Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रखर विरोधानंतरही नागवडेसमर्थक कर्डिलेंबरोबर
श्रीगोंदे, ४ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील कार्यकर्त्यांचा प्रखर विरोध डावलून आज माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी पक्षहितासाठी आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा सक्रिय प्रचार करण्याचा आदेश दिला. मात्र, ४० वर्षांतील राजकीय प्रवासात जिल्ह्य़ातील काँग्रेसला मानणाऱ्या नेत्यांनी कायमच आपल्या

 

पायात पाय अडकविण्याचा प्रयत्न केल्याची खंतही व्यक्त केली.
तालुक्यातील ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी नागवडे बोलत होते. या वेळी नागवडे समर्थकांनी लोकसभा निवडणुकीत कर्डिले यांचे काम करू नये, अशी टोकाची भूमिका मांडली. कर्डिलेंवर कुणाचा रोष नाही. मात्र, तालुक्यात गेली ३० वर्षे वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी संघर्ष करताना आता कर्डिलेंसाठी पाचपुतेंबरोबर काम करण्याचा निर्णय नागवडेंनी निर्णय घेऊ नये, असे कार्यकर्ते सांगत होते. त्रिंबक मुगल, नानासाहेब नरके, सुरेश लोखंडे, नगरसेवक गोपाळ मोटे, मेजर नलावडे, रमेश जाधव, विलास महामुनी, भगवान कणसे, सुनील जंगले, जिजाबापू रोडे, जिजाबापू शिंदे या प्रमुख कार्यकर्त्यांनी पाचपुतेंना मोठे करण्यासाठी आघाडीचे काम करायचे का, असा सवाल करीत पाचपुते-नागवडे युती मान्य नसणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आता गांधी-राजळे यांचे काम करणार असल्याचे सांगितले.
युवक कार्यकर्ते दीपक भोसले म्हणाले की, आघाडीचा धर्म पाळा या गोंडस नावाखाली कार्यकर्त्यांना बळी पाडले जात आहे. गेल्या निवडणुकीत नागवडेंना आघाडीची उमेदवारी असताना पाचपुतेंनी बंडखोरी केली होती. त्या वेळी हा धर्म कुठे गेला होता. तालुक्यात दादागिरीने लोकशाही संपविण्याचा उद्योग पद्धतशीरपणे सुरू आहे. बाबासाहेब भोस यांचा असाच पराभव केला. आता कार्यकर्त्यांवर हल्ले सुरू झालेत. आम्ही अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांच्याबरोबर नगरला गेलो, तर आम्हाला धमकीचे फोन आले. आता या प्रवृत्तीला पुन्हा खतपाणी घातले, तर कार्यकर्ते उद्ध्वस्त होतील. जि. प. बांधकाम समिती सभापती बाळासाहेब गिरमकर यांनी नागवडेंचा निर्णय स्वीकारण्याचे आवाहन केले. ‘श्रीगोंदे’चे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनीही तीच भूमिका घेतली.
कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालताना नागवडे म्हणाले की, ४० वर्षे तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारणातून विकास साधण्याचा प्रयत्न करतोय. सामान्यांचा उद्धार व्हावा, म्हणून हा खटाटोप आहे. जिल्ह्य़ातील नेतेमंडळी आमच्या खांद्याला खांदा लावून फिरले. मात्र, तालुक्यातील विकासात त्यांचा हातभार लागला नाही.
एकटय़ाला संघर्ष करावा लागला. जिल्ह्य़ातील नेत्यांनी अडथळे आणूनही समाजासाठी सहन केले. आता कार्यकर्ते वेगळा निर्णय घ्या म्हणतात, पण त्याकरिता कुणाच्याही मागे पळू नका. समोरही तेवढे प्रेम हवे. ओलावा निर्माण करावा लागतो. तेव्हा त्यागाची तयारी ठेवली जाते. तुम्ही नागवडेंची चिंता करू नका, सत्तेसाठी नव्हे लोकांसाठी संघर्ष करीन, पण तुम्ही साथ द्या.
यानंतर सभेत कर्डिले यांचे सर्वानी काम करण्याचा ठराव गिरमकर यांनी मांडून संमत करून घेतला. सूत्रसंचालन कारखाना संचालक अशोक रोडे यांनी केले. आभार राजेंद्र जगताप यांनी मानले.