Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षच गद्दार - तुकाराम गडाख
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे काम मी प्रामाणिकपणे केले, परंतु पक्षानेच माझ्यावर अनेक वेळा अन्याय केला. राष्ट्रवादीच्या जिल्ह्य़ातील पुढाऱ्यांनी एक होऊन माझ्या तिकिटास विरोध केला. मला गद्दार म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षाचे पंचांग उघडून पहावे. त्यात तुम्हीच गद्दार असल्याचे दिसेल, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे नगरमधील उमेदवार तुकाराम गडाख

 

यांनी केली.
बसपतर्फे गडाख यांनी नगरमधून, तर कचरू वाघमारे यांनी शिर्डीतून अर्ज दाखल केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चोराच्या मनात चांदणे असल्यानेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील आपल्याला गद्दार म्हणाले, असा टोला गडाख यांनी मारला.
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९८८मध्ये आपल्याला पानसवाडी खून खटल्यात विनाकारण गोवून त्रास दिला. तरीही १९८९मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर दीड वर्षांने जि. प. व पं. स. निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही. मी अपक्ष पॅनेल निवडून आणून काँग्रेसला पाठिंबा दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बांधकाम समिती देण्याचे आश्वासन पाळले नाही. १९९४च्या लोकसभा निवडणुकीत दादा पाटील शेळकेंना मी निवडून आणले. परंतु शेवगावची उमेदवारी देण्याचे आश्वासन पाळले गेले नाही. शेळके व शिवाजी कर्डिले यांना विधानसभेसाठी तीन वेळा मदत केली. शेळके व यशवंतराव गडाखांनी राष्ट्रवादी सोडली. उमेदवार न मिळाल्याने पक्षाने मला २००४मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली. निवडून आलो, परंतु या वेळी पक्षाने उमेदवारी न देता अन्याय केला, असे गडाख म्हणाले. खासदारपदाच्या काळातील कामांची जंत्री त्यांनी सादर केली.
बसपच्या नेत्या मायावती यांच्या कामाच्या प्रभावामुळे आपण या पक्षाची उमेदवारी स्वीकारली, असे गडाख यांनी सांगितले. बसप महाराष्ट्रात ४८ जागा लढवत आहे. बसपला घाबरूनच राष्ट्रवादीने त्यांच्या ४ विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली. पक्ष महाराष्ट्रात जिंकण्यासाठी व टिकण्यासाठी लढत आहे. ७० टक्के जागांवर सक्षम उमेदवार दिल्याने यश मिळेल, असा दावा पक्षाचे महासचिव अविचल धिवर यांनी केला. पक्षाचे सचिव संजय कांबळे व शिर्डीतील उमेदवार वाघमारे या वेळी उपस्थित होते.
‘आठवलेंची ओढाताण दुर्दैवी’
काँग्रेस आघाडीचे शिर्डीतील उमेदवार रामदास आठवले यांची झालेली ओढाताण दुर्दैवी आहे. त्यामुळेच शिर्डीच्या प्रचारात आम्ही स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे बसपचे महासचिव धिवर यांनी सांगितले.