Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मंजुरीनंतरही निधी रखडला,कुरुंदमध्ये तीव्र पाणीटंचाई
वाडेगव्हाण, ४ एप्रिल/वार्ताहर

भारत निर्माण योजनेंतर्गत १० टक्के लोकवर्गणी भरून सादर केलेल्या प्रस्तावाला दीड वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. मात्र, योजनेचा निधी न आल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पारनेर

 

तालुक्यातील कुरुंद गावची ही कैफियत आहे.
दरम्यान, जि. प.च्या पाणीपुरवठा विभागाने निधीचा दुसरा हप्ता न दिल्यास जि. प. कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा गावच्या पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष अनिल कर्डिले यांनी निवेदनाद्वारे दिला. या प्रश्नी वैतागलेल्या गावकऱ्यांनीही जि. प. अध्यक्षांकडे तक्रार करून उपोषणाचा इशारा दिला. गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी भारत निर्माण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्याचे ठरविले. त्यासाठी जि. प.कडे प्रस्ताव सादर करण्यात आला. दहा टक्के लोकवर्गणी भरली. जि. प.ने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर हे काम खासगी ठेकेदाराऐवजी ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समितीकडे देण्याचे ग्रामसभेने ठरविले. जि. प.कडून पहिला हप्ता मिळाल्यानंतर गेल्या वर्षी मेनंतर विहिरीचे काम पूर्ण झाले. मात्र, वर्ष होत आले, तरी दुसरा हप्ता अजून न मिळाल्याने काम रखडले. परिणामी कुरुंदकरांना पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. या प्रश्नी अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून उर्वरित निधी त्वरित वर्ग करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. दखल न घेतल्यास ७ एप्रिलपासून उपोषण करण्याचा इशारा शिवाजी खेमनर, जयसिंग कर्डिले, उपसरपंच बाबासाहेब कोतकर यांनी दिला.