Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गांधी, गडाख कोटय़धीश; रूपवते,आठवले लक्षाधीश
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी नगर मतदारसंघात शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे दिलीप गांधी व बसपचे तुकाराम गडाख कोटय़धीश, तर शिर्डी मतदारसंघातील उमेदवार

 

रामदास आठवले (रिपाईं) व प्रेमानंद रूपवते (बंडखोर) लक्षाधीश आहेत.
उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
सर्वात जास्त संपत्तीचे मालक विद्यमान खासदार तुकाराम गडाख असून, त्यांच्या व कुटुंबीयांच्या नावावर तब्बल साडेतीन कोटींची मालमत्ता आहे. त्यांचा मुलगा रविराज यांच्या नावावर ५३ लाखांची मालमत्ता, पत्नी लक्ष्मीबाई यांच्या नावावर १६ लाख ७५ हजार, तर स्वत गडाख २ कोटी ८३ लाखांचे धनी आहेत.
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी व त्यांच्या कुटंबीयांच्या नावावर १ कोटी ३५ लाखांची मालमत्ता आहे. शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस-रिपब्लिकन आघाडीचे उमेदवार व विद्यमान खासदार रामदास आठवले व त्यांच्या कुटुंबीयांकडे ८३ लाखांची संपत्ती आहे. अपक्ष उमेदवार प्रेमानंद रूपवते ४० लाखांचे धनी आहेत.
बसपचे गडाख यांच्या कुटुंबीयांकडे २ किलो १०० ग्रॅम सोने (२६ लाख २० हजार) आहे. मुलाच्या नावावर २ किलोग्रॅम सोने, चार मोटारी, एक ट्रॅक्टर आहे. गडाख यांची पुण्यात ८० लाख ९५ हजारांचे प्लॉट्स आहेत. या व्यतिरिक्त बँका, वित्तीय संस्था, शेअर्स, बचतपत्रे, तसेच सोनई, पांढरीपूल येथे शेतजमीन, प्लॉट अशी पावणेदोन कोटींची माया आहे. त्यांच्यावर आयसीयसीआय बँक २ लाख ५५ हजार, युनियन बँकेचे ४४ लाख ५३ हजारांचे कर्ज आहे. गडाख यांच्याविरुद्ध सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल दोन गुन्हे दाखल आहेत.
भाजपचे दिलीप गांधी यांच्या स्वतचे नावे ९३ लाख ५१ हजार, पत्नी सरोज यांच्याकडे ४० लाख ३५ हजारांची संपत्ती आहे. त्यात रोकड ९ लाख ५० हजार, ८२ लाखांचे रोखे, अ‍ॅम्बेसिडर, महिंद्रा आर्मडा ही दोन वाहने, ५ तोळे सोने, तर पत्नीच्या नावे ६० तोळे सोने, सावेडी येथे ४ लाख ७८ हजारांचा फ्लॅट, बुरूडगाव येथे १८ लाख ६५ हजारांचे अपार्टमेंट अशी संपत्ती आहे. गांधी यांच्यावर साडेनऊ लाखांचे कर्ज आहे.
आठवले यांच्या स्वतच्या बँक खात्यात ६ लाख ५१ हजार, तर पत्नी सीमा यांच्या खात्यात ८ हजार ८२५ रुपये आहेत. आई हौसाबाई यांच्या खात्यात ७० हजार ३३३ रुपये आहेत.
आठवलेंच्या नावावर किंवा कुटुंबीयांकडे एकही मोटर नाही. आठवलेंकडे १ लाख ८ हजारांचे, पत्नीकडे ३ लाख १५ हजारांचे, आईकडे ५६ हजारांचे, तर मुलाकडे १ लाख ४० हजारांचे दागिने आहेत. आठवलेंच्या नावावर सांगली जिल्ह्य़ात कवठे महांकाळ तालुक्यात १० हेक्टर (किंमत ३० हजार रुपये) शेतजमीन आहे. गुरगाव येथे १५ लाख ५३ हजार रुपये किमतीची सदनिका त्यांच्याकडे आहे. पत्नीच्या नावावर मुंबईत ३१ लाख रुपये किमतीचे दोन भूखंड आहेत.
रूपवते यांच्या नावावर १० लाख ८७ हजारांची, तर त्यांची पत्नी स्नेहजा यांच्या नावे २४ लाखांची व मुलीच्या नावे ४ लाख २१ हजार रुपयांची संपत्ती आहे. त्यात बऱ्हाणपूर (नेवासे) येथे ४ लाखांची ३ हेक्टर ९४ आर शेतजमीन, भंडारदरा येथे ५० हजारांची जमीन, अकोले येथे वडिलोपार्जित ४ लाखांची मिळकत आहे.