Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अधीक्षक अभियंता अज्ञातवासात; ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांत अस्वस्थता
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

शिवसेनेचे आमदार अनिल राठोड व कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करून शाई फासले, शिवाय त्यांनीच विरोधात फिर्याद नोंदविल्याने भेदरलेले महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप पडळकर गेल्या २ दिवसांपासून अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी धावून येणाऱ्या वीज कर्मचारी संघटनाही या प्रकरणी चुप्पी साधून आहेत. महावितरणच्या वर्तुळात

 

आजही तणावपूर्ण शांतता होती.
मारहाणीचे प्रकार वाढत असूनही जिल्हाधिकारी, वरिष्ठ वीज अधिकारी गांभीर्याने लक्ष घालत नसल्यामुळे आधीच वीज कर्मचारी हतबल झाले आहेत. त्यात अधीक्षक अभियंत्यांनाच शाई फासून शिवीगाळ केली गेल्याने तर कर्मचाऱ्यांचे अवसानच गळाले आहे.
गुरुवारी रात्री वरिष्ठांच्या आदेशानुसार पडळकर यांनी राठोड यांच्याविरुद्ध कोतवालीत फिर्याद दाखल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी राठोड यांनीही पडळकर यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करीत दबाव वाढविला. या प्रकारामुळे तणावग्रस्त झालेले पडळकर अज्ञातवासात गेले. आपला मोबाईलही त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे दिला आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही.
ज्यांच्यावर अन्याय झाला ते पडळकरच अनुपस्थित, शिवाय त्यांनी संपर्क साधलेला नसल्यामुळे त्यांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छिणाऱ्या कर्मचारी संघटनांचाही नाईलाज झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्य़ात आमदार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारीच आरोपी असल्यामुळे कारवाई तरी कुणावर व कशी करावी असा पेच पोलिसांना पडला आहे.