विधेयकाकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. किती खासदार संसदेतील ग्रंथालयाचा उपयोग करतात, हा संशोधनाचा विषय ठरावा.

सभेपेक्षा पारायण बरे!
जाहीर सभांमधून प्रचार करायचा, तर परवानगी काढा, खर्चाचा हिशेब सादर करा, आचारसंहितेच्या अटींचे पालन करा अशा अनेक डोकेदुखीच्या बाबी असतात. अशा सभा घेण्यापेक्षा हरिनाम सप्ताह किंवा पारायण सोहळा घेण्याची कल्पना कशी वाटते? सध्या विविध पक्षाच्या चलाख नेत्यांनी असे पारायण सोहळे ठिकठिकाणी सुरू केले आहेत. या पारायणांना हजारोंची गर्दी होते. विशेषत स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय असते. ‘हभप’ सुश्राव्य प्रवचन आणि कीर्तन करताना अधून-मधून राजकीय संदर्भ देत कोपरखळ्या मारतात. त्याला मोठी दाद मिळते.

वरून कीर्तन, आतून तमाशा..
ठिकाणावर तर पोहोचलो,
पुढे काय?
म्हणजे मी असं विचारतो, ‘येथे आलो आता वर थांबणार की आत जातांय?’
कसंही, आपल्याला काय आरामच करायचायं. वर काय न् आत काय? कुठही घटकाभर टेकलो म्हणजे झालं..
तुमच्या लक्षात कसं येत नाही? वर आणि आत फरक आहे. वर वेगळं आहे, आत निराळंच आहे.
कोडय़ात कशाला बोलता? काय ते क्लिअर तर करा ना राव!

नगरमध्ये २३, तर शिर्डीमध्ये ३५ उमेदवारांचे अर्ज
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी नगर मतदारसंघात २३ उमेदवारांनी ४२ अर्ज, तर शिर्डी मतदारसंघात ३५ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भाजपचे दिलीप गांधी, बसपतर्फे तुकाराम गडाख, काँग्रेस-रिपब्लिकन आघाडीतर्फे खासदार रामदास आठवले, काँग्रेस बंडखोर प्रेमानंद रूपवते आदींचा समावेश आहे.

काँग्रेसचे शिर्डीतील नामोनिशाण मिटू देणार नाही - रुपवते
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे लोढणे शिर्डी मतदारसंघाच्या गळ्यात कशासाठी? काँग्रेस राष्ट्रवादीपुढे झुकतो आहे. नेत्यांना स्वार्थासाठी चालेल, पण कार्यकर्त्यांना नाही. काँग्रेसचे मतदारसंघातील नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न आपण यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगत काँग्रेसचे बंडखोर प्रेमानंद रुपवते यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पत्रकारांशी बोलताना रुपवते म्हणाले की, अर्ज भरण्याबाबत आपण मुख्यमंत्री, खासदार बाळासाहेब विखे व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना कल्पना दिली आहे. कोणालाही अंधारात ठेवलेले नाही. मुळात आपली बंडखोरी नाही. शिर्डीमधून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी निवडणूक लढवत नाहीत. मतदारसंघाबाहेरच्यास उमेदवारी दिली गेली आहे. मतदारसंघात स्थानिक उमेदवार हवा, अशी भूमिका घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. मतदारसंघातील प्रश्न नियमितपणे सोडवता यावेत, असा विचार त्यामागे होता. पण रामदास आठवले यांनी आंबेडकरांच्या भूमिकेचे उल्लंघन केले, अशी टीका रुपवते यांनी केली.

