Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आठवलेंविरुद्धचा अपप्रचार तथ्यहीन - पवार
अकोले, कोपरगाव, ४ एप्रिल/वार्ताहर

सामाजिक ऐक्याचा संदेश देशात पोहोचविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पुन्हा लोकसभेवर पाठवा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. अ‍ॅट्रॉसिटीसंदर्भात

 

आठवलेंविरुद्धच्या अपप्रचारात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांच्या प्रचारार्थ आज अकोले व कोपरगाव येथे झालेल्या सभांमध्ये श्री. पवार बोलत होते. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार मधुकर पिचड, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार यशवंतराव गडाख, विनायक देशमुख यावेळी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले की, केंद्रात एका पक्षाची राजवट येण्याचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे समान विचारांच्या पक्षांचे सरकार आता केंद्रात हवे. मागील पाच वर्षांत १८ पक्ष एकत्र राहिले. समान विचारांनी त्यांनी काम केले. अशा विचारांच्या पक्षांचे सरकार केंद्रात आले नाही, तर समाजाची घडी विस्कटेल, असा इशारा त्यांनी दिला.
पाच वर्षांत शेतीमालाच्या आधारभूत किमती वाढवितानाच शेतीचा व्याजदर १२ टक्क्य़ांवरून ७ टक्क्य़ांपर्यंत कमी केला. कृषी कर्जपुरवठा ८२ हजार कोटींवरून २ लाख ५० हजार कोटींपर्यंत वाढविला. शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली. या उलट एनडीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा एक छदामही माफ झाला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
समाजात जातीयतेचे द्वेष पसरविणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा गुजरात करायला निघाले आहेत. त्यांच्यापासून जनतेने सावध राहावे, असे आवाहनही पवार यांनी केले.
जातीयवाद्यांना मूठमाती देण्याचे काम या निवडणुकीत आपल्याला करावयाचे असल्याचे पिचड म्हणाले. अ‍ॅट्रॉसिटीसंदर्भात आठवले यांच्या विरोधात होणारा प्रचार खोडसाळपणाचा आहे. पाच वर्षांत आठवले यांच्या मतदारसंघात अ‍ॅट्रॉसिटीचे फक्त ७० गुन्हे दाखल झाले. त्या तुलनेत आपला जिल्हा अ‍ॅट्रॉसिटीत पुढे असण्याचा टोला त्यांनी लगावला.
कृषिमंत्री थोरात यांनी आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने सातत्याने काँग्रेसला साथ दिली. १९५०च्या निवडणुकीत आपल्या स्थानिक उमेदवाराला पराभूत करून बी. सी. कांबळे यांना मतदारसंघाने निवडून दिल्याची आठवण करून दिली.
माजी मंत्री कोल्हे म्हणाले की, शरद पवारांच्या प्रयत्नांमुळेच शेतकरी वाचला. गोदावरी खोऱ्यातील मुकणे, भाम, भावली, कश्यपी, वालदेवी, गौतमी या धरणांची कामे मार्गी लागली. आता मात्र तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावर द्वेषाची भूमिका घेतली जाते. त्यामुळे कोपरगाव तालुक्याची अवस्था वाईट झाली.
अकोल्याच्या सभेत सीताराम गायकर, चंद्रकांत सरोदे, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत घुले, शिवाजी धुमाळ यांची भाषणे झाली. तेथील सभेस युवा नेते वैभव पिचड, अविनाश आदिक उपस्थित होते.
कोपरगावच्या सभेला इंटकचे संभाजी काळे, राष्ट्रवादीच्या अपंग सेलचे प्रदेशाध्यक्ष शब्बीर देशमुख, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, निर्मला मालपाणी, शारदा लगड, नगराध्यक्ष मंगेश पाटील, राहुरी साखर कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ, सभापती मच्छिंद्र टेके, जि. प. सदस्य राजेश परजणे, स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते. प्रकाश नवले व रंगनाथ लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.
मग गडकरी, ठाकरेंचे नाव टाकणार?
शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करण्याच्या युतीच्या घोषणेची पवार यांनी खिल्ली उडविली. यांनी आयुष्यात कधी सात-बारा उताराच पाहिला नाही. सात-बारा कोरा करणार म्हणजे कब्जेदार सदरी असणारे मालकाचे नावही काढून टाकणार. मग तेथे गडकरी की ठाकरेंचे नाव टाकणार काय? असा टोलाही त्यांनी लगावला.