Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शिर्डीतील रामनवमी उत्सवाची सांगता
राहाता, ४ एप्रिल/वार्ताहर

रामनवमी उत्सवाची आज विक्रम नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. सकाळी साडेसात वाजता गुरूस्थान मंदिरात संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अशोक खांबेकर

 

यांच्या हस्ते रूद्राभिषेक करण्यात आला. या वेळी विश्वस्त सुरेश वाबळे उपस्थित होते.
सुमारे १ लाख ४६ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. २५ लाख ४८ हजारांची प्रसादाची विक्री झाली. १ लाख २० हजारांचे अन्न पाकिटे विकली. सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती झाली. श्रीसाईश्रद्धा ट्रस्टचा (सुरत) भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला. उद्या (रविवारी) सायंकाळी ७ ते १० या वेळेत कलासंपदाचे ‘शिर्डीत साई आले’ हे नाटक साईनगर मैदानावर होणार आहे.
नाशिक जिल्ह्य़ातील खडक माळेगाव व लासलगाव येथील साईभक्त शिरीष रायते व कासार यांनी मंदिर परिसराला पुष्पांची आकर्षक सजावट केली होती. मुंबईच्या द्वारकामाई मंडळाने मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती व बाबांच्या जीवनावर आधारित लेंडी बागेत हलता देखावा केला होता.
संस्थानने उत्सव काळात गर्दीचे योग्य नियोजन केले होते. अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.