Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विकासाचा अनुशेष भरून काढू - गांधी
पाथर्डी, ४ एप्रिल/वार्ताहर

नगर मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जनतेने मलाच विजयी करावे, असे आवाहन भाजप-सेनेचे उमेदवार दिलीप गांधी यांनी केले.
मिरी गटात गांधी यांनी प्रचारफेरी काढून मिरी येथे सभा घेतली. या वेळी ते बोलत होते.

 

अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे होते.
गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आघाडीच्या सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले. त्यापूर्वीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाची मोठी पीछेहाट झाली आहे. केंद्र सरकारच्या मिळमिळत्या धोरणामुळे देशाला आंतकवादाचे ग्रहण लागले आहे. अतिरेक्यांच्या कारवाईत हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. केंद्रात व राज्यात एकच सरकार असूनही त्याचा फायदा राज्य सरकारला घेता आला नाही. नरेंद्र मोदी यांचा धसका घेऊन जातीयवादाचा मुद्दा उपस्थित करत आपला नाकर्तेपणा झाकण्याचे काम सध्या सत्ताधारी करीत आहेत. युती राजवटीत मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांनेच या भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीचे काम मार्गी लागले. मात्र, काँग्रेसची मानसिकता या कामाला आडवी आल्यानेच हा प्रश्न सध्या रेंगाळला आहे. माझ्या कारकिर्दीत मतदारसंघातील गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. ही निवडणूक स्वाभिमानाची आहे. देशात सध्या परिवर्तनाची लाट आली असून, या लाटेत सामील व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी जि. प. सदस्य मोहन पालवे, तालुकाध्यक्ष रामनाथ बंग, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, तालुकाध्यक्ष रफिक शेख, अशोक गर्जे, जे. बी. वांढेकर उपस्थित होते. आभार मिर्झा मणियार यांनी मानले.