Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वाकचौरेंनी शिर्डीऐवजी स्वतचाच विकास केला - वळसे
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

सरकारने भाऊसाहेब वाकचौरे यांना देवाची सेवा करण्यासाठी नेमले होते. परंतु त्यांनी शिर्डीचा विकास करण्याऐवजी स्वतचाच केला. चळवळीचे ते नुकसान करीत आहेत, असा स्पष्ट आरोप

 

पालकमंत्री दिलीप वळसे यांनी केला.
काँग्रेस आघाडीचे उमेदवार, रिपाईं नेते रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघात आज अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाईं कार्यकर्त्यांची प्रचार नियोजनाची बैठक दुपारी ओम गार्डन येथे झाली. त्यावेळी वळसे बोलत होते. काँग्रेसचे राज्य निवडणूक प्रचारप्रमुख खासदार बाळासाहेब विखे, रिपाईंचे प्रदेशाध्यक्ष व राज्यमंत्री प्रीतमकुमार शेवाळे, आमदार कन्हैय्यालाल गिडवाणी, सुमंत गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
आठवले यांची उमेदवारी म्हणजे समतेचा विचार असल्याचे सांगून वळसे म्हणाले की, जिल्ह्य़ातील नेते राज्याचे नेतृत्व करू शकणारे आहेत. सहकार व विकासातून त्यांनी साम्राज्य निर्माण केले आहे. काँग्रेस व रिपाईं यांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे मत विखे यांनी व्यक्त केले. रिपाईंची विखुरलेली ताकद एकत्र व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आठवले यांचा अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याचा स्वभाव नाही. परंतु विरोधकांच्या प्रचारास उत्तर देण्याऐवजी कार्यक्रम दिला तरच जातीयवादाच्या पलीकडे जाता येईल, असे विखे म्हणाले.
आठवले म्हणाले की, रिपाईंपेक्षा जिल्ह्य़ात नेत्यांचे गट जास्त आहेत. परंतु एका बाजूला विखे व दुसऱ्या बाजूस वळसे असल्याने कोणतीही अडचण येणार नाही, तरीही मी पडण्यासाठी उभा नाही. शिवाय रिपाईंच्या कार्यकर्त्यांनीही आघाडीचे काम प्रामाणिकपणे करायचे आहे. कोणी सेना-भाजपचे काम केल्यास पक्षातून काढले जाईल.
शेवाळे, डॉ. सुधीर तांबे, ज्ञानदेव वाफारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, रिपाईंचे कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, प्रशांत गडाख आदींची भाषणे झाली.
आम्ही भांडतो, पण तुमच्यासाठी एकत्र आलो..
वळसे व आठवले यांनी विजयासाठी विखे यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर विखे म्हणाले की, मी काही बादशाह नाही आणि नव्हतोही. जिल्हा पिचड, थोरात, मुरकुटे, आदिक, यशवंतराव गडाख, दोन्ही शंकरराव या सर्वानी वाटून घेतला आहे. ते भांडतात, एकत्रही येतात. आज तुमच्यासाठी (आठवले) एकत्र आलो. राष्ट्रवादीने आठवलेंसाठी मन मोठे केले नाही, तरी त्यांना आम्ही स्वीकारले. कारण त्यांचा पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंग यांना पाठिंबा आहे. बागायत भागात रुसवे-फुगवे जास्त असतात, हे आठवले यांनी लक्षात घ्यावे. आदिक विरुद्ध विखे हे सुरूच राहणार. परंतु आठवलेंसाठी आम्ही एकत्र आहोत.
जाहीर भाषणात वळसे यांनी शहरात काही शक्ती दहशतवाद करीत असल्याने औद्योगिक गुंतवणुकीस खीळ बसल्याचे सांगितले. त्यांनी नाव घेऊन उल्लेख केला नसला, तरी त्यांचा रोख शहरातील आमदाराकडे होता हे सर्वाच्याच लक्षात आले. पत्रकार परिषदेत विखे यांनी दहशतवाद निपटून काढण्यास नगरमध्ये निवडणूक ही साधन बनल्याचा उल्लेख केला. मात्र, त्यांचा रोख संदिग्धच होता.