आचारसंहिता बैठकीकडे राजकीय पक्षांनी पाठ फिरवली
राहाता, ४ एप्रिल/वार्ताहर

तहसील कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक आचारसंहितेबाबत बोलविलेल्या बैठकीस काँग्रेसचे दोन पदाधिकारी वगळता इतर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षाध्यक्षांची बैठक आज दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पी. आर. गाढे यांनी आयोजित केली होती. या बैठकीस काँग्रेसचे दोन पदाधिकारी वगळता इतर सर्वच पक्षांचे पदाधिकारी बैठकीकडे फिरकले नाहीत. नायब तहसीलदार दत्ता शेजूळ, मुख्याधिकारी बी. सी. गावित, पोलीस उपनिरीक्षक वसंत सानप या शासकीय अधिकाऱ्यांसह काँग्रेसचे राजेंद्र वाबळे, रघुनाथ बोठे यांच्यात बैठक झाली. गाढे म्हणाले की, प्रचारादरम्यान पक्षाचे झेंडे, फलक लावताना संबंधित विभागाची परवानगी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी झेंडे, बॅनर लावता येणार नाही. जातीयवादी भाषणे करू नयेत.

कर्जत तालुका भाजपची आज बैठक
कर्जत, ४ एप्रिल/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी उद्या (रविवारी) कर्जत तालुका भाजपची बैठक आयोजिण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे तालुकाध्यक्ष शांतीलाल कोपनर असतील. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, आमदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत.
----------------------------------------------------------------------------

शिर्डीत बसस्थानकातून प्रवाशाचे २ लाख लुटले
राहाता, ४ एप्रिल/वार्ताहर

शिर्डी बसस्थानकातून बसमध्ये बसलेल्या व्यापाऱ्याची दोन लाख रुपये असलेली बॅग चोरटय़ाने लांबविली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. राजेंद्र नारायणदास केसवानी (वय ४०, सिंधी कॅम्प अकोला) शिर्डी-पुणे बसमध्ये (एमएच १२ -६०६७) पुण्यास जाण्यासाठी बसले. त्यांची बॅग चोरटय़ाने पळविली. बॅगमध्ये रोख २ लाख रुपये व २ धनादेश होते. अकोला येथे बेसन मिल असून, या भागातील व्यापाऱ्यांना ते बेसन पुरवितात. त्याच्या वसुलीचे पैसे घेऊन केसवानी निघाले होते. बस सुरू होण्यापूर्वी बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. रामनवमी उत्सव काळात शिर्डीत चोरटय़ांचा सुळसुळाट झाला असून, अनेक भक्तांचे पर्स, मोबाईल, बॅग चोरीस गेल्या. चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयशच येत आहे. बसस्थानकात पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

नेवाशात दोन वेगवेगळ्या घटनेत दोनजण ठार
नेवासे, ४ एप्रिल/वार्ताहर

नेवासे शहरातील मध्यमेश्वरनगर येथे भाऊसाहेब भिमराज पवार (वय २५) याने राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. याबाबत नेवासे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दुसऱ्या घटनेत नेवासे येथील मार्केट यार्डमागे राहणारे ज्ञानेश्वर दत्तात्रेय गवळी (वय ३२) हे मोटरसायकल (एमएच १४-३०४६) नेवासे बुद्रुक येथील पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच ठार झाले. या प्रकरणी भाऊसाहेब गवळी यांनी फिर्याद दिली. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शेतक ऱ्यांना राष्ट्रीय सेवक मानून मासिक वेतन द्यावे - बलदोटा
कर्जत, ४ एप्रिल/वार्ताहर

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर प्राथमिक उपाय म्हणून राष्ट्रीय सेवक म्हणून घोषित करून त्यांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी मासिक वेतन सुरू करावे, अशी मागणी भारत कृषक समाजाचे राज्य उपाध्यक्ष पोपटलाल बलदोटा यांनी केली. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण देशातील शेतकरी पिढय़ान्पिढय़ा कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. केवळ कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार नाही, तर यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण न करता त्यांना राष्ट्रीय सेवक म्हणून मासिक पगार द्यावा, तसेच उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा.
या प्राथमिक उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे बंद होतील, असे निवेदनात श्री. बलदोटा यांनी म्हटले आहे.

