Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘महावितरण’च्या लाचखोर अभियंत्याला सक्तमजुरी
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

शेतकऱ्याकडून दीड हजार रुपयांची लाच घेणारा कर्जत येथील ‘महावितरण’चा कनिष्ठ अभियंता हरिप्रसाद रामदेव मिश्रा याला न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जी. सेवलीकर यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक

 

सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले.
मिश्रा कर्जत येथे वीज वितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. थेरवडी येथील शेतकरी दादा लक्ष्मण कांबळे यांनी बेकायदा वीजजोड घेतल्यावरून मिश्रा याने त्यांना दि. १० डिसेंबर २००३ रोजी कार्यालयात बोलावून घेतले. ‘तू विजेची चोरी केली आहेस. पोलीस केस केल्यास ४० हजार रुपये भरावे लागतील’, असा दम त्याने दिला. कांबळे यांनी आपली परिस्थिती चांगली नाही, असे सांगितल्यावर मिश्रा याने कांबळे यांच्याकडे १८ हजारांची मागणी केली. तडजोड होऊन तीन हजार रुपये देण्याचे ठरले. यापैकी दीड हजार रुपये १५ डिसेंबरला कांबळे आणून देणार होते. दरम्यान, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. तत्कालीन पोलीस अधीक्षक सुभाष जोशी यांच्या पथकाने मिश्रा यास लाच घेताना कर्जत येथील बाजारतळावर रंगेहाथ पकडले.
या खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने मिश्रा याला कलम ७, १३ (१) (ड) अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व दंड रुपये ३ हजार व कलम १३ (२) अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. या शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.