Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्पर्श
काही वर्षांपूर्वीची घटना.
मध्यरात्री स्टुडिओत
काम करत असताना
अचानक लाईट गेले
सगळीकडे अंधार..
हरिप्रसाद चौरसियांचे
टेपरेकॉर्डरमधून

 

ऐकू येणारे बासरीचे स्वर
टेप बंद झाला तरी
बराच वेळ त्या वातावरणात
घुमत राहिलेले..
आता तोही आवाज नाही नीरव शांतता
दूरवरून येणाऱ्या
कुठल्याशा मंदिरातील
भजनांचा पुसटसा आवाज
अन् थोडय़ा थोडय़ा वेळाने
रातकिडय़ांचे ओरडणे
काळोखात अदृश्य झालेले
माझ्या सभोवतालचे
‘कलाविश्व’..
बराच वेळ
तो काळोख तसाच
पण आता हवाहवासा वाटणारा
मी तसाच बसलेलो
शांत..
तेवढय़ात
कलानिर्मितीत गुंतलेल्या
माझ्या चैतन्यमयी हातांना
झाला दुसऱ्या हाताचा ‘स्पर्श’
अन् एक विलक्षण
चेतना जागृत झाली..
मग मी तसाच
माझ्या एका हाताने
दुसऱ्या हाताचा
‘स्पर्श’ अनुभवू लागलो
बराच वेळ माझे दोन्ही हात
एकमेकांचा
प्रेमळ ‘स्पर्श’ समजत होते
अन् माझेच हात मला
नव्याने भेटत होते..
खरंच
परमेश्वरानं मानवाला ‘हात’
ही किती मोठी देणगी दिलीय
हे पहिल्यांदा कळलं
एरवी आपण या हातांनी
अनेक कामं करतो
पण कधीतरी इतक्या प्रेमानं
त्यांना जवळ घेतो का?
त्याच हातांनी मग
जवळची पेन्सिल हातात घेतली
अन् अंधारातच
अनुभवी लागलो
अन् कलाकृतींच्या निर्मितीमागची
‘निर्जीव’ पण
माझ्या हातांना आता
‘सजीव’ भासणारी पेन्सिल..
पुन्हा तेच हात
अंधारातच
समोरच्या पेपरवर
हळूवार फिरू लागले
अन् कधीही न अनुभवलेला
साक्षात्कारी ‘अनुभव’
पूर्णत शहारलेलं
शरीर अन् मन..
त्या ध्यान अवस्थेत
किती वेळ गेला कळलं नाही
डोळे उघडले तर स्टुडिओभर
लख्ख प्रकाश पडला होता
अन् प्रकाश पडला होता
माझ्या कलामय जीवनातही
बासरीच्या पुन्हा ऐकू येणाऱ्या
त्या स्वरांसोबत
सभोवतालचं हे विश्व
स्पर्शानं अनुभवायचं
मग नित्याचंच होऊन गेलं..
चित्रनिर्मितीसाठी लागणाऱ्या
सर्व वस्तू प्रथम
हळूवार स्पर्शानं अजमावतो
अन् मनातल्या मनात म्हणतो
मी चित्र काढायला तयार आहे
हे कागद, कॅनव्हास, रंग
तयार आहेत का?
तसंच शिल्प साकारताना
मातीलाही विचारू लागतो
मी तुला आकारामध्ये
बद्ध करायला तयार आहे
तू आहेस का?
आणि मग कित्येकदा
मी काम करायला बसतो
अन या कलासाहित्याच्या होकाराची
अनोखी अनुभूती घेऊ लागतो
समोर साकारणाऱ्या कलाकृतीत
मी फक्त निमित्त मात्र उरतो
म्हणूनच अशी कलाकृती
कशी साकार झाली?
हे शब्दांत सांगणं
कठीण होऊन बसतं..
मग कधी कधी
या सर्व चैतन्यमयी वस्तूंकडून
नकारही येतो
पण तरीही मी त्यातून
काही साकारण्याचा प्रयत्न केला,
तर कृत्रिमरित्या साकारलेली ‘आकृती’
निर्जीव, निस्तेज वाटू लागते
म्हणूनच ती ‘आकृती’
‘कलाकृती’ होत नाही..
हाच स्पर्शाचा अनुभव
कापड खरेदी करताना आला
आधी डोळ्यांना दिसणारी
रंगांची पसंती
मग त्याच कापडाची
स्पर्शातून होणारी जाणीव
मला सांगते
हे कापडदेखील
खरंच माझ्यासाठी आहे का?
या स्पर्श अनुभूतीतून जाताना
‘आनंदवना’तील
बोटं नसलेल्या
अन् तरीही कार्यक्षमतेची
अफाट जिद्द असणाऱ्या
महारोग्यांच्या हाताचा
चैतन्यमयी स्पर्श..
चित्रकूटसाठी
प्राण्यांची शिल्प साकारताना
त्या विविध प्राण्यांच्या त्वचेचा
मातीतून तयार झालेला स्पर्श..
कधी भीमबेटकाच्या गुहेतील
आदिमानवानं
चित्र काढताना
त्या भिंतीवर झालेल्या
एक लाख वर्षांहून अधिक
काळ लोटूनही
आजही जिवंत भासणारा स्पर्श..
अजिंठा-वेरूळची
लेणी कोरताना
अन् खजुराहो कोणार्कची
मंदिरे घडवताना
त्या कलाकारांचा
त्या काळी झालेला स्पर्श
मी आजही अनुभवतो..
रोममधील
माइकलेंजलोचे शिल्प
हात लावून बघताना
त्या महान कलाकाराच्या
हातांचा स्पर्श
काळाच्या ओघात लोटलेलं
अंतर क्षणात संपवून जातो..
‘स्नेहालय’मध्ये
अंधांकडूनच डोळ्याचे
शिल्प साकार करताना
त्या डोळस हातांनी
मला वेगळीच दृष्टी दिली
केवळ स्पर्शातून साकारणाऱ्या
त्या निर्मितीच्या वेळी
त्यातीलच काही मित्रांनी
माझे हात हातात घेतले
अन् म्हणाले
‘तुम्ही खूप छान कलाकृती करता
हे आम्ही ऐकलंय
तुमचे हात कसे आहेत हो?’
त्यांच्या त्या डोळस हातांनी
माझ्या हातांना केलेला स्पर्श
त्यांच्या काळोख्या विश्वाचा
प्रकाश मला दाखवत होते
अन् अश्रूंनी भरलेले
माझे बंद डोळे
त्यांना स्पर्शातूनही
दिसत होते..