‘महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवावेत’
नेवासे, ४ एप्रिल/वार्ताहर

नगर जिल्ह्य़ामध्ये महावीर जयंतीच्या दिवशी सर्व कत्तलखाने व माध्यमिक शाळांची परीक्षा बंद ठेवावी, अशी मागणी नेवासे येथील जैन समाजाच्या तरुणांनी तहसीलदार व शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दि. ७ मार्च रोजी महावीर जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी असूनही जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळा व तालुका विद्याप्रसारक मंडळाच्या शाळांमध्ये परीक्षेचे पेपर आहेत. याविषयी सर्वच पालकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नेवाशातील जैन संघटनेच्या युवकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. अहिसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीच्या दिवशी सर्व कत्तलखाने व मच्छी बाजार बंद ठेवावे, असे निवेदनात म्हटले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा या युवकांनी दिला आहे. निवेदनावर वैभव नहार, अभय गुगळे, अभय बलाई, मनोज शिंगी, सतीश संचेती, अभिजीत गांधी, रवींद्र ओस्तवाल, राजेंद्र मुथा, विशाल शिंगी यांच्या सह्य़ा आहेत.

राहुरीचे ग्रामदैवत हनुमंताची गुरुवारी यात्रा
राहुरी, ४ एप्रिल/वार्ताहर

राहुरी शहराचे ग्रामदैवत श्रीहनुमानाची यात्रा गुरुवारी (दि. ९) उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती हनुमान देव यात्रा समितीच्या वतीने देण्यात आली.या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि. ९) पहाटे हनुमान देवाला अभिषेक, कावडीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी हनुमान चालिसा वाचन व प्रसादाचा कार्यक्रम, ४ वाजता कुस्त्यांचा हगामा जिम्नॅशिअम हॉलमध्ये (पठारे मळा) आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी ७ वाजता भागिरथीबाई विद्यालयाच्या प्रांगणात ऑर्केस्ट्रा होईल. रात्री शोभेचे दारूकाम होईल. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब उंडे, वाय. एस. तनपुरे, दशरथ पोपळघट, कैलास तनपुरे आदींनी केले.

नेवाशात ‘सिंगल फेज’चा बोजवारा
नेवासे, ४ एप्रिल/वार्ताहर

महावितरणच्या सिंगल फेज योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. काहीजणांनी अनधिकृत वीजजोड घेतले आहेत, तर बहुतांशी लोक विजेचा बेसुमार वापर करीत आहेत. त्यामुळे या योजनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लोकवस्तीला चोवीस तास वीज मिळावी, यासाठी महावितरणने सिंगल फेज योजना अंमलात आणली. परंतु बहुतांशी ठिकाणी शेगडय़ा, हिटर लावून अतिरिक्त वीज खेचली जाते. ग्रामपंचायतींकडूनही या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. वीज कर्मचीरीही फिरकत नाहीत. परिणामी विजेचा अपव्यय होत आहे.काही शेतकऱ्यांनी तर वीजपंपही या योजनेवर सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांची चांदी होत आहे, तर काहींना वीज मिळत नाही. या योजनेचा बोजवारा उडाल्याने भविष्यात ती बंद केल्यास आश्चर्य वाटायला नको.

नवी स्कॉर्पिओ मोटार घरासमोरून पळविली
मिरजगाव, ४ एप्रिल/वार्ताहर

घरफोडय़ा, रस्तालुटीनंतर चोरटय़ांनी आता वाहनचोरीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे परिसरात घबराट कायम असून, पोलिसांच्या निष्क्रियतेविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर येथील अनिल विश्वनाथ लाढाणे यांच्या राहत्या घरासमोरून त्यांच्या मालकीची नवी स्कॉर्पिओ मोटार चोरटय़ांनी पळविली. दूरक्षेत्रापासून १०० फुटांच्या अंतरावर लाढाणे यांचे घर आहे. चोरटे नगरच्या दिशेने गाडी घेऊन गेले. आज पहाटेस अडीचच्या सुमारास ही गाडी चोरल्यावर सव्वातीनच्या सुमारास टोलनाक्यावर गाडीची नोंद व टोल भरून पुढे गेल्याची माहिती मिळाली. ठरावीक दिवसांच्या अंतराने होणाऱ्या चोऱ्या, घरफोडी, रस्तालूट आणि वाहनचोरी या प्रकारांमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण असून, तपासकार्यात पोलीस यंत्रणा साफ निष्क्रिय ठरल्याने संताप व्यक्त होत आहे.

