Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कुल्फी, बर्फगोळा न खाण्याची बहिरवाडीच्या विद्यार्थ्यांची शपथ
अकोले, ४ एप्रिल/वार्ताहर

चैत्रातच वैशाख वणवा पेटल्याने ग्रामीण भागात कुल्फी, गारीगार, बर्फाचा गोळा, चोकोबार, आईस्क्रिमची विक्री तेजीत आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य व पाणी वापरल्यामुळे हे पदार्थ खाल्ल्याने मुलांना विविध विकारांनी ग्रासल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर आम्ही सर्व मुले कुल्फी, बर्फगोळा, आईस्क्रिम, गारीगार यातील काहीही खाणार नाही, अशी शपथच तालुक्यातील

 

बहिरवाडी येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
वाढलेल्या उष्म्यामुळे ग्रामीण भागातही शीतपदार्थाना मागणी वाढली आहे. गारीगार, कुल्फी, चोकोबार, आईस्क्रीम, बर्फगोळ्याची विक्री करणारे फेरीवाले गावोगाव फिरून शीतपदार्थाची विक्री करतात. मात्र, हे पदार्थ बनविताना फेरीवाले फारशी काळजी घेत नाहीत. निकृष्ट दर्जाचे पदार्थ वापरल्याने हे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो. काही दिवसांपूर्वी मिरजगाव (ता. कर्जत) येथे २५० विद्यार्थ्यांना कुल्फीमुळे विषबाधा झाली होती. या पाश्र्वभूमीवर बहिरवाडी शाळेतील मुख्याध्यापक सोमनाथ घोरपडे, शिक्षक भाऊसाहेब चासकर, भाऊसाहेब कासार, अशोकराव जाधव, दिग्विजय निकम यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. फेरवाल्यांकडील हे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव करून दिली. या आशयाची एक शपथच भाऊसाहेब कासार यांनी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली. त्यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी कुल्फी, गारीगार न खाण्याचा संकल्प केला. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.