Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ज्युलिया हॉस्पिटलचे आज उद्घाटन
जामखेड, ४ एप्रिल/वार्ताहर

कमी खर्चात चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पातर्फे नव्याने

 

उभारण्यात आलेल्या जुलिया हॉस्पिटलचे उद्या (रविवारी) उद्घाटन होणार आहे.
हॉलंडच्या सामाजिक कार्यकर्त्यां मिस केट व जपानचे हिरोयुकी नाकागावा यांच्या हस्ते उद्घाटन होईल. महाराष्ट्र मानव विज्ञान परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र मुटाटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डॉ. रजनीकांत आरोळे, डॉ. शोभा आरोळे उपस्थित राहणार आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. आरोळे म्हणाले की, निरनिराळ्या चाचण्या, तपासण्या करून घेतल्याशिवाय रोगाचे निदान होणार नाही, असा सर्वसामान्य रुग्णांचा समज असतो. अमेरिकेसारख्या देशातील आरोग्यासाठीच्या विमा कंपन्यादेखील अनावश्यक चाचण्यांचे पैसे द्यावयास तयार नाहीत. वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागडी होत आहे. ग्रामीण आरोग्य प्रकल्पाने आतापर्यंत सर्वागीण आरोग्याच्या दृष्टीने लोकांची सेवा केली. हगवण, न्यूमोनिया, कुपोषण आदी लहान मुलांमधील आजार काबूत येण्याकरिता खेडय़ातील लोकांना, आरोग्य मार्गदर्शिकांना शिक्षण दिले. सुरुवातीला एक हजाराला १८० असलेला बालमृत्यू दर एक हजाराला २० इतका कमी झाला. सन १९७० ते १९८०मध्ये क्षयरोग, कुष्ठरोग यासारखे संसर्गजन्य आजार व अडलेल्या बाळंतिणीचे प्रमाण अधिक होते. या समस्यांचे प्रमाण आता न्यूनतम आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार आता डोके वर काढीत आहेत. या आजारांबाबतही आरोग्य मार्गदर्शिकांना शिक्षण देण्यात आलेले आहे.
दवाखान्याचा हेतू सर्वागीण आरोग्य सेवा देणे आहे. याकरिता प्रतिबंध, प्रशिक्षण, उपचार व पुनर्वसन या सेवांचा समावेश करून या दवाखान्यात सेवा दिली जाते. स्त्रिया, अर्भके, अंध व तातडीची रूग्णसेवा हे दवाखान्याचे प्रमुख लक्ष्य राहील. याशिवाय डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी यांचे सतत प्रशिक्षण होईल, तसेच खडकत येथील शेतावर एड्स, कुष्ठरोगींच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
ग्रामीण भागातील वातावरणास योग्य सोयी-सुविधा व उपकरणांनी नवा दवाखाना सुसज्ज आहे. बाह्य़रुग्ण विभागामध्ये निरनिराळे तज्ज्ञ वैद्यकीय सेवा देतील. एकूण ५० आंतररुग्णांची सेवा, अतिदक्षता विभाग असे या ज्युलिया हॉस्पिटलचे स्वरूप आहे.