तीन दिवसांत ‘नॅनो’च्या ८०० नोंदणी अर्जाची विक्री
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

येथील हुंडेकरी मोटर्समध्ये गेल्या तीन दिवसांत ‘नॅनो’च्या ८०० नोंदणी अर्जाची विक्री झाली. नोंदणी अर्जाचे शुल्क ३०० रुपये असून, दि. ८ पर्यंत ग्राहकांना नॅनोची नोंदणी करता येईल, अशी माहिती हुंडेकरी मोटर्सचे करीमभाई हुंडेकरी यांनी दिली. दि. २ एप्रिलला हुंडेकरी मोटर्समध्ये दाखल झालेली नॅनो पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. दि. ९ एप्रिलपासून नॅनोसाठी ९५ हजार, नॅनो सीएक्स मॉडेलसाठी १ लाख २० हजार, तर नॅनो एलएक्ससाठी १ लाख ४० हजार रुपये नोंदणी केलेल्या ग्राहकास भरावे लागतील. दि. २५ एप्रिलपर्यंत ही रक्कम स्वीकारली जाईल, अशी माहिती इरफान शेख यांनी दिली. त्यानंतर ग्राहकांचा नोंदणी अर्ज व आवश्यक कागदपत्रे टाटा मोटर्समध्ये पाठविण्यात येतील. तेथे सोडत काढल्यानंतर संबंधित ग्राहकास कळविण्यात येईल.

तालुक्याच्या अस्तित्वासाठी एकत्र या झ्र् कर्डिले
नगर, ४ एप्रिल/वार्ताहर

ही निवडणूक तालुक्याच्या अस्तित्वाची आहे. मागील पंधरा वर्षांत तालुक्याचा विकास केला. परंतु विधानसभा मतदारसंघ विभागल्याने तालुक्यावर गंडांतर आले आहे. त्यामुळे मतभेद विसरून सर्वानी मतदान करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी केले.
तालुक्यातील राळेगण, गुंडेगाव, देऊळगाव, वाळकी, बाबुर्डी, अरणगाव, खंडाळे, अकोळनेर, सारोळे कासार आदी ठिकाणी झालेल्या प्रचारसभेत कर्डिले बोलत होते. सर्वश्री. बाजीराव गवारे, दादाभाऊ चितळकर, भाऊसाहेब बोठे, भाऊसाहेब काळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, झरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वच ठिकाणच्या प्रचारफेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. आमदारकीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गाव पक्क्य़ रस्त्याने जोडले आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक बचतगट नगर तालुक्यात आहेत. अंगणवाडी, शाळाखोल्या आदी कामे केली आहेत. अशाच पद्धतीचे काम करण्याची घरच्या उमेदवाराला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी मिरवणूक, हास्यकवी संमेलन
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. ७) मिरवणूक, हास्यकवी संमेलन, चौक सजावट व रांगोळी स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पावणेआठ वाजता कापड बाजारातील जैन मंदिरापासून मिरवणूक निघेल. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक आनंदधाम येथे पोहचेल. तेथे जैन मुनी, साध्वींचे प्रवचन व गौतम प्रसादाच्या वाटपाने मिरवणुकीचा समारोप होईल. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना लकी ड्रॉद्वारे बक्षिसे देण्यात येतील. जैन सोशल फेडरेशनतर्फे चौक सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता फेडरेशनतर्फे आनंदधाम प्रांगणात लाफ्टर चॅलेंज शो कलाकारांचे हास्य-कवी संमेलन होणार आहे. या कार्यक्रमात स्पर्धांतील विजेत्यांना नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.भाविकांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन ओसवाल पंचायत, जैन मंदिर, जैन संघटना आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरूंच्या श्रद्धेतच खरे सामथ्र्य - ढोकमहाराज
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

