Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

थंडा थंडा कुल कुल!
अकोले, ४ एप्रिल/वार्ताहर

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी आज केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सभेला येथे थंडा प्रतिसाद मिळाला. अपेक्षित गर्दी जमविण्यात संयोजकांना आलेले अपयश, सभेवर काँग्रेसने टाकलेला अघोषित बहिष्कार, यामुळे उन्हाळ्यातही सभेचे

 

वातावरण ‘थंडा थंडा कुल कुल’ असेच राहिले.
पवारांनी आठवले यांची केलेली जोरदार भलामण हीच काय ती जमेची बाजू. अर्थात सभेची यशस्वीतता आणि होणारे मतदान यांचा परस्पर संबंध असतोच असे नाही. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार देवीदास पिंगळे यांच्या सभेला पाचशेही कार्यकर्ते उपस्थित नव्हते. तरीही पिंगळे यांनी अकोल्यातून तब्बल २६ हजार मतांची आघाडी घेतली होती. आठवले यांच्या प्रचारासाठी पवारांची सभा ठेवण्यात आली होती. आठवले तसे काँग्रेसच्या कोटय़ातील उमेदवार. मात्र, आजच्या सभेतील वातावरण ‘सब कुछ राष्ट्रवादी’ असे होते. राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात सभेला उपस्थित असले, तरी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र सभेकडे पाठ फिरविली. काँग्रेसच्या तालुका शाखेने प्रेमानंद रूपवते यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही मागणी केली होती. तसेच पंजा चिन्ह नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव तालुका शाखेने संमत केला होता. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचा या सभेवर अघोषित बहिष्कार बोलका आहे.
पवारांसारखा दिग्गज नेता असतानाही सभेला अपेक्षित गर्दी जमली नव्हती. सभेत घोषणाबाजी, हशा, टाळ्या, कार्यकर्त्यांचा उत्साह, वक्तयांची भाषणबाजी, त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद असे काहीच आज दिसले नाही. सभेची वेळ साडेनऊ असताना दहा वाजेपर्यंत मंडपात जेमतेम उपस्थिती होती. सभास्थानी जमलेले कार्यकर्ते अस्वस्थच दिसत होते. सव्वादहानंतर गर्दी वाढू लागली. नियोजित वेळेपेक्षा सुमारे तासभर उशिराने पवार यांचे आगमन झाले. तोपर्यंत मंडप जेमतेम भरला होता.
थोरात व पिचडांशी कानगोष्टी
सभेला येण्यापूर्वी पवारांनी राष्ट्रवादीचे तालुका सचिव यशवंत आभाळे यांच्या घरी आमदार पिचड, यशवंतराव गडाख, कृषिमंत्री थोरात यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. मतदारसंघाची राजकीय स्थिती त्यांनी जाणून घेतल्याचे समजते. सभा सुरू असतानाही पवारांच्या थोरात व पिचड यांच्याशी कानगोष्टी सुरू होत्या.