Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

किरकोळ कारणावरून घोगरगावला तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला
श्रीगोंदे, ४ एप्रिल/वार्ताहर

यात्रेतील पालखी पुढे घेण्याच्या कारणावरून जि. प.चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या पुतण्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात आणखी एकजण जखमी झाला. घोगरगाव येथे रात्री हा प्रकार घडला. जि. प. सदस्य सचिन जगताप यांच्या बनपिंप्री येथील

 

समर्थकांनी हल्ला केल्याचा भोस यांचा आरोप आहे.
याप्रकरणी जिल्हा बँकेचे श्रीगोंदे कारखाना शाखेतील रोखपाल विलास रामदास शेटे यांनी फिर्याद दिली. मारहाणीत किरण पंढरीनाथ भोस हा युवक गंभीर जखमी आहे. घोगरगाव येथे दर वर्षी रामनवमीला यात्रा भरते. शुक्रवारी रात्री देवाची पालखी गावच्या वेशीतून आत आली. त्या वेळी फिर्यादी शेटे यांनी पालखीसमोर नाचणाऱ्या तरुणांना लवकर चला, तमाशा सुरू करायचा आहे, असे म्हटले. त्याचा राग आल्याने शरद वसंत पठारे, आबासाहेब जगताप, सुनील दिलीप पठारे, गौतम पठारे, नवनाथ रघू पठारे, मदन रघू पठारे, विक्रम भास्कर पठारे, बंडू रोहिदास पठारे, संजय काटकर (सर्व राहणार बनपिंप्री) व बाबू इस्माईल शेख, रशीद आबू शेख (दोघे घोगरगाव) यांनी शेटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी किरण भोस मधे पडला. त्या वेळी आरोपींनी तलवार, गुप्ती, काठय़ा, लाकडी स्टंप याने किरणवर वार केले.
तातडीने घटनास्थळी दाखल होत बाबासाहेब भोस यांनी जमावाला शांत केले. या धुमश्चक्रीत भोस यांचा मुलगा गणेश यालाही मारहाण झाली. पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपींना अद्यापि अटक झालेली नाही.
या घटनेने पुन्हा भोस-जगताप गटात तणाव निर्माण झाला आहे. आज सकाळी वनमंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी जखमींची विचारपूस केली.