जोपर्यंत गुरुवर श्रद्धा नाही, तोपर्यंत गुरुचे फळ पदरात पडणार नाही. गुरुच्या श्रद्धेत जे सामथ्र्य आहे ते जीवनात कशातच नाही, असे प्रतिपादन रामरावमहाराज ढोक यांनी केले. केडगाव येथील स्पंदन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिलेल्या रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, आयुष्य सुपासारखे जगावे. चांगले ते घ्यावे, नको ते सोडावे. रामायणात राम हे सत्य, तर लक्ष्मण समर्पण आहे. जीवनात सत्य व समर्पण नसेल, तर जीवनरूपी यज्ञ पूर्ण होणार नाही. ढोक महाराजांच्या रामकथेला केडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दानशूर बोरा दांपत्याचा आदर्श युवा पिढीने घ्यावा - फिरोदिया
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

दिवंगत मोतीलालजी व रूपीबाई बोरा या दाम्पत्याच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण अमरधाममधील विद्युतदाहिनीजवळ उद्योजक प्रकाश फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. दातृत्वाची पताका फडकावत समाजसेवेसाठी झटलेल्या बोरा दाम्पत्याचा आदर्श दानशूर व्यक्ती व युवा पिढीने घ्यावा. बोरा यांनी जागा उपलब्ध करून दिल्यामुळेच पालिकेला विद्युतदाहिनी उभारता आली, असे फिरोदिया यांनी सांगितले. दान देण्याची वृत्ती दर्शविणाऱ्या दोन हातांवर बोरा यांच्या पुतळ्यांची आकर्षक रचना करणारे मूर्तिकार प्रमोद कांबळे, दाहिनीची देखभाल करणारे सोमनाथ वारे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. छाया फिरोदिया, अभय आगरकर, सुवालाल गुंदेचा, गोकुळ गांधी, डॉ. गिरीश कुलकर्णी, नगरसेवक संजय चोपडा आदी या वेळी उपस्थित होते. राजेंद्र टाक यांनी सूत्रसंचालन केले.

नुरील भोसले यांच्या चित्रास राज्य कला प्रदर्शनात बक्षीस
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालयात आयोजित ४९व्या राज्य कला प्रदर्शनात नुरील प्रभात भोसले यांच्या चित्रास कवी ग्रेस यांच्या हस्ते १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते व कला संचालक रवींद्र बाळापुरे या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनात सादर झालेल्या ५४९पैकी १४ कलाकृतींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. श्री. नुरील भोसले राहुरीचे असून, तारकपूर (नगर) येथील प्रगत कला महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. एन. डी. सी. पी. टी. आर. डी. टू. संस्थेचे सचिव एस. आर. गायकवाड, काळे, सोनटक्के, रणधीर, मते, वंजारे आदींनी भोसले यांचे अभिनंदन केले.

मुसळवाडीमध्ये मारामारीत २ जखमी; सहाजणांवर गुन्हा
देवळाली प्रवरा, ४ एप्रिल/वार्ताहर

शेजाऱ्याने बोअर घेतल्याने आपल्या बोअरचे पाणी कमी होते, या कारणावरून राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे झालेल्या मारामारीत दोघेजण जखमी झाले. याबाबत राहुरी पोलिसांनी महिलेसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुसळवाडी येथील दीपक धुमाळ (वय ४८) यांनी आज सकाळी सव्वाआठ वाजता राधाकृष्ण धुमाळ यांच्या शेताजवळ बोअर घेतला असता. जालिंदर, नवनाथ, भाऊसाहेब, संदीप, प्रदीप, अंजली धुमाळ यांनी दीपक व त्यांचा मुलगा रवींद्र (वय २२) यास काठय़ा व कुऱ्हाडीने मारहाण केली. दीपक धुमाळ यांच्या फिर्यादीवरून सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजी कर्डिलेंचा आज नगर तालुक्यात दौरा
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले उद्या (रविवारी) नगर तालुक्याचा दौरा करणार आहेत. आठवड, चिचोंडी पाटील, भातोडी, मदडगाव, टाकळी काझी, कोल्हेवाडी, सारोळे कासार, निंबोडी व अन्य गावांमध्ये माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्यासह ते सभा घेणार आहेत.