Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उन्हाळ्यातही जनावरांना ताजा हिरवा चारा!
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई, त्यामुळे जनावरांना पिण्यास पाणी व हिरवा चारा ही बाब तशी दुर्मिळ होत असली, तरी नव्या तंत्राने आता उन्हाळ्यातदेखील दूधदुभत्या जनावरांना सकस हिरवा चारा देणे शक्य ठरले आहे. श्रीगोंदे तालुक्यातील यवती गावात

 

पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत गार्ड संस्थेतर्फे या बाबत यशस्वी प्रयोग करण्यात आला.
उन्हाची तीव्रता वाढू लागते तसे विहिरीतील पाणी कमी होते. पाण्याची टंचाई निर्माण होते. घास पिकाला तर जास्त पाणी लागते. या पाश्र्वभूमीवर यवतीतील शेतकऱ्यांनी घास पिकाला पर्याय म्हणून हिरव्या चाऱ्यासाठी धसडी गवत (गावठी पवना) लावले. त्याचा त्यांना चांगला उपयोग झाला.
गार्डचे संचालक जे. जी. त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ३ वर्षांपासून इंडो-जर्मन पाणलोटक्षेत्र विकासाचे काम सुरू आहे. कमी पाण्यात येणारे धसडी गवत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लावले. हे गवत जनावरांसाठी पौष्टिक असून, दूधही जास्त मिळते.
हे गवत ५ ते ६ फूट उंच वाढते व कापणीनंतर पुन्हा त्याची वाढ होत राहते. आज या गावातील ७० शेतकरी या गवताचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करीत आहेत. ठिकठिकाणचे शेतकरी या गवताचे प्लॉट पाहावयास येतात, असे गावच्या पाणलोट समितीचे अध्यक्ष शिवाजी दिवटे, उपसरपंच विलास दिवटे यांनी सांगितले.